अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करून इस्लाम बनवले

    दिनांक :13-Sep-2020
|
- अपहरणकर्त्याशी लग्नही लावले
- पाकिस्तानच्या सिंधमधील आणखी एक घटना

लाहोर,
पाकिस्तानात अल्पसंख्यक हिंदुंवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. सिंध प्रांतात 14 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून तिला बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. यानंतर अपहरणकर्त्या तरुणासोबत तिचा विवाहही लावण्यात आला.
 
 
pakistan-parsha-hindu-gir
 
पार्शकुमारी असे या मुलीचे नाव असून, सिंध प्रांतातील खैरापूरच्या मोरी येथे तिचे वास्तव्य आहे. अब्दुल सबूर शहा या तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने तिचे अपहरण केले. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. सोबतच तिच्या जन्माचा दाखलाही सादर केला. मात्र, अपहरणकर्त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट अब्दुलने तिच्या जन्माचा चुकीचा दाखला सादर करून ती नाबालिक नसल्याचा दावा केला. आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि यामुळेच आम्ही लग्न केले, असे त्याने सांगितले.
 
 
अब्दुलने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त सांगितले आहे. आम्ही याची शहानिशा केली असून, हा दाखल बोगस असल्याचे आढळून आले. ती 24 वर्षांचीच असून, तिचा जन्म 15 सप्टेंबर 2005 रोजी झाला असल्याचा दावा पत्रकार नैला इनायतने केला.
 
 
पाकिस्तानमध्ये अल्पसं‘यक हिंदुंवर अत्याचाराची ही पहिली वेळ नाही. त्यातच सिंध प्रांतात दररोजच हिंदू मुलींवर अत्याचार होत असतात. पाकिस्तानात हिंदुंची जितकी लोकसंख्या आहे, त्यातील 90 टक्के हिंदू सिंधमध्ये राहतात. गेल्या आठवड्यात मोहन बगारी असे नाव असलेल्या हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुलींचे अपहरण करून, त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडणार्‍या घटना असंख्यक आहेत, असा आरोपही नैलाने केला आहे.