भारताचे प्रेरणास्रोत : स्वामी विवेकानंद

    दिनांक :13-Sep-2020
|
स्वामी विवेकानंद यांचे नाव माहीत नाही असा भारतीय सापडणे अवघडच. ‘त्याग’ आणि ‘सेवा’ हेच हिंदुस्थानचे राष्ट्रीय आदर्श आहेत असे ठासून सांगणार्‍या आणि ‘शिवभावे जीवसेवा’ हा मूलमंत्र भारतवासीयांना देणार्‍या स्वामी विवेकानंदांचे चरित्र फारच प्रेरणादायी आहे. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत स्वामीजींनी भारतीय सनातन वैदिक धर्माचे प्रतिनिधित्व करून संपूर्ण जगाला जणू दिव्य दृष्टी दिली. त्यांच्या जीवनचरित्राचे अवलोकन करणे यथोचित ठरेल.
 

swami vivekananda_1  
 
 
उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) ॲटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता इत्यादी धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरू श्रीरामकृष्ण परमहंस ‘नोरेन’ या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.
 
 
नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी 1871 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि 1879 मध्ये ते प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. 1881 साली ते फाईन आर्टची आणि 1884 मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
 
 
गुरू रामकृष्ण यांची भेट
कोलकात्यात शिमला नामक मोहल्ल्यात सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणार्‍या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स. 1881 च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते.
 
 
नरेंद्राची साधना
अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरुण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी ‘रामकृष्ण संघाची’ पायाभरणी झाली.
 
 
गुरुभेट व संन्यासदीक्षा
याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या या सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले.
 
 
11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी ‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो’ अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणार्‍या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. या परिषदेत ह्वामी विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच विचारप्रवर्तक आणि उत्कृष्ट भाषण करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा भाषणात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामीजींचे वर्णन ’भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी’ असे केले. ‘न्यू यॉर्क क्रिटिक’ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की ते दैवी वक्तृतवाचे धनी तर आहेतच. परंतु, त्यांचे धीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात (भगवी वस्त्रे) शोभून दिसणार्‍या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत. वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.
 
 
आदित्य करमरकर
9421776908
संदर्भ : विकीपिडिया