ऑक्सफर्डची कोरोना लस चाचणी पुन्हा सुरू

    दिनांक :13-Sep-2020
|
- डिसेंबरमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा
 
लंडन, 
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनका विकसित करीत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. बि‘टनमधील औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक प्राधिकरणाने आतापर्यंतच्या संशोधन प्रक्रियेची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतरच नैदानिक (क्लिनिकल) चाचणीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. लस टोचलेल्या एका स्वयंसेवकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे चाचणी थांबवण्यात आली होती.
 

corona chachani axford_1& 
 
ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनका यांनी सांगितले की, काही सूचनांबाबतची माहिती आताच सार्वजनिक करू शकत नाही. मात्र, स्वतंत्रपणे झालेल्या चाचणीत ही लस सुरक्षित आढळली आहे. औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक प्राधिकरणाने केलेल्या तपासणीत लस सुरक्षित आढळल्यामुळे लसीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
 
 
या लसीचे पहिल्या दोन टप्प्यात चांगले परिणामही दिसून आले होते. भारतातही या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ब्रिटनमध्ये या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. मात्र, त्यानंतर ही व्यक्ती आजारी पडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कंपनीने या लसीची चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला. भारतातही लस चाचणी थांबवण्यात आली. सिरम इन्स्टिट्यूटच्या देखरेखीत ही चाचणी घेण्यात येत आहे. लस संशोधनात सुरक्षितेला सर्वाधिक महत्त्व दिले असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे एस्ट्राजेनकाने सांगितले. आपण जगभरातील आरोग्य अधिकार्‍यांच्या संपर्कात असून लवकरच चाचणीबाबत त्यांना सूचना देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
 
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरिएट यांना लस लवकर उपलब्ध होण्याची आशा आहे. त्यांनी सांगितले की, संपूर्ण जगाचे लक्ष या लसीवर लागले आहे. त्यामुळेच चर्चा होत आहे. या वर्षा अखेर लस मंजुरीसाठीचा डेटा उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. लसीला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा वापर सुरू करण्यात येईल. त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लसीची पहिली खेप उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.