संस्कृतीचे फेरप्रतिपादन

    दिनांक :13-Sep-2020
|
भारताला समजून घेण्यासाठी जातीला गुरुकिल्ली मानण्याची चूक करण्यात आली. त्यामुळे जन्माधारितेचा पीळ बसलेल्या जातिव्यवस्थेमुळे आमच्या समाजात विकृती वाढल्या आणि समाजातील भेद अधिक रुंदावलेत. उदाहरणार्थ, जातीचे भिंग वापरून आम्ही आसामची संस्कृती व समाज समजून घेऊ शकतो का? नाही. म्हणून, आमच्या देशात ज्या मार्गाने ज्ञानाची उत्पत्ती झाली आणि ते प्रसारित झाले, त्याचा गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे. मुळात, आमची व्यवस्था सामाजिक समूहावरून कुठलाच भेदभाव करीत नाही. याची अनेक उदाहरणे आहेत. हैदराबादच्या जियागुडा येथील प्रसिद्ध श्रीरंगनाथ मंदिरात 2700 वर्षे जुनी परंपरा आहे की, या मंदिराचे पुजारी दलित समाजातील एका व्यक्तीला खांद्यावर आणतात आणि मंदिराच्या पवित्र गर्भगृहात नेतात. हिंदू समाजात, उपनयनाच्या प्रक्रियेने कुणीही ब्राह्मण बनू शकतो आणि वेदाध्ययन करू शकतो. वेद केवळ ब्राह्मणांसाठीच आहेत, ही धारणाच चुकीची आहे. चट्टम्पी स्वामिकलसारख्या सुधारकांनी त्यांच्या ‘वेदाधिकारा निरुपमम्’ (1918) या पुस्तकात सिद्ध केले आहे की, वेद सर्व हिंदूंसाठी आहेत, मग त्याने कुठल्याही कुळात जन्म घेतला असला तरी. सर्व जातींमधील शिक्षार्थी वेद शिकू शकतात. अशा रीतीने प्रशिक्षणानंतर दलितदेखील पुजारी बनले आहेत आणि त्यांनी ‘केवळ ब्राह्मणच पुजारी बनू शकतात’ या विचाराला छेद दिला आहे.
 
 
sanskrati_1  H
 
स्वातंत्र्यानंतर अब्राह्मण पुजारी बनले आणि त्यांनी वेदाध्ययन केले, अशा अनेक घटना सांगता येतील. ऑल त्रावणकोर पुल्य महासभेचे अध्यक्ष असलेले आणि आता अनुसूचित म्हणून मान्यता मिळालेल्या पुल्य समाजाचे टी. टी. केशवन् शास्त्री यांना शिक्षणासाठी नायर सर्व्हिस सोसायटीचे संस्थापक मन्नतु पद्मनाभन् (1878-1970) यांनी संपूर्ण मदत केली होती. केशवन् शास्त्री यांना संस्कृतचे प्राथमिक शिक्षण ब्रह्मविद्या पुशण पी. के. पण्णिकर, जे स्वत: नायर होते, यांनी दिले आणि नंतरचे वेदांचे शिक्षण संस्कृत विद्वान श्री नारायण गुरू यांनी स्वत: दिले. नारायण गुरू यांनी केशवन् शास्त्री यांना अलुवा येथील संस्कृत पाठशाळेत दाखल करून घेतले होते. 1983 साली, श्री नारायण गुरू यांच्या जन्मशताब्दी वर्षात एर्नाकुलम् येथे रा. स्व. संघाने एक विशाल हिंदू संमेलन आयोजित केले होते. मुख्य पूजेचे प्रमुख पुरोहित, ज्यांनी संमेलनाचे संचालन केले ते इळवा समाजाचे होते आणि त्यांचे सहकारी मल्याळी ब्राह्मण नंबूदरी होते. त्याच वर्षी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक माधवन्जी यांनी प्रमुख वैदिक विद्वानांच्या सहकार्याने तंत्र विद्या पीठम्ची स्थापना केली.
 
 
व्यक्तिस्वातंत्र्यवादाचे पुरस्कर्ते तसेच मार्क्ससिस्ट-मेकॉलेवादी इतिहासकारांनी अंधार्‍या भूतकाळाचे चित्र रंगविले. स्वातंत्र्यापासून राजकीय चालबाजीमुळे सामाजिक गटांना जातीच्या आधारावर मतपेढ्या बनविण्यात आल्या. या दोन वैचारिक व राजकीय घटनांनी हिंदू समाजात अनावश्यक तणाव उत्पन्न झाला. सध्या तर, हिंदू श्रद्धा-विश्वासाला त्याच्या नकारात्मक पैलूंवरून नाकारण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. ही एक शोकांतिका आहे आणि म्हणून सुधारणा गरजेच्या आहेत.
 
 
म्हणून, सामाजिक न्यायाचा सिद्धान्त विकसित करण्याच्या हेतूने रा. स्व. संघ, शिक्षणक्षेत्रात व प्रचलित व्यवहारात वैचारिक प्रभाव असलेले हिंदू धर्मग्रंथांचे भ्रामक प्रतिपादन निरस्त करण्यात, तसेच त्याला आव्हान देण्यासाठी कार्य करीत आहे. शूद्र हे ब्रह्माच्या पायापासून उत्पन्न झाले असे सांगून त्यांचे स्थान कमी दर्जाचे आहे, तसेच काही विशिष्ट जाती त्यांच्या दैहिक स्थानामुळे वरिष्ठ दर्जाच्या आहेत, हे दाखविण्यासाठी ऋग्वेदातील पुरुषसूक्ताचा दाखला देण्यात येतो. ही अशी कप्पाबंद विभागणी व उच्चनीचता कुणी उत्पन्न केली? भारतीय परंपरा आणि संस्कृतीत, पायांची पूजा फार महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. अनेक सूक्ते तसेच श्लोकांमधून ही भावना प्रकट झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सांस्कृतिक रीतिरिवाजापासून फारकत घेतलेले विश्लेषण आक्रमकपणे हाणून पाडले पाहिजे. कारण, हे विश्लेषण हिंदू आचरणाच्या तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे.
 
 
1989 साली, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्यावरून महाराष्ट्र पेटला होता. ज्या शहरात मराठवाडा विद्यापीठ आहे त्या औरंगाबादला अभाविपने एक परिषद आयोजित केली आणि या विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामकरण करण्याच्या बाजूने समाजमत तयार व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणात संपर्क अभियान हाती घेतले. नामकरणाला विरोध करणार्‍या जातींमध्येदेखील हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात जी पत्रके व माहिती पुस्तिका वाटण्यात आल्या, त्यात या परिषदेचा पत्ता, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर’ असा छापला होता. हे अभियान अतिशय प्रभावी ठरले. अखेर, 1994 साली या विद्यापीठाचे नामांतर झाले, तेव्हा आम्ही मिठाई वाटून हा प्रसंग साजरा केला. अभाविपच्या सामाजिक चळवळीमुळे, विद्यापीठाचे नामांतर समाजाने आनंदाने स्वीकारले.
 
 
जात या विषयाचा अनेक स्वयंसेवकांनी अभ्यास केला आहे. एक स्वयंसेवक आणि लेखक रमेश पतंगे यांच्या ‘मनू, संघ आणि मी’ या पुस्तकात याचे सविस्तर वर्णन आहे. पतंगे यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव, तसेच संघात स्वयंसेवकाची जात कशी गौण असते हे लिहिले आहे. आधी स्मृतींसारखे कायदेविषयक ग्रंथ अनावश्यक तसेच संदर्भहीन मानले जात. आम्ही जरी त्यातल्या प्रशासनविषयक प्रकरणांतून काही बोधप्रद गोष्टी स्वीकारू शकत असलो, तरी हे ग्रंथ काही वर्तमान काळात कुठेच लागू नाहीत. स्मृतींविषयी बोलताना, संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल म्हणाले की, आजच्या काळात देशात जी स्मृती प्रासंगिक आहे ती म्हणजे भारताचे संविधान.
 
हिंदुत्वाची मूलभूत तत्त्वे वेद व उपनिषदांमध्ये आहेत आणि ती एकता व समानतेचीच शिकवण देतात. असे काही ग्रंथ आहेत ज्यात लेखकांनी त्यांच्या परिस्थितीनुसार काही अटी सांगितल्या आहेत. हिंदू परंपरेत, झापडबंद सिद्धान्तांसाठी कुठलीच जागा नाही. आजचे वास्तव हे आहे की, डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या संविधानानुसार आमच्या इथे शासन-प्रशासन चालते. असे असतानाही, समाजात दुही निर्माण करणारे काही विशिष्ट लोक आहेत आणि ते, ज्या स्मृती विस्मरणात गेल्या आहेत तसेच ज्या आज कुणी वाचतही नाहीत, त्यातील काही विशिष्ट उद्धरणे घेऊन अपप्रचार करीत असतात. जाती-जातींमध्ये वैमनस्य निर्माण व्हावे या उद्देशानेच ते हे करीत असतात. भारतीय परंपरेत, ज्याची समीक्षा केली जाऊ शकत नाही किंवा ज्याच्यात सुधारणा करता येणार नाही किंवा जो नाकारता येणार नाही असा एकही ग्रंथ नाही. आमच्या इथे विचारांचा ठामपणा आहे आणि तरीही सर्वकाही विवादयोग्य आहे.
 
 
सामाजिक समरसतेचा संस्कार
संघाच्या दृष्टीने भेदभावाला कुठलेच स्थान नाही आणि आपल्या समाजात असलेल्या प्रचंड विकृतींचे समूळ उच्चाटन करणे हे फार मोठे काम आहे. सामाजिक समरसता हा संघाचा संस्कार आहे. संस्कार हा मूळ संस्कृत शब्द असून, एका पिढीतून दुसर्‍या पिढीत संक्रमित होणारी मानसिक वृत्ती, विचार, कृती आणि उद्देश, या अर्थाने तो वापरला जातो. समाजात हा सामाजिक समरसतेचा संस्कार रुजावा, अशी संघाची इच्छा आहे. गेल्या नऊ दशकांमध्ये, संघाच्या दैनंदिन आचरणामध्ये तसेच सर्व मोठे कार्यक्रम आणि आयोजनांमध्ये समरसता स्पष्टपणे दिसून आली आहे.
 
 
डॉ. आंबेडकर यांनी संघशिबिराला भेट दिली असता, त्यांनी तिथे समरसता आचरणात येत असलेली पाहून समाधान व्यक्त केले होते. डॉ. आंबेडकरांनी ‘धम्म परिवर्तनांतर्गत’ बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा संघाचे बिनीचे कार्यकर्ते आणि कामगारांच्या हक्कांचे चिंतक दत्तोपंत ठेंगडी तरुण स्वयंसेवक होते. बुद्धांची तत्त्वे अंगीकारण्याला ‘धम्म’ म्हणतात. त्या वेळी दत्तोपंत ठेंगडी डॉ. आंबेडकरांच्या सेवेत होते. आपल्या ‘डॉ. आंबेडकर व सामाजिक समरसता’ या पुस्तकात दत्तोपंत ठेंगडी लिहितात : डॉ. आंबेडकर नागपूरच्या सीताबर्डी भागातील हॉटेल शाममध्ये उतरले होते आणि तिथूनच ते धम्मपरिवर्तनासाठी गेले. या प्रवासात संघाच्या अधिकार्‍यांनी त्यांना विचारले की, सामाजिक समतेच्या क्षेत्रात संघ कार्य करीत असताना त्यांनी हा मार्ग का स्वीकारला? यावर ते म्हणाले, ‘‘संघाचे कार्य चांगलेच आहे. परंतु, माझे स्वास्थ्य पाहता मी आणि माझ्या जातीतील लोकांना घाई आहे. संघाच्या कार्याला वेळ लागणार आहे. देशापुढे अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे.’’
 
 
निश्चितच, संघाचे कार्य वेळखाऊ आहे, परंतु संपूर्ण समरसता प्राप्त करण्यासाठी समाजाला तयार करण्याचा हाच एक निश्चित मार्ग आहे. समरसता म्हणजे समाजातील परस्परसंबंध, अशी संघाची दृष्टी आहे. सामाजिक समरसतेच्या कार्याला संघात सर्वाधिक प्राधान्य आहे. हिंदू समाजात सुधारणा घडवून आणायच्या आहेत. कर्मकांडादी वाईट प्रथा आणि भेदभाव समूळ नष्ट करायचा आहे. ‘जात समाजरचना केव्हा बनली?’ आणि ‘हे केव्हा अस्तित्वात आले?’ अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे कठीण आहे. याची ठामपणे प्रामाणिक उत्तरे देणे कुणाला शक्य नाही. याशिवाय, जातिव्यवस्थेच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंवर अनेक जण वाद घालत असले, तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की, आज जातिव्यवस्था हानिकारक झाली आहे आणि ती सौहार्दपूर्ण संबंधांसाठी आधार बनू शकत नाही. म्हणून, हिंदू समाजाला विचार करणे तसेच नव्या समाजाचा संकल्प करणे गरजेचे झाले आहे. एखाद्या व्यक्तीचे समाजातील स्थान जन्मावरून, तसेच त्याचा व्यवसायही परंपरेवरून ठरविता येणार नाही. प्रत्येक व्यवसाय महत्त्वाचा आणि समान दर्जाचा आहे. कामाच्या बाबतीत कुठलीच वंशपरंपरा नसेल तसेच ते काम धार्मिक कर्मकांडाने ठरविणे आणि सोपविणे होणार नाही. या भेदभावविहीन तत्त्वांवर आधारित, समाजातील सर्व सदस्यांना सामाजिक समरसता व्यवस्था निर्माण करायची आहे. जातींचे राजकारण आणि राजकारणातील जातींचे महत्त्व थांबलेच पाहिजे. राजकारणाने हिंदू समाजाची एकता व्यक्त केलीच पाहिजे. हा संघाचा दृष्टिकोन व प्रयत्न आहे. हिंदू समाजाने आपले रूप जातींच्या भिंगातून न बघता, हिंदुत्वाच्या भिंगातून बघितले पाहिजे. त्यानंतरच जातिवाद संपेल. जातीच्या राजकारणाने समतेचा कुठलाच उपाय सापडणार नाही. उलट, त्याने उत्तरोत्तर वाढणारे प्रश्न आणि गुंतागुंतच निर्माण होईल.
 
 
सामाजिक समरसतेची अंमलबजावणी आधी वैयक्तिक आचरणात होणे आवश्यक आहे आणि त्यानंतर हा प्रवाह समाजात पसरेल. स्वयंसेवक हे आचरण स्वत:पासून सुरू करतो. स्वयंसेवक स्वत:ला तीन कार्यांमध्ये गुंतवून घेतो- एक, शाखांचे जाळे वाढविणे, दुसरे सेवा, ज्याद्वारे समाजातील प्रचंड मोठ्या उपेक्षित वर्गासाठी काम करणे अपरिहार्य होते आणि तिसरे, शोषण व अधिकारहनन थांबविण्यासाठी आंदोलनात्मक कृती करणे. यातील तिसरे कार्य संघाच्या सर्व संघटनांच्या अधिकारक्षेत्रात येते. भारतीय मजदूर संघ कामगारांच्या हक्कांसाठी, शेतमजुरांच्या चांगल्या स्थितीसाठी किंवा अंगणवाडी सेविकांसारख्या असंघटित क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी लढतो. अभाविप विद्यार्थी, अनुसूचित जाती/जमातींच्या शिष्यवृत्ती व वसतिगृहांच्या सोयींसाठी काम करतो. ही आंदोलने कुठल्या पक्षाचे सरकार सत्तेत आहे, हे न बघता केली जातात. अभाविपचे कार्यकर्ते प्रत्येक वसतिगृहात जाऊन संपर्काचे एक प्रचंड मोठे अभियान राबवीत आहेत. बरेचदा त्यांना, गैरसमजामुळे तसेच घासून घासून गुळगुळीत झालेल्या जातीय भावनेमुळे, मनात साचलेल्या क्रोधाला तोंड द्यावे लागते. परंतु तरीही विचलित न होता, ते सर्वांना आदर व गौरव प्राप्त होण्यासाठी वातावरणनिर्मितीचे काम सुरूच ठेवतात.
 
 
या अशा भूमिकेमुळे संघाचे कार्य, प्रत्येक जात तसेच समूहापर्यंत पोहचत आहे. आतापर्यंत वंचित आणि शोषित असलेल्या जातींना संघटनेतील आवश्यक पदे व नेतृत्व दिले जात आहे. संघाला या जातींच्या नेतृत्वात रस नाही. तो, कार्य करण्यास स्वत:हून पुढे येण्यास प्रेरणा देणारा, सक्षम बनविणारा बनला आहे. वंचित समाजातील सदस्य, समाजाचे नेतृत्व करण्यास त्याची मदत घेऊ शकतात. संघाच्या मनुष्यनिर्मितीच्या कार्याचे हे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे.
••
सुनील आंबेकर यांनी लिहिलेल्या ‘द आरएसएस रोडमॅप्स फॉर द ट्वेन्टीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाचा क्रमश: भावानुवाद