ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन

    दिनांक :13-Sep-2020
|
सांगली,
येथील ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे रविवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. सांगली येथे झालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते कार्यवाह होते. त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्रातील एक सच्चा कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

Shafi_1  H x W: 
 
 
शफी नायकवडी हे महाविद्यालयीन जीवनापासूनच रंगभूमीशी एकरूप झाले होते. विविध एकांकिका आणि नाटकांमधून त्यांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळाला. राज्यातील अनेक नाट्य संस्थांशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये उत्कृष्ट अभियानाबद्दल त्यांना पारितोषिकेही मिळाली होती. सांगलीत नाट्य चळवळ रुजवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मोलाचे कार्य केले. परिषदेच्या चिंतामणीनगर शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या शाखेच्या माध्यमातून अनेक वर्षे बालनाट्य, नाट्य शिबिर, सुगम संगीत, भावगीत यासह अनेक स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले. नाट्य, प्रशिक्षण शिबिर, चर्चासत्रे या माध्यमातून नागरिकांमध्ये नाट्य विषयक जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. जानेवारी 2012 मध्ये सांगलीत झालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन याचे ते कार्यवाह होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे संमेलनाचे आयोजन यशस्वी ठरले.