राज्य सरकारला सुबुद्धी देगा देवा....भाविकांची लागली आस

    दिनांक :14-Sep-2020
|
नागपूर, 
राज्य शासनाने महसूल वाढीसाठी दारुची दुकाने सुरू केली. परंतु, देवालये, मंदिर सुरू करण्याची मागणी वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाविकांना आता मंदिरे उघडण्याची आस लागलेली असून राज्य सरकारला सुबुद्धी देगा देवा, अशी म्हणण्याची पाळी भाविकांवर आलेली आहे.

udhav pawar_1   
मनाला शांती मिळाली म्हणून आपण थेट मंदिरात जाऊन देवासमोर बसून नामजप करू शकत होतो. मंदिरे सुरु असण्याचे म्हणजेच मंदिरांची दारे भक्तांसाठी कायम उघडी असण्याचे महत्त्व आपल्याला समजू लागले आहे. आता सध्या गाडीवरून जाताना व चालताना मंदिराला बंदिस्त करणार्‍या कुलुपांकडे पाहून अंत:करण हळहळते.
 
अशी कुलूपबंद मंदिरांची दारे अजून किती काळ पहायची आहेत जनतेने? सध्या मानसिक आणि अध्यात्मिक कुचंबणा झालेली आहे ती म्हणजे रोज देवळात जाऊन अपार श्रद्धेने भक्ती करणार्‍या वृद्धांची! वृद्धापकाळामध्ये लोक देव धर्माकडे जास्त झुकलेली असतात व आपल्या जीवनाचे सार्थक करण्या करिता आपल्या जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच आध्यात्मिकतेच्या टप्प्यावर त्यांना साथ देतात, मनाला शांती देतात ती म्हणजे सध्या बंद असलेली मंदिरे! सध्या 65 वर्षांवरील व्यक्तींनी जास्त घराबाहेर जाऊ नये असे शासन, प्रशासनाने सांगितले आहे.
 
त्यामुळे तर वृद्ध जणांची आधीच फार मानसिक होरपळ झाली.त्यामध्ये ही श्रद्धास्थाने बंद आहेत. सरकारला असे वाटत असेल की मोठी देवळे सुरू झाली तर भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतील व भौतिक दुरत्वाचा फज्जा उडेल आणि कोरोना विषाणूचा संसर्ग वाढेल. परंतु आता लोकांना भाव अनावर होत आहेत. या भीषण महामारी मध्ये लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील आघात झाले आहेत. विद्यार्थी युवक यांच्या शाळा महाविद्यालय बंद असल्याने त्यांची मानसिक स्थिती बिकट झाली आहे.
 
कडक भौतिक दुरत्व राबवून मंदिरे उघडल्यास या मानसिकरीत्या खचलेल्या जनतेला अध्यात्मिक व मानसिक स्थैर्य प्राप्त करण्याकरिता फार मदत होऊ शकेल. रोजचा कोरोना मुळे मृत पावणार्‍यांचा आकडा वाढत चालला आहे तसेच रुग्णांची वाढती संख्या अजूनही लस उपलब्ध नसणे यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यांना कोणताही मार्ग दिसत नाही. अशावेळी लोकांची श्रद्धा ही फार महत्वाची ठरते लोकांच्या मनात सकारात्मक भाव निर्माण करू शकतात, मानसिक, आध्यात्मिक आधार व या स्थितिशी लढण्याची ऊर्जा प्रदान करू शकतात ती म्हणजे ही जागृत देवी - देवतांची प्राणप्रतिष्ठित मंदिरे! तारणहार देवी-देवतांची पवित्र मंदिरे!
 
राज्य शासनाने मंदिरे खुले करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. या पार्श्वभूमीवर नागपुरात गणेश टेकडी मंदिर, साई मंदिर, ताजबाग येथील ताजुद्दीन बाबांचा दर्गा, हनुमान मंदिर, कल्याणेश्वर मंदिर, कोराडीचे देवीचे मंदिर खुले होणार का, अशी विचारणा भाविकांकडून सातत्याने होत आहे. दीड महिन्यावर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. कोराडी देवी मंदिरात भाविकांच्या पहाटेपासून दर्शनासाठी रीघ असते. परंतु, यंदा भाविक देवीच्या दर्शनाला मुकणार असल्याचे संकेत मिळत आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनावर कोरोनाचे सावट
दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी जगभरातून लाखो बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर येत असतात. दीक्षाभूमीवर दरवर्षी जनसागर उसळत असते. परंतु, यंदा कोरोनाचा संसर्ग असल्याने हा धम्म सोहळा कोरोनाच्या सावटात सापडला आहे. धम्म क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदा हा दिन साजरा होणार नसल्याचे संकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या एका सदस्यांनी दिले. नागपुरात कोरोनाचा उद्रेक आहे. दररोज दोन हजाराहून अधिक बाधित आढळत आहेत. तसेच बाधितांचा मृत्यूदरही वाढलेला असल्याने यंदा दीक्षाभूमीवर भाविकही फिरकणार नसल्याचे दिसून येत आहे.