अमेरिकेच्या अर्थसंकल्पात विक्रमी तूट

    दिनांक :14-Sep-2020
|
वॉशिंग्टन, 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगातील सर्वच देशांची अर्थव्यवस्था गंभीर झाली आहे. याचा फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही बसला आहे. अमेरिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत विक्रमी 3 हजार अब्ज डॉलर्स इतकी विक्रमी तूट आली आहे.
 
 
dolrs_1  H x W:
 
कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकन सरकारला आरोग्य यंत्रणेवर प्रचंड खर्च करावा लागला. या खर्चाचा अर्थसंकल्पावर परिणाम झाला, तसेच देशात लाखो लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण व मृत्यू अमेरिकेत झाले आहेत, हे विशेष.
 
 
यापूर्वी 2009 मध्ये अकरा महिन्याच्या कालावधीत अर्थसंकल्पात विक्रमी तूट नोंदविली गेली होती. तेव्हाची तूट 1 हजार 370 अब्ज डॉलर्स इतकी होती. 2008 मधील जागतिक आर्थिक संकटाचा तो काळ होता, परंतु अर्थसंकल्पातील सध्याची तूट ही यापूर्वी पेक्षा दुप्पटीने अधिक आहे. अमेरिकेचे 2020चे आर्थिक वर्ष 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे. अमेरिकन काँग्रेसच्या अर्थसंकल्प कार्यालयानुसार संपूर्ण आर्थिक वर्षातील तूट 3 हजार 300 अब्ज डॉलर्सवर जाऊ शकते.