कोरोनासाठी ‘सिटीस्कॅन’चे दरही निश्चित होणार

    दिनांक :15-Sep-2020
|
मुंबई, 
कोरोना चाचणीच्या दरासोबत आता सिटीस्कॅनच्या दराबाबतही शासन धोरण ठरविणार आहे. कारण खासगी रुग्णालय कोरोना रुग्णांकडून सिटीस्कॅनसाठी अवाच्या सवा दर आकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

bg_1  H x W: 0  
सध्या बहुतेक खासगी रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांना कोरोना चाचणीसोबतच आधी सिटीस्कॅन करायला सांगतात. मात्र खासगी रुग्णालयात, तपासणी केंद्रात सिटीस्कॅनचे दर हे वेगळे असून सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. हे दर 3500 रुपयांपासून 12,000 पर्यंत असे आहेत.
 
यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे की, कोरोनाच्या निदानासाठी सिटीस्कॅन चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. खाजगी रुग्णालयामार्फत यासाठी 10 हजारांपेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, तशा तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व परवडणार्‍या दरात सिटीस्कॅन चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी, यासाठी सिटीस्कॅनचे कमाल दर निश्चित करण्यासंदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
 
यापूर्वी शासनाने अशीच समिती स्थापन करून कोरोनाच्या (आरटी-पीसीआर) या कोरोना चाचणीचे खासगी प्रयोगशाळेतील दर निश्चित केले होते. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता.
 
अलिकडे डॉक्टर कोरोनाच्या चाचणीबरोबर (एचआरसिटी) फुफ्फुसांचा सिटीस्कॅन संशयित कोरोना रुग्णांना करायला सांगतात. सिटीस्कॅनवरून वैद्यकीय तज्ज्ञांना रुग्णाला कोरोना आहे की नाही किंवा फुफ्फुसावर किती परिणाम झाला आहे हे निदान करून उपचार देणे सोपे होते. कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या निदानात सिटीस्कॅनचे खूप मोठे महत्त्व आहे. सध्याच्या काळात बहुतेक श्वसनविकारतज्ज्ञ या सिटीस्कॅनच्या अहवालाच्या आधारावर रुग्णांची उपचारपद्धतीबाबत निर्णय घेत आहे. या अहवालामध्ये फुफ्फुसाच्या किती भागाला इजा झाली आहे, त्यावरून त्याचे गुणांकन ठरत आहे. त्या गुणकांच्या आधारवर डॉक्टर उपचार सुरू करीत आहे.
(वृत्तसंस्था)