कोरोना रुग्णांसाठी 196 खाटांची संख्या वाढविली

    दिनांक :15-Sep-2020
|
शासकीय रुग्णालयात 2 प्राणवायू प्रकल्प
अकोला, 
जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने क्रियाशील बाधित रुग्णांची संख्या 1100 वर स्थिरावली आहे. मोकळीक-4 नंतर सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहे. नागरिकांच्या वाढत्या संपर्कामुळे प्रादुर्भाव गतीने वाढतो आहे. त्यातच जिल्ह्यातील रुग्णांकरिता प्राणवायूयुक्त खाटांची संख्या कमी होती. यावर तोडगा काढत जिल्हा प्रशासनाने 196 खाटांची संख्या वाढविली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खाजगी रुग्णालयांच्या आढावा बैठकीत ही मंजुरी दिली. आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षा प्रतिभा भोजने, आमदार अमोल मिटकरी, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
 
 
Akola 2_1  H x
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 90 खाटा उपलब्ध असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. तर जिल्ह्यातील आयकॉन रुग्णालय येथे 24 खाटा, ओझोन रुग्णालयात 28खाटा, मूर्तिजापूर येथील अवधाते रुग्णालयात 20 खाटा मंगळवारी मंजूर करण्यात आल्या. तर युनिक रुग्णालय येथे 18 खाटा, अकोला अ‍ॅक्सीडेंट रुग्णालय येथे 16 खाटा यापूर्वीच मंजूर करण्यात आल्या होत्या.रुग्णांना खाटा उपलब्ध नाहीत अशी स्थिती जिल्ह्यात येऊ देणार नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे असणार्‍या काही रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता असते. जिल्ह्यात प्राणवायू सिलेंडरचा तुडवटा असल्याचे निवेदन प्राणवायू सिलेंडर पुरवठा करणार्‍यांनी दिले होते. यावर तोडगा काढीत जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गंत दोन प्राणवायू प्रकल्पांसाठी 47 लक्ष 99 हजार रुपयांची प्रशासकीय मंजूरी दिली आहे. हे प्राणवायू प्रकल्प शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रत्येकी एक प्रमाणे उभारण्यात येतील. 10 किलोलीटर क्षमतेच्या या दोन प्रकल्पांमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्राणवायू सिलेंडरच्या मागणीत घट होऊन रुग्णांना दिलासा मिळेल. तर जिल्ह्यातील प्राणवायू सिलेंडरचा तुडवटा कमी होईल. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.