सिलेंडरचा भडका, तीन घरे भस्मसात

    दिनांक :15-Sep-2020
|
लक्षावधी रुपयांचे नुकसान
हिवरखेड, 
हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या हिंगणी बु. येथे सिलेंडरचा भीषण भडका उडाला. यामध्ये तीन घरे जळून खाक झाली असून लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
Ak 1_1  H x W:
 
सविस्तर असे की, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या हिंगणी बु. येथील मंगलाबाई शेषराव कोरडे या महिलेच्या घरी मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान स्वयंपाकासाठी गॅस सुरू केला असता सिलेंडरने अचानक पेट घेतला. सिलेंडरने पेट घेतल्याचे पाहताच एकच धावपळ उडाली. मंगलाबाई कोरडे यांच्यासहित शेजार्‍यांनी आरडाओरड केली आणि घराबाहेर पळाले त्यामुळे सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. थोड्याच वेळात पेटलेल्या सिलेंडरचा भीषण भडका उडाला. ज्यामुळे मोठा धमाका झाला जणू काही मोठा बॉम्बस्फोट झाला असावा अशी परिस्थिती झाली होती. सिलेंडरचा भडका होताच गावकर्‍यांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. मंगलाबाई कोरडे यांच्या घरासह शेजारील माणिकराव सदाशिव कोरडे आणि गोपाल विश्वनाथ कोरडे अशा एकूण तीन घरातील साहित्य जळून खाक झाले. तिन्ही घरे राहण्यास योग्य राहिली नाहीत. मंगलाबाईच्या घरातील रोकड पन्नास हजार रुपये, जीवनावश्यक वस्तू,दोन क्विंटल गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, रेशन कार्ड, बँक पासबुक आदी साहित्य जळाले. मंगलाबाई सोबतच दोन्ही शेजार्‍यांच्या घरातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाले आहे. त्यामुळे तिन्ही कुटुंब उघड्यावर आले आहेत.
आग लागल्यानंतर तेल्हारा अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल झाले आणि आग विझविण्यास आली. हिवरखेड पोलिस घटनास्थळी पोहोचली आणि तलाठ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सिलेंडरच्या भडक्यामुळे लागलेल्या आगीत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने भरीव आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. उपसरपंच ज्ञानेश्वर कोरडे, जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ, पंचायत समिती सदस्य संजय लांडे, सुधाकर हागे, विनोद गावंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. जिप सदस्य संजय अढाऊ यांनी मंगलाबाई कोरडे यांना पाच हजार रुपये नगदी स्वरूपात तातडीची मदत केली.