जिल्ह्यात आठ लाख कुटुंबांची होणार तपासणी

    दिनांक :15-Sep-2020
|
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरूवात
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
राज्यात सर्वत्र मंगळवापासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची कोरोना आजाराबाबत चौकशी, ताप व प्राणवायू पातळी तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात दोन हजारावर आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांची या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती मंगळवारी पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आयोजित आढावा बैठकीत देण्यात आली.
 

Moheem 1_1  H x 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कोरोना आजारा संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस आयुक्त आरती सिंग, पोलिस अधीक्षक हरीबालाजी एन, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक रणमले, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. सोमवंशी आदी उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाल्या की, कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक तेव्हा प्राणवायूचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. द्रवरुप प्राणवायूचा तुटवडा भासू नये म्हणून नागपूर आणि भिलाई येथून दर दिवशी एक टँकर याप्रमाणे पुरवठा उपलब्ध होणार आहे. तशा प्रकारचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा, यासाठी शासकीय आयटीआय संस्था तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे शंभर खाटांचे सर्व सोयीयुक्त आयसोलेशन सेंटर निर्माण करण्यात येणार आहे.
दंडाची रक्कम वाढविणार
 
कोरोनाच्या या संकट काळात मास्क लावणे हे एकच शस्त्र सध्यातरी अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत मास्क लावण्याची सवय अंगीकारावी. जे व्यक्ती मास्क लावणार नाहीत, त्यांच्याकडून तीनशे रुपयेचा दंड वसूल करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांनी दिले आहेत. यानंतरही लोकांमध्ये मास्क लावल्याचे आढळून न आल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे, असेही यावेळी यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणार्‍या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन नवाल यांनी यावेळी केले.