जबरदस्त! जया बच्चन यांच्या ‘त्या’ विधानाने वादळ

    दिनांक :15-Sep-2020
|
रविकिशन, कंगना राणावतने चढवला हल्ला
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
चित्रपटसृष्टी आणि अमली पदार्थाच्या संलग्नतेचे पडसाद आज मंगळवारी राज्यसभेतही उमटले. सपा खासदार जया बच्चन यांनी या मुद्यावरून भाजपा खासदार रविकिशन तसेच चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.
राज्यसभेत शून्य तासात बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, ज्या लोकांनी चित्रपटसृष्टीत नाव कमावले, तेच त्याला आता गटर म्हणत आहे. मी याच्याशी सहमत नाही. या कठीण प्रसंगात सरकारने मनोरंजन उद्योगासोबत उभे राहिले पाहिजे. कारण सरकार संकटात असतांना हे क्षेत्र नेहमीच सरकारच्या मदतीसाठी पुढे आले आहे.
 

delhi 1_1  H x  
 
या क्षेत्रातील काही लोक वाईट असतील, पण त्यासाठी संपूर्ण चित्रपट उद्योगाची प्रतिमा तुम्ही डागाळू शकत नाही. या क्षेत्राची हत्या करू शकत नाही, याकडे लक्ष वेधत बच्चन म्हणाल्या की, त्यामुळे या क्षेत्राच्या बचावासाठी सरकारने पुढे आले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. काल माझी स्थिती अतिशय लाजीरवाणी झाली, जेव्हा, लोकसभेतील एका सदस्याने, जो चित्रपट क्षेत्रातीलच आहे, त्याने चित्रपट क्षेत्राच्या विरुद्ध भूमिका घेतली. हे अतिशय लाजीरवाणे आहे. ज्या थाळीत जेवता, त्याच थाळीत तुम्ही छिद्र करता, हे अतिशय चुकीचे आहे.
जया बच्चन यांनी नाव न घेता हा हल्ला केला असला तरी, त्यांच्या या विधानानंतर चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत आणि भाजपा खासदार रविकिशन यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
जयाजी, तुमची मुलगी श्वेताला तारुण्यात असताना कोणी पिटले असते, तिला अमलीपदार्थ दिले असते आणि तिचे शोषण केले असते तर, त्यावेळीही तुम्ही हीच प्रतिक्रिया व्यक्त केली असती का, असे ट्विट कंगनाने केले. अभिषेक सातत्याने अन्याय होत आहे, शोषण होत आहे अशी तक्रार करत-करत एकदिवस फासावर लटकले गेले असते तरी, तुम्ही अशाच वागल्या असत्या का? थोडी सहानुभूती आमच्याबाबतही दाखवा, असे कंगनाने पुढे म्हटले.
भाजपा खासदार रविकिशन यांनीही जया बच्चन यांच्यावर टीका केली. मला वाटले, मी लोकसभेत जे बोललो, त्याला जया बच्चन पाठिंबा देतील, माझ्या बाजूने उभ्या राहतील. चित्रपटसृष्टीतील सगळेच अमलीपदार्थ घेत नाहीत, पण काही जण निश्चितपणे जगातील सर्वांत मोठ्या या चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याच्या कारस्थानात सहभागी आहे. मी आपणच बनवलेल्या थाळीला छिद्र करत नाही, मी फक्त चित्रपटसृष्टीतील काही जणांचे अमलीपदार्थाच्या रॅकेटशी असलेले संबंध उघड केले होते. जया बच्चन यांच्या विधानामुळे मी हैराण झालो आहे, असे रविकिशनने म्हटले आहे.
सपाने जया बच्चन यांची पाठराखण केली आहे, तर भाजपाने त्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.