संयुक्त राष्ट्रसंघात भारताची चीनवर मात

    दिनांक :15-Sep-2020
|
वॊशिंटन,
भारताने संयुक्त राष्ट्रसंघात चीनला मात दिली आहे. भारताला संयुक्त राष्ट्रसंघातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ईसीओएसओसी) महिलांच्या समस्यांवरील आयोगाचे सदस्यत्व मिळाले आहे. भारताचा कार्यकाळ 2021 पासून सुरू होणार असून 2025 पर्यंत राहणार आहे.

un _1  H x W: 0 
 
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायम प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. भारताने प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे सदस्यत्व मिळवले आहे. हे यश म्हणजे, भारतात लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे दर्शवते, असे त्यांनी सांगितले.
 
या जागेसाठी भारतासह चीन आणि अफगाणिस्तान देखील प्रयत्नशील होते. मात्र, चीनला हादरा देत भारत आणि अफगाणिस्तानने बाजी मारली. समितीवर निवडून येण्यासाठी 54 पैकी 28 मतांची आवश्यकता होती. अफगाणिस्तानला 39 आणि भारताला 38 मते मिळाली. चीनला 27 मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत चीनला नामुष्कीचा सामना करावा लागला. ‘कमिशन ऑन स्टेटस् ऑफ वुमन’ ही जागतिक पातळीवरील संस्था आहे. लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही परिषद कार्य करते. या आयोगाची स्थापना 21 जून 1946 रोजी झाली होती. 
 
‘कमिशन ऑन स्टेटस् ऑफ वुमन’ महिलांच्या अधिकारांना, हक्कांसाठी प्रोत्साहन देते आणि जगातील महिलांची स्थिती अधोरेखित करते. लैंगिक समानता आणि सबलीकरणासाठी मानके देखील या परिषदेत तयार करण्यात येतात. या संस्थेत संयुक्त राष्ट्रसंघाचे 45 सदस्य असतात. यात आफ्रिका खंडातील 13, आशिया खंडातील 11, लॅटिन अमेरिकेतील 9, पश्चिम युरोप आणि पूर्व युरोपचे प्रत्येकी चार सदस्य देशांचा समावेश असतो. घ(वृत्तसंस्था)