नंदी टाऊनच्या मालकाने रहिवाशांना सोडले वार्‍यावर

    दिनांक :15-Sep-2020
|
- वीज पुरवठा देण्यास वीज वितरणचा नकार
नरेंद्र सुरकार
सिंदी रेल्वे,
येथे मागील पाच वर्षांपूर्वी निर्माण नंदी टाऊनमध्ये राहायला गेलेल्या दीड डझन नागरिकांना ले- आऊटधारकाने वार्‍यावर सोडले आहे. एकाही घरमालकास सर्व कागदपत्रे असूनही वीज वितरण कंपनीने पुरवठा दिला नाही, अशी ओरड होत आहे. पालिका प्रशासन विकास अधिभार मिळाला नाही म्हणून वीजपुरवठा घेण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास तयार नाही असे लाभार्थ्यांनी सांगितले. मागील दहा वर्षात शहराच्या चारही बाजूला ले- आऊटचे अमाप पीक आले. याकाळात 13 ले- आऊट निर्माण झाले. दरवेळी सत्ताधारी शासनाने मलिदा लाटून नियम वाकवून शेतजमीनला अकृषक दर्शवून प्लाट पाडण्याची परवानगी दिली आहे. नंदी टाऊनच्या मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता, हे सर्वश्रुत आहे. तरीही चतूर राजकारण्यांनी ले- आऊटला आभय दिले.
 
 
pavti_1  H x W:
 
सत्ता बदलताच नियमावर बोट ठेवून कारवाई झाली नाही. उलट मतांवर डोळा ठेवून सर्वाना घरे बांधण्यासाठी परवानगी दिली आहे, असे तेथील रहिवासी सांगतात. शहराच्या अनेक ले- आऊटमध्ये हाच प्रकार झाला आहे. पण,नंदी टाऊनच्या रहिवाशांना सहा वर्षानंतरही वीज मात्र मिळाली नाही. विद्युत वितरण कंपनी पालिका प्रशासनाने ना- हरकत प्रमाणपत्र दिले तरच वीज मिळते असे सांगत आहे. परंतु त्याच विभागाने शहरालगतच्या रेवतकर यांच्या शेतात पाडलेल्या ले - आऊटमध्ये तात्पुरत्या उभारलेल्या झोपडीला वीज पुरवठा दिला आहे.पालिका प्रशासनाने ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ न करता पुरवठा कसा दिला याची शहरात चर्चा रंगत आहे.
 
 
 
वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार कोणालाही तात्पुरता पुरवठा देता येतो. पण, सहा महिन्यांत कायम पुरवठ्यासाठी अर्ज येणे अनिवार्य असते. शिवाय मुदत वाढविण्याची प्रक्रिया जिल्हा मुख्यालयात पूर्ण केली जाते. रेवतकर ले- आऊटमधील झोपडीच्या मालकाने तसे प्रयत्न केलेच नाही, असे बोलल्या जात आहे. दिवाळीत वीज मिळाली नाही तर मनोज वेले,गणेश कोल्हे, मनीषा पाल, अरुण नौकरकार उपोषणाला सुरुवात करतील, असे सांगण्यात आले. नंदीटाऊनमध्ये राहणार्‍यांकडून नपने विकास अधिभार 2017 मध्ये घेऊन बांधकामांची परवानगी दिली. नकाशा मंजूर केला व परवानगी दिली, असे चंद्रशेखर टमगिरे यांनी सांगितले. सध्या 13 रुपये 50 पैसे दराने वीज देयक भरतो. इतरांना सुद्धा वीज द्यावी, आम्ही सर्व कर पालिकेला नियमित भरतो, असे चंद्रशेखर टमगिरे यांनी सांगितले.