सुसर्दा जंगलातून सागवान झाडांची चोरी

    दिनांक :15-Sep-2020
|
मध्यप्रदेशातले तस्कर सक्रिय
वन विभागाच्या कार्यप्रणाीलवर संशय
तभा वृत्तसेवा
धारणी, 
प्रादेशिक वन विभागातील सुसर्दा रेंजच्या कोल्डाढाणाच्या जंगलातून दोन दिवसापुर्वी मध्यप्रदेशातील तस्करांनी उभी पंधरा सागाची झाडे कापून लाखो रुपयाचे सागवान चोरुन नेले. वनपालाच्या गैरहजेरीची माहिती घेतल्यावर सदर चोरी व अवैध वृक्षतोड करण्यात आल्याचे समजते. तब्बल 25 लाखापेक्षा जास्तीचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याने अमरावती वनवृत्तात दहशत पसरलेली आहे.

Dharni _1  H x  
 
धारणीपासून 40 किमी अंतरावर असलेल्या सुसर्दा बीटमधील कोल्डाढाणाच्या जंगलातील वनखंड क्रमांक 1233 च्या घनदाट अरण्यात जवळच्या मध्यप्रदेशातील तस्करांनी स्थानिक नागरिकांकडून माहिती प्राप्त केल्यावर चोरीचे नियोजन करुन सोमवारच्या पहाटे 12 ते 15 सागाची 40 ते 60 फूट उंचीची परिपक्व झाडे तोडण्याच्या धाडसी चोरीला कार्यान्वित केले. सावलीखेडा गावातून कोल्डाढाणाकडे दहा चाकी ट्रक गेल्याची माहिती आहे. ईलेक्ट्रॉनिक पावर आरामशीन जनरेटरवर संचालित करुन अवघ्या दोन तासात 25 लाखाच्या किंमतीची 15 झाडे पाडून झाडाचा गाभा भाग असलेले लाकूड ट्रकमध्ये लोड करुन त्याच मार्गाने परत गेले. परत तुकईथड किंवा खिडक्या मध्यप्रदेश गावाच्या मार्गाने चोर निघून गेले.
या मार्गावर नाका नाही, हे विशेष.
 
माहिती प्राप्त होताच नवनियुक्त रेंजर डेहनकर यांनी मोक्यावर पोहचून पंचनामा केला व नुकसानीचा अंदाज घेतला. सहाय्यक वनसंरक्षक पराड घटनास्थळावर पोहोचले. मागील 20 वर्षात या प्रकारची नियोजित वृक्षतोड झालेली नाही म्हणून प्रकरणाला गंभीरतेने घेण्यात येत आहे. वनपाल बांगरे सुटीवर होते तर वनरक्षक अखंडे हजर असताना तस्करांनी नियोजित धाडस करुन मेळघाट वन विभागाचे नाकच कापून नेलेले आहे. एका माहितीप्रमाणे दहा दिवसापूर्वी अश्याच प्रकारे 10-12 झाडे तोडून चोरांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याची गंभीर माहिती आहे. या जंगलासह बारातांडा, बिरोटीच्या जंगलातून सालईचे डिंक आणि वन्य प्राण्यांची अवयवे तस्करीने मध्यप्रदेशातील खकनार भागात नेण्यात येतात. बुरहानपूर वनमंडलातील अधिकारींसोबत समन्वय करण्याची आवश्यकता आहे.