शहरात प्रस्तावित जनसंचारबंदीला विरोध कायम

    दिनांक :15-Sep-2020
|
- काँग्रेसची पत्रकार परिषद
तभा वृत्तेसवा
वर्धा,
वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभुमीवर पुरवण्यात येणार्‍या सुविधांकडे दुर्लक्ष करुन शहरात 4 दिवसांकरिता जनसंचार बंदीचे आवाहन केले आहे. केंद्र शासनाच्या विरोधात जाऊन काही व्यापार्‍याच्या बोलण्यावरुन जनसंचारबंदी संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात घेतलेला निर्णय नियमबाह्य असून या बैठकीची चौकशी व्हावी व योग्य ती कारवाई करण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आज 15 रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेश सचिव व माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांनी दिली.
 
 
massban_1  H x
 
कोरोनात संचारबंदी, जनसंचारबंदी अशा सार्‍याच प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या. या दरम्यानच्या काळात कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य माणूस, छोटे व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले. शेकडो कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अशा स्थितीतून सरकारने मोकळीक करून संचारबंदी लागू करण्याचे प्रशासनाचे सर्व अधिकार काढून घेतले असताना शहरात 4 दिवसांसाठी जनसंचारबंदी लावण्याचा घाट काही व्यापार्‍यांनी अधिकार्‍यांना हाताशी घेऊन लावण्याचा हा प्रकार आहे. उपविभागीय अधिकार्‍यांच्या दालनात घेण्यात आलेल्या या बैठकीत सामान्य व्यावसाईकांचे नेतृत्व कराणारे कोणतेच प्रतिनिधी नव्हते. मुठभर व्यापार्‍यांच्या बोलण्यातून घेण्यात आलेला निर्णयामुळे समाज माध्यमांवर सर्व व्यापारी संघटनेच्या नावाखाली 4 दिवस बंद चा संदेश ही फिरत आहे. या निर्णयाला शासन स्तरावर कुठलाही आधार नसून शहरातील नागरिकात संभ्रम निर्माण करण्यार्‍या या प्रसारीत संदेशा विरोधात तसेच उपविभागीय अधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीची सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगीतले.
 
 
 
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र शर्मा, प्रमोद हिवाळे, जिल्हा उपाध्यक्ष इक्राम हुसैन शेख, भास्कर इथापे, सलीम कुरेशी, सुरेश ठाकरे, नरेंद्र पहाडे, श्याम शंभरकर, राजू भगत आदी उपस्थित होते.