111 आरोग्य पथकाकडून नागरिकांची तपासणी

    दिनांक :16-Sep-2020
|
- आयुक्त राजेश मोहिते यांची माहिती
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
‘माझे कुटुंब-माझी जबादारी’ ही मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अंतर्गत चंद्रपूर महानगरपालितर्फे 111 आरोग्य पथक तयार करण्यात आली असून, 1200 ते 1500 कर्मचार्‍यांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी बुधवार, 16 सप्टेंबर रोजी महानगरपलिका येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
rajesh_1  H x W
 
पत्रपरिषदेला महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती राहुल पावडे उपस्थित होते. मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील कोवीड-19 रुग्णांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय भर पडत आहे. त्यामुळे कोवीड-19 नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून आवश्यक असल्याने या मोहिमेंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी, कोमॉर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. एका आरोग्य पथकामध्ये 1 आरोग्य कर्मचारी आणि 2 स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या स्वयंसेवकाचा सामावेश राहणार आहे. एक पथक दररोज 50 घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान तपासणात येणार आहे.
 
 
 
ताप, खोकला, दम लागणे अशी कोविड सदृष्य लक्षणे असणार्‍या व्यक्तींना जवळच्या ताप उपचार केंद्रामध्ये संदर्भित करण्यात येईल. येथे कोविड-19 चाचणी करून पुढील उपचार केले जातील. कोमॉर्बीड स्थिती असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का, याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीत संदर्भित केले जाईल. प्रत्येक 5 ते 10 पथकामागे 1 डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देईल. घरातील सर्व सदस्यांना प्री-कोवीड, कोवीड आणि पोस्ट कोवीड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगितले जातील. लोकप्रतिनिधी, खाजगी रुग्णालय, स्वयंसेविका यांचा या मोहिमेत सहभाग राहील, असे सांगत ‘माझे कुटंब-माझी जबाबदारी‘ ही मोहीम कोविड-19 साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची असल्याचे राजेश मोहिते यांनी सांगितले.