कोरोनासाठी खाजगी रुग्णालयात 80 टक्के खाटा राखीव

    दिनांक :16-Sep-2020
|
-शासन नियम पाळा, अन्यता परवाना रद्द
- आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा इशारा
-नर्सिंग होम कायद्यातंर्गत कारवाई
नागपूर, 
महाराष्ट्र शासनाव्दारे निर्गमित केलेल्या दिशा निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड्स आता कोविड-19 रुग्णांसाठी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी संबंधित खाजगी रुग्णालयांनी मनपाला सूचना देण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयांनी मनपाचे सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नर्सिंग होमचा परवाना रद्द करणे तसेच भा.दं.वि.संहिता आणि अन्य कायद्यांतर्गंत कारवाई केली जाईल, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केले आहेत.
 
orona_1  H x W:
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयामध्ये 80 टक्के खाटा कोविड बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. यासोबतच त्यांना कोविड रुग्णांकडून शासनाव्दारे निर्धारित दराप्रमाणे दर आकारण्याचेही आदेशात नमूद केले आहे. 20 टक्के बेडस नान-कोविडसाठी राखीव राहतील. खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात दाखल रुग्णांची माहिती, रिक्त बेडची संख्या हे सुद्धा मनपाला कळविण्याचे आयुक्तांनी निर्देशीत केले आहे.
 
कोविड रुग्णांना दाखल करण्यापूर्वी मनपाला सूचित करणे आवश्यक आहे. जर कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक असेल तर रुग्णालय त्यांना दाखल करू शकतात. मात्र दाखल केल्यानंतर त्यांच्याबद्दल माहिती एक तासाच्या आत मनपाला देणे आवश्यक आहे. तसेच शासनाव्दारे निर्धारित केलेल्या दरानुसार बिल आकारावे, असेसुध्दा निर्देश म.न.पा.ने दिले आहे.
 
नागपूरात 637 खाजगी रुग्णालय आहेत पण कोव्हिड रुग्णांसाठी फारच कमी रुग्णालय समोर येत आहेत. महापौर श्री. संदीप जोशी आणि आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी खासगी रुग्णालयांना कोविड ला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. परंतु, रुग्णालयांनी या आवाहनाला योग्य प्रतिसाद दिला नाही. महापौरांनी मनपा प्रशासनाला प्रतिसाद न देणा-या रुग्णालयांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व शहरातील स्थिती पाहता खासगी रुग्णालयांनी कर्तव्य भावनेतून पुढे येण्याची गरज आहे, अशी भावना महापौर व आयुक्तांनी व्यक्त केली आहे.