दररोज 7 हजार नागरिकांची कोरोना चाचणी

    दिनांक :16-Sep-2020
|
- आयुक्तांच्या नेतृत्वात आरोग्य सेवेने कात टाकली
नागपूर,
नागपूर महानगरपालिकेचे नवीन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पदभार स्वीकारताच शहरातील आरोग्य व्यवस्थेकडे प्राथमिकस्तरापासून लक्ष दिले. सर्वात आधी कोविड चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. आज शहरात 50 कोविड चाचणी केंद्र आहेत.

corona test_1
 
यामध्ये सुरूवातीला 6 केंद्रांवरच ‘आरटीपीसीआर’ ही कोविड चाचणी केली जायची. मात्र आता सर्वच चाचणी केंद्रांमध्ये त्याची व्यवस्था आहे. ‘अँटीजेन’ चाचणी नंतरही आवश्यक असल्यास रुग्णाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जाते. त्यामुळे रुग्णाचे अचूक निदान होउन लवकर उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. त्यामुळे गरोदर महिला आणि अति तीव्र रुग्णांचेही निदान जलदगतीने होत आहे. आज शहरात दररोज 6500 ते 7000 नागरिकांची कोविड चाचणी होत आहे, हे उल्लेखनीय.
 
मनपामध्ये कार्यभार स्वीकारताच आयुक्तांनी प्राधान्याने कोव्हिड हॉस्पीटलची संख्या वाढविण्यावर भर दिला. सुरूवातीला 7 कोव्हिड हॉस्पिटल असलेली संख्या आजघडीला 40 असून येथे 3500 बेड्सची व्यवस्था आहे. याशिवाय इतर खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शहरातील सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना मोफत उपचार मिळावे यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. कटाक्षाने लक्ष देत असून मोफत रुग्णालये सुरू करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
 
त्याचेच फलित म्हणजे आता रेल्वेचे 69 बेड्सचे रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. याशिवाय शहरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाचे शिक्षण घेणा-या 271 एम.डी. डॉक्टरांची मनपाने थेट नियुक्ती केली आहे. या डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे आता रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे उपचार होउ शकणार आहे.
 
याशिवाय रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी अपू-या पडणा-या रुग्णवाहिकांकडे लक्ष देत आयुक्तांनी त्यांची संख्या 65 केली आहे. मृत्यूनंतर कोरोनाबाधितांचे शव तासन् तास रुग्णालयात पडून राहत असल्याची गंभीर बाब शहरात घडत असल्याने कोविडचा धोका जास्तच वाढला. अशा स्थितीत आयुक्तांनी तातडीने दखल घेत 9 शववाहिकांची संख्या 19 एवढी केली आहे.
 
मनपाच्या मिनी बसमध्ये परिवर्तन करून त्यांच्यापासून शववाहिकांची निर्मिती करण्यात आली आहे. या शववाहिकांमध्ये एकावेळी 3 शव अत्यंसंस्कारासाठी नेता येत आहेत. विशेष म्हणजे, आणखी 9 शववाहिका तयार झाल्या असून ही संख्या आता 28 एवढी झाली आहे. एकूणच एकीकडे शहराची स्थिती वाईट होत असल्याचे चित्र निर्माण होत असले तरी नागरिकांना जलदगतीने उपचार आणि प्रतिसाद मिळावा यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणेने कात टाकली आहे, हे विशेष.