श्रेष्ठ संघटक!

    दिनांक :16-Sep-2020
|
 स्मृतिगंध
 - डॉ. मनमोहन वैद्य
स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली, तो काळ कम्युनिझमचे सर्व जगात आकर्षण, वर्चस्व आणि चर्चेचा होता. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय विचाराने प्रेरित, शुद्ध भारतीय विचारावर आधारित एका कामगार आंदोलनाचा प्रारंभ करणे, तसेच अनेक विरोध व अडथळ्यांना पार करीत ते सातत्याने वाढवीत नेणे, हे पहाडासारखे दुष्कर कार्य होते. श्रद्धा, विश्वास आणि सतत परिश्रमाशिवाय हे शक्य नव्हते. त्या काळी दत्तोपंतांची मन:स्थिती कशी राहिली असेल, हे समजण्यासाठी एका दृष्टान्तकथेचे स्मरण होते :
 

sangh_1  H x W:
अजून वसंताचे वारेही वाहू लागले नव्हते.
आंब्याला मोहरही आलेला नव्हता.
तेव्हा, थंडगार वार्‍याच्या थापडा सहन करीत एक जंतू आपल्या बिळातून बाहेर निघाला.
त्याच्या नातलगांनी त्याला खूप समजावले की, आपल्या बिळातच राहून विश्रांती घे. अशा परिस्थितीत बाहेर निघशील तर मरशील. परंतु, त्याने कुणाचेही ऐकले नाही. महत्प्रयासाने तो आम्रवृक्षाच्या खोडावर चढू लागला. वर आंब्याच्या फांदीवर हिंदकळत असलेल्या एका पोपटाने त्याला पाहिले. आपली चोच खाली वाकवीत त्याने विचारले, ‘‘अरे ए जंतू, एवढ्या थंडीत कुठे निघालास?’’ ‘‘आंबे खायला,’’ त्या जंतूने उत्तर दिले. पोपट हसला. त्याला तो जंतू मूर्खशिरोमणी वाटला. तुच्छतेने तो म्हणाला, ‘‘अरे मूर्खा, मी वरपासून खालपासून सर्व ठिकाणी बघत आहे, या झाडावर तर आता आंब्याचे नामोनिशाणही नाही!’’
‘‘तुला आता दिसत नसतील.’’ जंतू डगमगत चालत असताना त्याला म्हणाला, ‘‘परंतु, मी तिथे पोहचेपर्यंत तिथे निश्चितच आंबे असतील.’’ या जंतूच्या उत्तरात एखाद्या साधकाची जीवनदृष्टी आहे. तो आपल्या क्षुद्रपणाकडे बघत नाही. प्रतिकूल योगायोगांनी तो घाबरत नाही.
 
लक्ष्याचे कुठलेही चिन्ह दिसत नसतानाही त्याला आपल्या लक्ष्यप्राप्तीबाबत संपूर्ण श्रद्धा आहे.  आपल्या एकेक पावलागणिक फळेदेखील पिकत जातील, याची त्याला तसूभरही शंका नाही. त्याचे नातलग अथवा पोपट काहीही म्हणोत, त्याची त्याला पर्वा नाही. त्याच्या अंतर्मनात तर फक्त एकच ओढ आहे आणि एकच पालुपद- ‘हरि से लागी रहो मेरे भाई, तेरी बनत बनत बन जाई।’ आणि आज आम्ही बघतो की, भारतीय मजदूर संघ भारताचे सर्वात मोठे कामगार संघटन बनले आहे.
 
तुम्ही कितीही प्रतिभासंपन्न का असेना, आपल्या सहकार्‍यांचे विचार आणि सूचना मोकळ्या मनाने ऐकणे आणि योग्य सूचनादेखील सहज स्वीकारणे, हा उत्कृष्ट संघटकाचा एक गुण असतो. दत्तोपंत असेच संघटक होते. कामगारांमध्ये कार्य करण्याचे ठरले तेव्हा त्या संघटनेचे नाव ‘भारतीय श्रमिक संघ’ ठेवण्याचा विचार झाला. परंतु, संबंधित कार्यकर्त्यांच्या पहिल्या बैठकीत अशी चर्चा निघाली की, समाजाच्या ज्या वर्गात आम्हाला कार्य करायचे आहे, त्यांना ‘श्रमिक’ शब्द समजणे कठीण जाईल. काही राज्यांमध्ये तर याचा योग्य उच्चार करण्यातही अडचण येईल. म्हणून ‘श्रमिक’च्या जागी ‘मजदूर’ या सोप्या शब्दाचा वापर करायला हवा. ही सूचना त्वरित स्वीकारण्यात आली आणि संघटनेचे नाव ‘भारतीय मजदूर संघ’ निश्चित झाले.
 
संघटनेत काम करणे म्हणजे ‘मी’पासून ‘आम्ही’पर्यंतचा प्रवास करणे. कर्तृत्ववान व्यक्तीसाठी असा प्रवास करणे सोपे नसते. तो आपल्या ‘मी’च्या प्रेमात पडला असतो. कुठे ना कुठे हा ‘मी’ अभिव्यक्त होतच असतो. संतांनी म्हटले आहे की, या ‘मी’ची गोष्टच काही और आहे. तो अज्ञानीला स्पर्शही करीत नाही, परंतु ज्ञानीचा गळा असा पकडतो की त्यापासून सुटणे फार कठीण होते. परंतु, संघटनेत, संघटनेसोबत आणि संघटनेसाठी कार्य करणार्‍यांना यापासून स्वत:ला वाचवावेच लागते. दत्तोपंत असेच होते. सहज गप्पांमध्येही एखादी महत्त्वाची बाब, दृष्टिकोन अथवा उपाय त्यांच्याकडून सांगितला गेला, तरीही ते ‘मी असे म्हणतो’च्याऐवजी नेहमीच ‘आपण असे म्हणू शकतो’ असे म्हणायचे. या ‘मी’चे ‘आम्ही’पर्यंतचे उन्नतीकरण सोपे नसते; परंतु दत्तोपंतांनी यातही निपुणता प्राप्त केली होती. जी एका संघटकाला अत्यंत आवश्यक असते.
 
दत्तोपंतांची आणखी एक गोष्ट लक्षणीय होती की, ते सामान्यातल्या सामान्य कामगाराला इतक्या आत्मीयतेने भेटायचे, त्याच्या खांद्यावर हात ठेवून चालतचालत त्याच्याशी गप्पा करायचे की, कुणाला वाटणार नाही की आपण एका अखिल भारतीय स्तराचे नेता, विश्वविख्यात चिंतकाशी बोलत आहोत. उलट, त्याला अशी अनुभूती व्हायची की, तो आपल्या परिवारातील एका ज्येष्ठ व्यक्तीशी, एका अत्यंत मायाळू वयोवृद्धाशी भेटत आहे. हे करते वेळी दत्तोपंतांची सहजता विलक्षण असायची.
 
त्यांचे अध्ययन खूपच व्यापक आणि सखोल होते. अनेक पुस्तकांचे संदर्भ आणि अनेक नेत्यांचे किस्से त्यांच्याशी चर्चेत यायचे. परंतु, एक जी गोष्ट माझ्या मनाला स्पर्शून जायची ती ही की, एखादा किस्सा अथवा चुटकुला दत्तोपंतांनी अनेकदा आपल्या बोलण्यातून सांगितला असेल, तो किस्सा अथवा चुटकुला माझ्यासारखा एखादा अनुभवहीन, कनिष्ठ कार्यकर्ता त्यांना सांगू लागायचा तर ते, हा किस्सा अथवा चुटकुला मला माहीत आहे, असा यत्किंचितही आभास समोरच्याला होऊ देत नसत. हा संयम सामान्य नाही, असामान्य आहे. मी अनेकदा बघतो, ‘‘मला तर हे माहीत आहे,’’ असे म्हणण्याचा किंवा जाणवून देण्याचा मोह अनेक ज्येष्ठ, अनुभवी कार्यकर्त्यांना होत असतो.
 
परंतु दत्तोपंत, जणू काही हे पहिल्यांदाच ऐकत आहे, अशा ओढीने व लक्षपर्वक ऐकायचे. त्यावर भावपूर्ण प्रतिसादही द्यायचे आणि नंतर त्यालाच अनुरूप आणि एक नवा किस्सा किंवा चुटकुला अवश्य ऐकवायचे. तळागाळातल्या कार्यकर्त्याशी इतकी जवळीक आणि संबंध श्रेष्ठ संघटकाचाच गुण आहे.
 
आपल्या कार्याच्या विस्ताराची उत्कंठा, इच्छा आणि प्रयत्न असतानाही अनावश्यक घाई करायची नाही, हादेखील श्रेष्ठ संघटकाचा गुण आहे. श्रीगुरुजी म्हणायचे- ‘‘हळूहळू घाई करा.’’ घाई करायला नको. माझे एक शेतकरी मित्र, महाराष्ट्रात शरद जोशी निर्मित ‘शेतकरी संघटना’ नावाच्या शेतकरी आंदोलनात विदर्भ प्रदेशाचे प्रमुख नेता होते. नंतर त्यांचा या आंदोलनाशी मोहभंग झाला तेव्हा माझ्या लहान भावाशी त्यांचा चांगलाच संपर्क व संवाद होता. त्या वेळी माझा भाऊ शेती करायचा. माझ्या भावाला वाटले की, भारतीय किसान संघाचे कार्य नुकतेच सुरू झाले आहे, तर या शेतकरी नेत्याला किसान संघासोबत जोडायला हवे. त्याने माझ्याशी चर्चा केली. मलाही ही सूचना चांगली वाटली.
 
तो एक मोठा नेता होता. किसान संघाचे कार्य दत्तोपंतांच्या नेतृत्वात सुरू झाले होते. म्हणून हा प्रस्ताव घेऊन मी माझ्या भावासोबत नागपुरात दत्तोपंतांना भेटलो. दत्तोपंत त्या शेतकरी नेत्याला ओळखत होते. मला खात्री होती की, किसान संघाला एक चांगला प्रसिद्ध शेतकरी नेता मिळाला, तर किसान संघाचे काम वाढण्यास मदत होईल आणि म्हणून दत्तोपंत या सूचनेला त्वरित आनंदाने स्वीकारतील. सर्व पूर्वपीठिका सांगून मी हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. दत्तोपंतांनी लगेच अमान्य केला. मी आश्चर्यचकित झालो. नंतर दत्तोपंत मला म्हणाले की, ‘‘आमचा किसान संघ फारच लहान आहे, म्हणून आम्ही या नेत्याला घेणार नाही. किसान संघ इतक्या मोठ्या नेत्याला पचवू शकणार नाही आणि हा नेता आमच्या किसान संघाला आपल्यासोबत ओढत नेईल. आम्हाला असे नको आहे.
 
’’ यावर मी त्यांना म्हटले की, जर किसान संघ त्यांना स्वीकारत नसेल, तर भाजपाचे लोक त्यांना आपल्या पक्षात घेऊन निवडणुकीलाही उभे करू शकतात. यावर दत्तोपंत शांतपणे म्हणाले, ‘‘भाजपाला घाई असेल, आम्हाला नाही.’’ त्यांचे हे उत्तर इतके स्पष्ट व आत्मविश्वासपूर्ण होते की, माझ्यासाठी तो एक महत्त्वाचा धडा होता आणि तेव्हा श्रीगुरुजींच्या ‘हळूहळू घाई करा’ या उक्तीचा गूढार्थ मला स्पष्ट झाला.
 
दत्तोपंत श्रेष्ठ संघटकासोबत एक दार्शनिकही होते. भारतीय चिंतनाच्या खोलीचे विविध पैलू, त्यांच्याशी चर्चेत सहज खुलायचे. कामगार क्षेत्रात कम्युनिस्टांचे वर्चस्व व दबदबा होता. म्हणून सर्व कामगार संघटनांची भाषा किंवा नारे, कम्युनिस्टांच्या शब्दावलीत असायचे. त्या काळी दत्तोपंतांनी कम्युनिस्ट नार्‍यांच्या जागी आपल्या भारतीय विचारशैलीची ओळख असणारे नारे प्रचलित केले. ‘उद्योगांचे राष्ट्रीयीकरण’च्या ऐवजी त्यांनी म्हटले, आम्हाला ‘राष्ट्राचे औद्योगिकीकरण, उद्योगांचे श्रमिकीकरण आणि श्रमिकांचे राष्ट्रीयीकरण’ हवे आहे.
 
कामगार क्षेत्रात अनावश्यक संघर्ष वाढविणारे असंवेदनशील नारे- ‘‘हमारी माँगे पूरी हो- चाहे जो मजबूरी हो’’च्या जागी त्यांनी म्हटले, ‘‘देश के लिए करेंगे काम, काम का लेंगे पूरे दाम।’’ अशा रीतीने, कामगार क्षेत्रातही सामंजस्य व राष्ट्रप्रेमाची चेतना जागृत करण्याचे सूत्र त्यांनी नार्‍यांच्या या लहानशा बदलातून दिले.
 
भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघ या संघटनांशिवाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्वदेशी जागरण मंच, प्रज्ञा प्रवाह, विज्ञान भारती इत्यादी संघटनांच्या पायाभरणीत दत्तोपंतांचे योगदान व सहभाग होता. त्यांनी भारतीय कलादृष्टीवर जो निबंध प्रस्तुत केला, तोच पुढे संस्कार भारतीचा वैचारिक अधिष्ठान बनला.
 
दत्तोपंत ठेंगडी यांच्यासारख्या श्रेष्ठ चिंतक, संघटक आणि द्रष्टा नेत्यासोबत राहून, चर्चा करून त्यांचे चालणे-बोलणे, त्यांचा सल्ला देणे हे सर्व प्रत्यक्ष अनुभव करण्याचे, त्यापासून शिकण्याचे मला सौभाग्य मिळाले. दत्तोपंतांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीला माझी विनम्र श्रद्धांजली! 
सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ