खनिज तेल, नैसर्गिक वायूची आयात 2050 पर्यंत दुप्पट होणार

    दिनांक :16-Sep-2020
|
नवी दिल्ली, 
ऊर्जेची मागणी सातत्याने वाढत असल्याने देशातील खनिज तेल व नैसर्गिक वायूची मागणी 2050 पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे, असे बीपी एनर्जी आऊटलूकने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 
jal_1  H x W: 0
 
उगवत्या अर्थव्यवस्थांचे नेतृत्व करणार्‍या भारतात मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर वाढला आहे. हा देश 2050 पर्यंतच्या मागणी-वाढीचा सर्वांत मोठा स्रोत असल्याचे दिसून येते, असे या अहवालात म्हटले आहे. देशाची नैसर्गिक वायूची जवळपास 50 टक्के गरज देशातील उत्पादनातून भागते, तर जवळपास 85 टक्के खनिज तेलाची आयात करावी लागते.
 
देशातील नैसर्गिक वायू आधारित ऊर्जा प्रकल्प नूतनकरणीय ऊर्जा क्षेत्राची वाढती मागणी संतुलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने आयातीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशाची एलपीजी मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मिश्र ऊर्जा क्षेत्रातील नैसर्गिक वायूचा वाटा 15 टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. सध्या ही पातळी 6 टक्क्यांच्या जवळपास आहे. सद्यःस्थितीत नैसर्गिक वायुची खते 28 टक्के, ऊर्जा 23, शहरांतील वायु वितरण संस्था 16, तेल शुद्धीकरण प्रकल्प 12 आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगांची 8 टक्के इतकी मागणी आहे.
 
2050 सालापर्यंत देशातील विजेचा वापर दरवर्षी 4 ते 4.6 टक्क्यांनी वाढणार आहे. देशातील सुबत्ता, उच्च जीवनशैली आणि औद्योगिक व घरगुती मागणी वाढणार असल्याने विजेचा वापर वाढत जाणार आहे. ऊर्जा आणि श्रमाशी निगडित हालचाली वाढत असून, सध्या विकसित देशांतून तसेच चीनमधून अत्यल्प उत्पादन खर्च येणार्‍या देशात हे उद्योग वळत असल्याने विजेची मागणी वाढतच जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
2050 सालातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या एकूण जागतिक मागणीच्या 20 टक्के मागणी ही चीनची असेल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. ही मागणी भारताच्या दुप्पट असेल. भारताने 2022 पर्यंत नूतनकरणीय ऊर्जा प्रकल्पांची क्षमता वाढवत 175 गिगावॉट नूतनकरणीय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. 31 जुलैपर्यंत देशात 88 गिगावॉट नूतनकरणीय ऊर्जा निर्मिती करण्यात आली.
(वृत्तसंस्था)