चीनला भारताचे सडेतोड उत्तर

    दिनांक :16-Sep-2020
|
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जेव्हा संयम दाखवायचा होता, तेव्हा जवानांनी संयम दाखवला आणि पराक्रम गाजवायचा होता, तेव्हा आपल्या पराक्रमाचे दर्शनही घडवले, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंगळवारी लोकसभेत ठणकावून सांगितले.
 
rs_1  H x W: 0
लडाखला लागून असलेल्या चीनसीमेवरील तणावपूर्ण वातावरणाच्या पृष्ठभूमीवर लोकसभेत निवेदन करताना राजनाथसिंह म्हणाले की, यावेळची सीमेवरील परिस्थिती पहिलेपेक्षा वेगळी आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास भारतीय लष्कर सज्ज आणि समर्थ आहे. जेव्हा देशासमोर कोणतेही आव्हान उभे राहिले, हे सभागृह लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आमच्या जवानांचा जोश आणि उत्साह बुलंद आहे.
 
सीमेवर लढण्यासाठी शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे, लष्करी जवानांच्या राहण्यासाठी तिथे पुरेशी आणि चांगली व्यवस्थाही करण्यात आली. लडाखमध्ये आम्हाला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हीच ती वेळ आहे, जेव्हा भारतीय लष्कराला त्याच्या शौर्य आणि पराक्रमाची जाणीव करून देत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश या सभागृहाने त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे, असे ते म्हणाले.
 
सीमेवरील तणावाच्या मुद्यावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना सिंह म्हणाले की, चीनच्या संरक्षण मंत्र्यांशी रशियात चर्चा झाली, तेव्हा सीमेवरील तणावावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची भारताची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर विशद केली होती. मात्र, त्याचवेळी भारत आपल्या एकता आणि अखंडतेसोबत सार्वभौमतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचेही त्यांना ठणकावून सांगितले होते.
 
10 सप्टेंबरला आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती, त्यावेळी चीन आतापर्यंतच्या शांती कराराचे पालन करत असेल, तर वादग्रस्त भागातून आपले जवान मागे घेण्याची तयारी जयशंकर यांनी दर्शवली होती, याकडे राजनाथसिंह यांनी लक्ष वेधले.