तीन ज्येष्ठ पत्रकारांच्या जाण्याने जीवनात पोकळी

    दिनांक :16-Sep-2020
|
-लक्ष्मणराव जोशी यांची श्रद्धांजली
नागपूर, 
नागपुरातील तीन पत्रकारांच्या अचानक जाण्याने जीवनात पोकळी निर्माण झाल्याची भावना तरुण भारतचे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी यांनी व्यक्त केली. तरुण भारतचे माजी मुख्य संपादक व कथालेखक दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे, माजी मुख्य संपादक वामनराव तेलंग आणि सामाजिक कार्यकर्ते हरिश अड्याळकर यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. प्रेस क्लबमध्ये या तिघांनाही आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
jn_1  H x W: 0
 
लक्ष्मणराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर, पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीश बोरकर, ब्रह्माशंकर त्रिपाठी व सुरेश अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.
लक्ष्मणराव जोशी म्हणाले, मामासाहेब, वामनराव व अड्याळकर हे तिघेही पत्रकार होते.
 
मामासाहेब घुमरे मला गुरुस्थानी होते, मार्गदर्शकही होते, माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे रहात. स्वतः मागे राहून ते मला पुढे करीत. वामनराव माझे मित्र होते. त्यांची दृष्टी विशाल, उदार होती. आलेले काम ते १०० टक्के चोख करीत. सुरेश भट त्यांचे चांगले मित्र होते. ‘रंगात रंगुनी साèया..ङ्क या ओळी त्यांनी वामनरावांकडे पाहूनच लिहिल्या असाव्यात.
 
अड्याळकर हे कुठल्याही वर्तमानपत्रात काम करीत नव्हते, नोकरी करीत नव्हते.परंतु आमच्या दृष्टीने ते सर्वार्थाने पत्रकार होते. नागपुरातील सर्व वर्तमानपत्रांनी त्यांना जणू प्रतिनिधी म्हणून रेल्वेत प्रतिनियुक्तीवर ठेवले होते. सर्व वर्तमानपत्रांशी त्यांचा संपर्क होता. हे तिघेही आमच्यावर अचानक आघात करून हे निघून गेले व आपल्या जीवनात पोकळी निर्माण झाली. त्यांचा मृत्यू जीवनाला चटका लावून जाणारा आहे.
 
मेघनाद बोधनकर म्हणाले की, मामा घुमरे, वामनराव तेलंग व हरिश अड्याळकर हे तिघेही आपापल्या क्षेत्रात जाणकार होेते. मामासाहेब घुमरे स्कॉलर संपादक होते. त्यांचे संपादकीय संशोधन व अभ्यासाधारित असायचे. आम्ही दोघे एकाचवेळी संपादक झालो. वामनरावांच्या लेखन शैलीवरही बोधनकरांनी प्रकाश टाकला. हरिश अड्याळकर यांच्याबद्दल बोलताना, ते परिश्रमी, जीव ओतून व झोकून काम करणारे होते, असे ते म्हणाले.
 
प्रदीप मैत्र म्हणाले की, हे तिघेही साधेपणाने जगले. त्यांचे जीवन तरुणांना आदर्शवत आहे. सुरेश अग्रवाल म्हणाले की, कोरोनाच्या संकटात या तिघांनाही आपण मुकलो. हे तिघेही साधेपणाने रहात. हरिश अड्याळकर अजब रसायन होते. स्वभाव, विचार व आचरणाने ते खरे लोहियावादी होते व त्यानुसारच ते जगले.
 
या तिघांचेही विचार आचरणात आणणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शिरीश बोरकर म्हणाले. प्रास्ताविक विश्वास इंदुरकर यांनी केले. दोन मिनिटे मौन पाळून तीनही महनीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे कुटुंबीय व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.