चंगळवादाला आवरण्याची आवश्यकता

    दिनांक :16-Sep-2020
|
आज जागतिक ओझोन संवर्धन दिन
नागपूर, 
शीतकपाट, वातानुकूलन यंत्रणा, सौंदर्य प्रसाधनांचा व धूर ओकणार्‍या वाहनांचा प्रचंड वापर व सातत्याने होत असलेली वृक्षतोड यामुळे तापमानात वाढ होत आहे. वातानुकूलन यंत्रणा व इतर यंत्रणात वापरल्या जाणार्‍या क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या थराला छिद्रे पडत आहेत. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण (अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन) पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रारणाचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होत आहेत व संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (युएनईपी) दरवर्षी 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन संवर्धन दिन साजरा केला जातो.
 

Ozone 1_1  H x  
 
‘ओझोन फॉर लाईफ’ अर्थात जीवन जगण्यासाठी ओझोन ही यंदाच्या म्हणजे 2020 या वर्षाची संकल्पना आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी ओझोनच्या थराचे संरक्षण केले पाहिजे व त्यासाठी प्रत्यक्ष कृतियोजना हाती घेतली पाहिजे, हा यंदाचा संदेश आहे.
ओझोनचा थर हा पृथ्वीपासून 16 ते 23 किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणार्‍या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा बचाव करतो. मात्र, क्लोरोफ्लोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन वातावरणात पसरत असल्याने आशिया खंडावर ओझोनच्या थराला 8 ते 10 टक्के तर उत्तर धृवाच्या दिशेने 30 टक्के व अंटार्टिकाकडे 60 टक्के छिद्र पडले आहे. त्यातून सूर्याची अतिनील किरणे भूपृष्ठावर येत आहेत. ओझोनचा थर विरळ झाल्याने तापमानात वाढ होऊन वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले आहे. काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून शीत प्रक्रिया उपकरणांचा वापर कमी केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच त्वचेचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत असून श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे.
 
चंगळवादाने सर्व पृथ्वीलाच संकटात टाकल्याचे ओझोन थर हे आणखी एक उदाहरण आहे. आज जागतिक ओझोन संवर्धन दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपण चंगळीच्या किती आहारी जायचे याचा विचार केला पाहिजे.