हिंदीला विरोध कशासाठी?

    दिनांक :16-Sep-2020
|
 
परवा संसदेच्या परिसरात घडलेल्या एका घटनाक्रमाने पुन्हा एकदा एका विषयावरची धूळ झटकली गेली आहे. एक मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. मतांच्या राजकारणासाठी किती खालची पातळी गाठायची, याचे तारतम्य भारतीय राजकारणात बहुधा अलीकडे कुणालाच राहिलेले नसल्याने, राष्ट्रहित खुंटीवर टांगून तमाशा मांडला जातोय् इथे.
 
hindi _1  H x W
 
नवी दिल्लीत संसदभवनासमोर हिंदी सप्ताह साजरा करण्यास विरोध करण्यासाठी, महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी ठिय्या मांडून बसण्याचा उपद्व्याप दक्षिण भारतातील काही प्रांतातील, काही नेत्यांनी केला. दक्षिणेतील राज्यांनी उत्तरेच्या राज्यांची भाषा असलेल्या हिंदीला विरोध करण्याची काहीशी कारणे सुरुवातीला होती.
 
हिंदी  भाषक राज्ये, तिथले नेते आपल्यावर, आपल्या भाषेवर अधिराज्य गाजवीत असल्याचा समज त्या कारणांत दडला होता, तिथवर काही प्रमाणात तो विरोध समजून घेण्यासही जागा होती. पण हळूहळू, राजकारणाचा शिरकाव होत गेला अन् qहदीला होणाèया विरोधाची तीव्रता नको तितक्या टोकाला पोहोचली. अजूनही टोकाची ती तीव्रता आणि कडवा विरोध तसाच कायम आहे. एकीकडे ‘मिले सूर मेरा तुम्हाराङ्क म्हणत भूतलावरील या आगळ्या देशाच्या जराशा वेगळ्या समाजरचनेचे गोडवे गायचे. त्याच्या बहुभाषकत्वाचे कौतुक करायचे आणि त्यातल्याच एका भाषेला असलेल्या विरोधाची धार मात्र कायम पाजळत राहायची, असे धोरण दक्षिणेतील नेत्यांनी कायम ठेवले. लोकांच्या भावना गोंजारत जमेल तेवढे, जमेल तेव्हा qहदीविरोधाच्या मुद्यावरून भडका उडत राहील, याचीही तजवीज व्यवस्थितपणे होत राहिली.
 
हे खरे आहे की, उत्तरेत मोघलांपासून तर अन्य आक्रमकांच्या झालेल्या राज्यक्रमणातून तिथे उर्दू, qहदीचा प्रभाव वाढला. दक्षिणेतील राज्यांचे, विशेषत: तामिळनाडूचे मात्र तसे नाही. तिथे द्रविडी प्रभावाचा कित्ता सातत्याने गिरवला गेला. तिथली संस्कृती, भाषा, कलावैभव, लोकमानस याच्या कोडकौतुकाची गणितं qहदीच्या प्रखर विरोधापाशी कशी येऊन ठेपली, हे कळण्यापूर्वीच स्थानिक नेत्यांच्या राजकारणाने त्याला वळसा घातला होता.
 
स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधात प्राणपणाने लढताना ज्या बाबी कधी आड आल्या नाहीत, त्या भाषाभिमानासारख्या बाबी स्वातंत्र्यानंतर एकमेकांसोबत राहताना अडसर कशा ठरू शकतात, हा प्रश्न मात्र कमालीचा बोचरा आहे. विचार करायला लावणाराही आहे. मात्र, स्थानिक अस्मितेपुढे राष्ट्राभिमान थिटा पडला अन् qहदीविरोधाचे आंदोलन वेग धरू लागले. कधी सार्वजनिक रस्त्यांवरील फलकांवरून qहदीचे नामोनिशाण मिटविण्याचा फतवा, तर कधी शालेय पुस्तकांतल्या धड्यांतून तिचे उच्चाटन... बस्स! एवढे एकच ध्येय उरले होते जणू अस्मितांच्या जतनाचे.
 
कॉफी वरचढ ठरवण्यासाठी चहाला नाकं मुरडायची. भाषा येत असली तरी qहदीचा दु:स्वास करायचा... तसं म्हटलं तर इंग्रजी तरी कुठे आमची भाषा होती? पण जगाची भाषा म्हणून, गरज म्हणून, अगदी वृथा अभिमान म्हणून म्हणा, पण शिकतोयच् ना आम्ही लोक इंग्रजी? मग या देशातली एक भाषा जी अधिकांश लोक बोलतात, समजतात, ज्या योगे समाजातले व्यवहार चालतात, ती भाषा केवळ अट्टहास म्हणून झिडकारण्याचे प्रयोजन अफलातून आहे. ते अनाकलनीय तर आहेच आहे.
 
भावनिक आधार असेपर्यंत qहदीविरोधाचे मर्म समजण्याजोगे तरी होते. पण, जसजसे त्यामागील हेतूवर राजकारण प्रभावी ठरू लागले, तसतशी त्याची धार बोथट होत गेली. पण, तरीही भावना भडकावत राहण्याचा उद्योग सुरू राहिला. तत्कालीन दिल्लीस्थित नेत्यांनीही कठोर भूमिका स्वीकारायचे सोडून चुचकारण्याचे धोरण अवलंबविले. परिणाम सर्वांच्या समोर आहे. एकात्मतेची भाषा आणि परस्परविरोधाचा विखार दोन्ही सोबतीने साकारायला सरसावताहेत लोक. पेरियार असोत, अण्णादुरई असोत की कामराज, या सर्वांनी केलेला विरोध qहदीला नव्हताच कधी.
 
तो हिंदीभाषक नेत्यांच्या कथित वर्चस्वाला होता. त्यांच्या माध्यमातून आपले दमन होत असल्याचा रोष त्यासाठी कारणीभूत होता. तो रोष कमी करण्याचे धोरण केंद्रातल्या नेत्यांनीही कधी अंगीकारले नाही. उलट, त्याला खतपाणी घालण्याचेच काम तिथेही होत राहिले. बहुधा त्यामुळेच की काय, पण इतर सर्व बाबतीत औदार्याचा परिचय देणारी, जगात जे जे म्हणून नवे, ते सारेकाही स्वीकारण्याची तयारी असलेली मंडळी, एकवेळ अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकावे लागले तरी चालेल पण qहदी शिकणे नको, असे म्हणू लागली. qहदी भाषा त्यांना त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार वाटू लागली. राज्ये दक्षिणेतली असोत की पूर्वांचलातली, qहदीबाबत भूमिका बदलण्याकरता त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न हवा त्या प्रमाणात कधी झालाच नाही. त्यातच राजकारण हावी होत गेले अन् मग मनं कलुषित होण्यापर्यंतचे दुष्परिणाम, हेच त्याचे फलित राहिले.
 
स्वातंत्र्याच्या सात दशकांतही हे चित्र बदललेले नाही, हे खरं दुर्दैव आहे. गांधी पुतळ्याच्या पायथ्याशी बसून दिल्या गेलेल्या qहदीविरोधाच्या घोषणा त्याच दुर्दैवाचं प्रतीक आहेत. अजून किती दिवस आम्ही लोक असल्या मुद्यांवर शक्ती खर्च करीत राहणार आहोत कुणास ठाऊक? पण, हे चित्र बदललं पाहिजे कधीतरी. आजवरची या देशावरची परकीय आक्रमणं काही शत्रू खूप ताकदवान होता म्हणून झालेली नाहीत. ताकदवान असूनही इथले लोक आपसात भांडत राहिले, याचा गैरफायदा घेत ते आक्रमणं करीत राहिलेत. इंग्रजांनीही तेच केलं. त्यातून बोध घेत, एकमेकांच्या सोबतीने पुढे जाण्याचा निर्धार व्हायला हवा ना! अलीकडे तर भारतीयच कशाला, फ्रेंच, जपानी, स्पॅनिश आदी विदेशी भाषा शिकण्यासाठीही सरसावतेय् नवी पिढी.
 
नोकèया मिळवण्याच्या उद्देशाने का होईना, पण परकीय म्हणवल्या जाणाèया भाषांचा स्वीकार होऊ लागलाय्. मग आपल्या देशातील एक असलेल्या भाषेचा तिरस्कार कशासाठी? अजून किती दिवस? राजकारण थांबवून वास्तवाचे भान जपले जाणार आहे की नाही कधीतरी? जग इतके पुढारले. आम्ही मंगळाच्या दिशेने झेप घेतो आहोत. पण असल्या छोट्या छोट्या मुद्यांवरची, कोत्या मनाचं प्रदर्शन घडवणारी मळभटं केव्हा फेकणार आहोत आपण?
 
कोणालाच स्वत:च्या भाषेचा अभिमान बाळगण्याची मनाई नाही इथे. कोणत्याच भाषेची सक्तीही नाही कुणावरच. qहदीचा स्वीकार केला नाही म्हणून qकवा त्याचा विरोध केला म्हणून कुणाला कधी कठोर शिक्षा झाल्याचे किस्सेही नाहीत ऐकिवात. उलट, नवीन शैक्षणिक धोरणात सर्वच भारतीय भाषांना अधिक सन्मान देण्याची, अधिक लोकांना त्या शिकता याव्यात अशी तरतूद असणार आहे. मग, सक्ती नसताना विरोध कशासाठी? बोलीभाषेपासून तर संस्कृतीपर्यंत, राहणीमानापासून तर खानपानापर्यंत, कलासंपन्नतेपासून तर इतर अनेक बाबींमधले वैविध्य, हीच या देशाची ओळख आहे. आंतरजालाने जग छोटे केले आहे. पर्यटनाने माणसं सीमा पार करून जग जवळ करीत आहेत. सीमेपलीकडचे लोक भारतीय पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी qहदी भाषा शिकू शकतात, तर तामिळी जनतेने का त्याला वृथा विरोध करावा?
 
अटलजी त्यांच्या भाषणातून एक किस्सा सांगत. एका दाक्षिणात्य व्यापाèयाने एकदा उत्तरेकडील प्रांतातून एक घोडा विकत घेतला. आधीचा मालक qहदी बोलायचा. घोड्यालाही त्याच भाषेची सवय झालेली. पण, आता नव्या मालकाची भाषा त्याला काही कळेना. शेवटी मालकाने निर्णय घेतला qहदी शिकण्याचा. अटलजी म्हणायचे, जर एका घोड्यासाठी ती व्यक्ती नवीन भाषा शिकू शकते, तर देशासाठी नाही का आपण qहदीचा स्वीकार करू शकत? १३५ कोटी लोकसंख्येचा, विस्तीर्ण भूभागात पसरलेला, वैविध्यानं नटलेला हा देश आजवरच्या तकलादू धोरणांच्या परिणामस्वरूप राष्ट्रभाषेविनाच राहिला आहे. ही परिस्थिती बदलायला हवी ना? कलुषित मनं स्वच्छ व्हायला हवीत. चित्रपट, पर्यटनातून सकारात्मक परिणाम घडून येताहेत. आता जरासा पुढाकार समजुतदार माणसांनीही घ्यायला हवा. खरं ना...?