माजी पालकमंत्री डॉ रणजीत पाटील धडकले शासकीय महाविद्यालयातील कोरोना कक्षात

    दिनांक :16-Sep-2020
|
- जिल्ह्यातील कोव्हीड रुग्णांचे समस्यांबाबत घेतली माहिती
अकोला,
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव गतीने वाढत असून रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांचे नातलग आणि रुग्ण यांचा संवाद नसणे, खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध नसणे, रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडणे आदी अनेक समस्या जिल्ह्यात आहेत. याबाबतची वस्तूस्थिती जाणून रुग्णांना दिलासा देण्याकरिता पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना कक्षात धडकले. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये यांच्यासोबत विविध अडचणींचा आढावा घेतला.
 
 
coro_1  H x W:
 
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव गुणाकार करीत असून शासकीय यंत्रणा कोलमडल्याचे चित्र आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका, वैद्यकीय अधिकारी यांच्यावरील ताण वाढला आहे. तर खाजगी रुग्णालयात रुग्णांकरिता खाटा उपलब्ध नाही. अनेक खाजगी रुग्णालयात रुग्णांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉ.रणजीत पाटील यांनी थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठून तेथील कोरोना कक्षाला भेट दिली तेथील रुग्णांशी व त्यांचे नातेवाईकांशी चर्चा केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ.श्यामकुमार शिरसाम यांच्यासमवेत चर्चा करुन रुग्णांची गैरसोय होत असल्याबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन रूग्ण व त्यांचे नातेवाईकांमध्ये संभाषण होण्यासाठी 24 तास दूरध्वनीची किंवा व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देशित केले.
 
 
 
या समस्यांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांचे समवेत मा जिल्हाधिकारी यांच्या कक्षात त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यामधे प्रामुख्याने जिल्ह्यातील रुग्णांना शासकीय रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयात रिक्त बेडची माहिती व्हावी यासाठी हेल्पलाइन नंबर किंवा एक अ‍ॅप तयार करावा जेणेकरून नागरिकांना रूग्णांना घेऊन वणवण फिरावे लागणार नाही व त्यांना दवाखान्यां मधील रिक्त बेड ची माहिती मिळेल त्यांची धावपळ होणार नाही.ज्या खाजगी रुग्णालयांनी कोरोना उपचारासाठी परवानगी मागितली असेल त्यांना त्वरित परवानगी द्यावी तसेच खाजगी रुग्णालयातील रुग्णाचे देयक लेखापरीक्षकामार्फत तपासण्याची व्यवस्था रुग्णालयात करावी,असेही त्यांनी सूचित केले. जिल्हाधिकार्‍यांनी यासर्व समस्यांचे निराकरण करण्याबाबत आश्वासित केले आहे. यावेळी अ‍ॅड. गिरीश गोखले आणि नगरसेवक आशिष पवित्रकार त्यांच्यासोबत होते.