नागपुरात शनिवार, रविवार जनसंचारबंदी

    दिनांक :16-Sep-2020
|
-30 सप्टेंबरपर्यंत हा नियम लागू राहील
-लोकप्रतिनिधींच्या बैठकीत महापौरांची घोषणा
नागपूर, 
शहरात कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. कोरोना बाधित आणि मृतकांच्या संख्येत दररोज वाढत होत आहे. त्यामुळे नागपुरकर जनता दहशतीत वावरत असून, या संसर्गाला आळा घालण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शनिवार, रविवारी जनसंचारबंदी लागू करण्याची घोषणा महापौर संदीप जोशी यांनी आज केली. शुक्रवारी रात्री 9.30 वाजतापासून ते सोमवारी सकाळी 7.30 वाजतापर्यंत नागपूर शहरात जनसंचारबंदीचे पालन करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
 
ज bandui _1  H
शहरातील कोरोनाची बिघडलेली परिस्थिती बघता आ. कृष्णा खोपडे यांनी लोकप्रतिनिधींची महापौरांनी बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार महापौर संदीप जोशी यांनी आज गुरुवारी शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या बिघडलेल्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. बहुतांश लोकप्रतिनिधींनी शहरात जनता कफ्यू लावावा, अशी मागणी केली.
 
बैठकीत आमदार सर्वश्री नागो गाणार, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.चिलकर आदी उपस्थित होते.
 
बैठकीत प्रारंभी महापौर संदीप जोशी व सर्व पदाधिका-यांनी शहरातील रुग्णालयांची संख्या, बेड्सची संख्या, कोविड केअर सेंटरची स्थिती, रुग्णवाहिका, शववाहिकांची संख्या आदींचा आढावा घेतला.
 
यावेळी शहरात टाळेबंदी लावण्यासंदर्भात भूमिका मांडण्यात आली. टाळेबंदीसंदर्भात झालेल्या चर्चेत बोलताना आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले की, आज शहराची स्थिती पाहता टाळेबंदीची नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जास्त गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. टाळेबंदी हा येणा-या स्थितीचा सामना करण्यासाठी करावयाच्या पूर्वतयारीचा काळ असतो. आज शहरात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा सज्ज असून त्या वाढीसाठी दररोजच मनपाचे प्रयत्न सुरू आहेत.
 
त्यामुळे शहरात टाळेबंदीची गरज नसल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले. नागरिकांनी मुखच्छादनचा वापर करणे, वेळोवेळी हात धुणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळले पाहिजे.
 
शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आलेख हा चिंताजनक असला तरी मनपाद्वारे त्यादृष्टीने सुविधा निर्माण करण्याचे कार्य प्रशासकीय स्तरावर युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात अनेक सुविधा आज मनपामध्ये वाढविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सुविधांमध्येही भर पडली आहे, असे सांगतानाच महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या टाळेबंदी न लावण्यासंदर्भातील भूमिकेचे समर्थनही केले.
 
शहरात दोन दिवस ‘जनसंचारबंदी लागू करणे आवश्यक आहे, अशी भूमिका सर्वच जनप्रतिनिधींनी यावेळी मांडली. शहरातील उपस्थिती आमदार आणि इतर जनप्रतिनिधींच्या सूचनेवरून महापौर संदीप जोशी यांनी येत्या शुक्रवारी (ता.18) रात्री 9.30 वाजतापासून ते सोमवारी (ता.21) सकाळी 7.30 वाजतापर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे जनसंचारबंदीचे पालन करावे, असे अवाहन केले. यानंतर पुढील शनिवारी आणि रविवारी म्हणजे 26 आणि 28 सप्टेंबरला सुद्धा याच प्रकारचे जनसंचारबंदीचे पालन करावे. त्यानंतर पुढे पुन्हा एकदा सर्व जनप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही महापौर यावेळी म्हणाले.
केवळ औषध दुकानाला परवानगी
जनसंचारबंदीच्या काळात औषधी दुकाने व्यतिरिक्त कोणतिही दुकाने, आस्थापने सुरू ठेवू नये, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले. तसेच शहरातील व्यापारी वर्गानेसुध्दा स्वयंस्फुर्तीने त्यांची दुकाने व आस्थापना दोन दिवस बंद ठेऊन या मोहिमेस सहकार्य कारावे, असेही आवाहन केले आहे.