व्यापारी झाले सतर्क; प्रतिष्ठाने कडकडीत बंद

    दिनांक :16-Sep-2020
|
- जनता संचारबंदीला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशीम,
कोरोना विषाणूच्या हाहाकार सद्या जगातील नागरिकांची झोप उडवत आहे. शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण विक्रमी संख्येने वाढत आहे. शहरात कोरोना समूह संसर्गाल अटकाव करण्याच्या दृष्टीकोनातून व्यापारी मंडळ आणि व्यापारी युवा मंडळाने 16 ते 22 सप्टेंबर पर्यंत जनता संचारबंदीचा निर्णय घेतला. आज पहिल्या दिवशी व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली.
 
 
band_1  H x W:
 
वाशीम जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3 हजारावर पोहचली आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येने व्यापार्‍यासह नागरिक भायग्रस्त आणि चिंताग्रस्त झाले आहेत. विषाणूला परतवून लावण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. व्यापार्‍यांनी देखील पुढाकार घेत सात दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार 16 सप्टेंबर पासून जनता संचारबंदीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. वाशीम शहरातील मेडीकल, रुग्णालय सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने कडकडीत बंद होती.
भाजी बाजार सुरु
शहरातील मुख्य चौकातील तसेच मुख्य बाजारपेठेतील दुकाने कडकडीत बंद असली तरी शहरालगत असलेली काही दुकाने उघडी होती. त्यात सुंदरवाटीका याठिकाणी भरणारा भाजी बाजार देखील दिवसभर सुरु होता. मात्र, ग्रामीण भागातून शहरात येणार्‍यांची संख्या नगण्य होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.
 
 
जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. मात्र, या दरम्यान शहरातील नागरिक रस्त्यावर बिनधास्तपणे फिरतांना दिसत होते. एकीकडे व्यापार्‍यांनी जनहितासाठी आपले व्यवसाय बंद केले. मात्र, दुसरीकडे जनताच संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे जनतेनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन व्यापारी मंडळाने केले आहे.