सुक्ष्म नियोजनातून कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा

    दिनांक :16-Sep-2020
|
- जिल्हाधिकारी दीपक कुमार मीणा
- कोरोना आढावा बैठक
गोंदिया,
कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात सर्वत्र वेगाने होत आहे. पुर्वी थोड्याफार प्रमाणात शहरी भागात पोहोचलेल्या कोरोनाच्या संसर्गाचा शिरकाव आता ग्रामीण भागात आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीणा यांनी दिले. 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सभेत मीणा बोलत होते. यावेळी आमदार सहेषराम कोरोटे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
charch_1  H x W
 
जिल्हाधिकारी मीणा पुढे म्हणाले, कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, बाधितांची गैरसोय होऊ नये यासाठी यंत्रणांनी रुग्णांकडे दुर्लक्ष करु नये. त्यांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. बाधित रुग्णांची तक्रार येणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. सर्व यंत्रणांनी आपसात योग्य समन्वय ठेवून काम करावे, जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय होणार नाही. तहसिलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोना बाधित रुग्णांकडे वैयक्तीक लक्ष्य देवून काम करावे. रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यासाठी तहसिलदार यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. होम क्वारंटाईनमधील रुग्ण बाहेर फिरतांना दिसणार नाही याकडे विशेष लक्ष्य देण्यात यावे. बाधित रुग्ण बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावे. बाधित रुग्णांना भोजन पुरवठा बाबतची माहिती जाणून घेतली. रुग्णांच्या जेवणाविषयी तक्रारी येणार नाही यासाठी रुग्णांना नास्ता व जेवण वेळेवर देण्यात यावे. तहसिलदार यांनी बाधित रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचे मनोधैर्य वाढवावे. दवाखान्यात दररोज साफसफाई होते की नाही याकडे विशेष लक्ष दयावे. तसेच परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष्य देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
 
 
प्रारंभी देवरी उपविभागीय अधिकारी राठोड यांनी आमगाव व सालेकसा तालुक्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचे सादरीकरण करून विस्तृत माहिती दिली. ‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी’ ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेअंतर्गत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने सर्व कुटूंबाचे सर्व्हे करायचे आहे. सर्व्हे करण्यास काही अडचणी येत असतील तर यासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. एका दिवसात 50 घराचे सर्व्हे करायचे आहे. यासाठी यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे. सर्व्हे करण्याचे काम 15 दिवसात पूर्ण झाले पाहिजे अशा सूचना श्री.मीना यांनी संबंधितांना दिल्या.
 
 
 
‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात यावी. घरोघरी जावून माहिती संकलीत करावी. प्रत्येक 50 घरामध्ये एक पथक तयार करण्यात यावे. कोरोनाबाबत रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे, जेणेकरुन रुग्णांमध्ये भीती निर्माण होणार नाही. रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करावा व सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन श्री.,मीना यांनी यावेळी केले. आमदार श्री कोरोटे म्हणाले, सालेकसा तालुक्यातील प्रत्येक गावात जावून फवारणी करण्यात यावी. नाहीतर मलेरीया होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले.
 
 
 
सभेला देवरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, आमगाव उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नकुल, सालेकसा तहसिलदार सी.जी.पित्तुलवार, आमगाव तहसिलदार डी.एस.भोयर, सालेकसा गटविकास अधिकारी एस.टी.तुरकर, आमगाव गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे, नायब तहसिलदार एस.बी.भूरे, डॉ.बी.डी.बारई, डॉ.किरण सोमाणी, डॉ.पांडे, डॉ.एम.वाय.गावळकर, डॉ.राजेंद्र टेंभरे, डॉ.बी.डी.बोपचे, डॉ.टी.के.नागपूरे, डॉ.पी.एस.बघेले, सालेकसा सहायक पोलीस निरिक्षक राजकुमार दुंगे, आमगाव सहायक पोलीस निरिक्षक श्यामराव काळे, डॉ.बी.आर.पटले, डॉ.खोब्रागडे, डॉ.ए.पी.खोडावकर व डॉ.एस.बी.पांचाल उपस्थित होते.