जालना-बुलडाण्याला जोडणारा पुल गेला वाहून

    दिनांक :17-Sep-2020
|
बुलडाणा,
सिंदखेड राजा तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या सोनोशी गावालगतच्या नदीवरील पुल 15 सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे जालना-बुलडाणा जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.सिंदखेड राजा तालुक्याच्या मराठवाड्याच्या सिमेलगत असलेल्या या भागात 15 सप्टेंबरला दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोनोशी व जालना जिल्ह्यातील शेवली या सात किमी अंतरावरील गावाला जोडणारा नदीवरील पुल वाहून गेला. मुळात आधीच हा पुल क्षतीग्रस्त झालेला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांची आता अडचण झाली आहे. तसेच मोठी वाहनेही या मार्गावरून जाण्यात अडचण झाली आहे. परिणामी हा पुल त्वरित दुरुस्त करून या भागातील दळणवळण पुर्ववत व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकही तशी मागणी करत आहेत.सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बुद्रूककडून जालना जिल्ह्यातील शेवली गावाकडे जाणारी वाहतूक यामुळे आता प्रभावीत झाली आहे. तसा हा पुल बराच जुना होता. या पुलाची उंचीही कमी होती. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पुर आला की दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होत होती. त्यामुळे आता पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्यामुळे हा पुल नव्याने करावा लागणार आहे. त्याची केवळ दुरुस्ती न करता या पुलाची उंचीही वाढविल्यास जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातील अंतर्गत ग्रामीण भागातील संपर्क कायमस्वरुपी सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
 
 
pulw_1  H x W:
 
बोरखेड नदीत साखरखेर्डा येथील एक जण वाहून गेला
येथील ग्रामीण पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या व ज्ञानगंगा अभयारण्याच्या पट्ट्यात असलेल्या बोरखेड येथील नदीत साखरखेर्डा येथील एक जण बेपत्ता झाला आहे. दरम्यान, त्याच्या समवेत असलेले तीन शिक्षक थोडक्यात बचावले आहेत. सध्या घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांसह बचाव पथकाचे कर्मचारी पोहोचले असून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयाचे पुरुषोत्तम मानतकर, अशोक गवई आणि कुवरसिंग राजपूत हे शिक्षक आणि दिलीप वैराळ हे चौघे बोरखेड येथे 15 सप्टेंबर रोजी आले होते. कुवरसिंग राजपूत यांचे हे गाव आहे. दरम्यान तरोडा येथील त्यांच्या मित्रांनाही ते भेटले होते. तसेच ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या पलढग प्रकल्प पाहण्यासाठी हे चौघेही गेले होते. दिवसभर तेथे थांबल्यानंतर सायंकाळी बोरखेड येथे महादेव मंदिरालगत वाहणाजया नदीत हे चौघेही आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावे पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दिलीप वैराळ हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले तर अन्य तीन शिक्षक सुखरूप आहेत. ही घटना 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी व ग्रामस्थ हे घटनास्थळी पोहोचले होते. मात्र दिलीप वैराळ यांचा शोध लागू शकला नव्हता. सध्या ते बेपत्ता असल्याचे ठाणेदार सारंग नवलकार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या ग्रामस्थ, पोलिस व बचाव पथक त्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान, बेपत्ता असलेले दिलीप वैराळ हे साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयावर शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.