कावळा आला...तासभर थांबला/video

    दिनांक :17-Sep-2020
|
-पितृपक्षात दिली भेट, बघितले घर
- हनुमाननगरातील दुर्मिळ प्रकार
- कावळ्याच्या हालचालींचे चित्रीकरण
-शैलेश भोयर  
नागपूर,
आठवणी हसवतात... आठवणी रडवतात... काहीच न बोलता आठवणी निघून जातात... तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात. आठवणीवरच संपूर्ण आयुष्य निघते आणि आठवणी माणसाला जगण्याचे बळ देतात. कठीण प्रसंगात तर पूर्वजांच्या आठवणी आनंद देऊन जातात. कावळ्याच्या मरणाने कुणी हळहळत नाही. मात्र, मोर मेला तर आपण हळहळतो. कारण, सौंदर्य नष्ट होते.
 
tur_1  H x W: 0
तरीसुद्धा रंगाने काळाकुट्ट आणि नको असलेला कावळा पितृपक्षात अतिशय महत्त्वाचा असतो. श्राद्धादी विधींच्यावेळी तासन्तास त्याची वाट बघितली जाते. कंटाळवाणा जीव होतो. तरीही कावळा भटकतसुद्धा नाही. प्रतीक्षेनंतर आला तरी घिरट्या घालतो. परंतु, त्या qपडांना स्पर्शदेखील करीत नाही.
 
शेवटी त्रासून पूर्वजांच्या नावे ते qपड सोडून निघून जाण्याची वेळ येते. मात्र, बुधवार ९ सप्टेंबरला हनुमाननगरातील मोहन झरकर यांच्या ‘वसंत विमलङ्क या निवासस्थानी कावळा आला. त्याने संपूर्ण घर पाहिले. तासभर मुक्काम केला आणि पितरांसाठी असलेले पात्रातील खाद्यपदार्थ खाल्ले, पाणी प्यायला आणि भूर्कन उडून गेला. पितृपक्षात कावळ्याचे घरी येणे याला चमत्कारच म्हणता येईल. कारण, कावळा दुर्मिळ झाला आहे.
 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पक्ष्यांना फटका बसला. त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. कधी लोभस चिमण्या आणि कावळ्यांची चक्क शाळा भरायची. चिव चिव अन् काव काव असा आवाज काही तरी सांगून जात होता. आता ते दिवस राहिले नाहीत. याच कावळ्याची पितृपक्षात साèयांनाच प्रतीक्षा असते. बुधवार ९ सप्टेंबर झरकर कुटुंबासाठी आनंदाचा ठरला.
 
tur_1  H x W: 0
नेहमीप्रमाणे नयना झरकर सकाळी ६.१५ वाजता फिरण्यासाठी निघाल्या. दारापर्यंत जात नाही तोच कावळा त्यांच्या पायाजवळ आला. पायाजवळच असूनही तो जात नसल्याने त्या घाबरल्या. त्यांनी लगेच पती मोहन झरकर यांना आवाज दिला. काय झाले म्हणून मोहन लगेच धावले, त्यांनी कावळ्याला उडवून लावले. नंतर त्या फिरायला निघून गेल्या.
 
मोहन घरात गेले तोच कावळा स्वयंपाक घरातून आत शिरला. यावेळी मात्र, मोहन यांना आपल्या आई-वडिलांची आठवण झाली. एक दिवसापूर्वी पितरांचे श्राद्ध झाले. आई-वडिलांसाठी पात्र ठेवलेच होते. मोहन यांच्या डोळ्यासमोर चक्क आई- वडील दिसायला लागले. अलिकडेच मोहन यांच्या मुलाने घराचे बांधकाम केले. त्याची आजी घर पाहायला आली असावी, असा त्यांना भास झाला. दरम्यान, हा कावळा मोहन यांच्या हातावर बसला.
 
तशाच स्थितीत त्यांनी त्याला आई- वडिलांचे छायाचित्र दाखविले, त्यानेही ते बघितले. मोहन यांनी कावळ्याला संपूर्ण घर दाखविले. घरातील सदस्यांना हाक मारली. तोपर्यंत पत्नी नयनाही फिरून घरी परतल्या होत्या. साèयांसोबत तो कावळ घर आणि घरातील प्रत्येक वस्तू निरखून पहात होता. घरात झालेला बदलही पहात होता. त्याला पात्रात खाद्यपदार्थ आणि पाणी दिले. त्यानंतर तृप्त होऊन तो ७.१५ वाजता उडून गेला.
 
जवळपास तासभर तो त्या घरी थांबला. या दुर्मिळ प्रकाराचे मोहन यांनी चित्रीकरणही केले आहे. उत्सुकतेपोटी त्यांनी नातेवाईकांना समाजमाध्यमांवर ती चित्रफितही पाठविली. हा दुर्मिळ प्रकार पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण, तसाही कावळा दिसेनासा झाला. कावळा क्वचितच दिसतो. दिसला तरी येत नाही आणि आला तरी qपडाला स्पर्श करीत नाही. हनुमाननगरातील ‘वसंत विमलङ्क निवासस्थानी तर चक्क त्याने घराची पाहणी केली. या प्रकारावर प्रत्येकाचा विश्वास बसेलच असेही नाही. श्रद्धा आणि विश्वास या दोन वेगवेगळ्या बाबी असल्या तरी हा दुर्मिळ प्रकार शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

tur_1  H x W: 0
हा तर शुभसंकेत
कावळा तसा घरात येत नाही. पितृपक्षात तो घरात आला असेल तर साक्षात पितरं येऊन गेले आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, असे समजायला हवे. त्याच्या रूपाने पितरं घरातील पदार्थ खाऊन तृप्त झाली असतील. त्यामुळे हा शुभ संकेतच आहे, असे मत या बाबत बोलताना वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेचे सचिव प्रशांत मनभेकर यांनी व्यक्त केले.