दोन दिवसांत सुमारे पन्नास हजार गृहभेटी

    दिनांक :17-Sep-2020
|
- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला गती
तभा वृत्तसेवा
अमरावती,
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेने गती घेतली आहे. महापालिका, जिल्हा परिषद व इतर विविध विभागांच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत गत दोन दिवसांत सुमारे 50 हजार गृहभेटी देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी ही मोहिम महत्वाची असून नागरिकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन विविध मान्यवरांनी केले आहे.
 
kutumb_1  H x W 
 
मोहिमेने घेतला वेग
प्राप्त अहवालानुसार, अमरावती शहरात महापालिकेकडून 15 सप्टेंबरला 10 हजार 771 व 16 सप्टेंबरला 11 हजार 510 कुटुंबांना भेट देण्यात आली. हे दोन दिवस मिळून लक्षणे आढळणा-या 143 व्यक्ती आढळून आल्या. इतर आजाराचे 2 हजार रूग्ण आढळून 163 रूग्ण आढळून आले. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या व ठिकठिकाणच्या आरोग्य पथकांकडून 15 सप्टेंबरला या एकाच दिवसात 11 हजार 739 गृहभेटी देण्यात आल्या. त्यात 217 लक्षणे असलेले व 5 हजार 430 इतर आजाराचे रूग्ण आढळून आले.
 
 
दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करावा : पीयुष सिंह
विभागीय आयुक्त पीयुष सिंह म्हणाले की, कोरोना प्रतिबंधासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत प्रत्येकाची ताप व इतर तपासणी, ज्येष्ठ नागरिक, तसेच इतर आजाराच्या रूग्णांची तपासणी व आवश्यक उपचार मिळवून देणे व दक्षतापालनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मास्कचा वापर, स्वच्छता व सोशल डिस्टन्सचा या दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करून व आरोग्य पथकाला अचूक माहिती देऊन मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
कारवाईची वेळच येऊ देऊ नये : पोलिस आयुक्त
आपत्ती व्यवस्थापन कायद्याने नागरिकांना दक्षता सूचनांचे पालन करणे आवश्यक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स न पाळल्यास व इतरांचे आरोग्य धोक्यात आणल्यास दंड होऊ शकतो. मात्र, कारवाईची वेळच कुणीही येऊ देऊ नये. सजग राहून सुरक्षितता जोपासावी. हेच सर्वांच्या हिताचे आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन शहराच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केले.
 
 
कोरोनावर एकजुटीने मात करूया : पोलिस अधिक्षक
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स आदी नियम न पाळणा-यांवर 300 रूपये दंडाची कारवाई होणार आहे. मात्र, कारवाईची गरजच पडू नये. कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे सर्वांनी दक्षतेचे पालन करत एकजुटीने कोरोनावर मात करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक हरी बालाजी यांनी केले आहे.