सुपर स्पेशलिटी रुग्णालयाची कामे १ महिन्यात पूर्ण करा

    दिनांक :17-Sep-2020
|
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश
अकोला,
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे क्रियाशील बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यासाठी अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
 
papalkar_1  H x 
 
गुरुवारी, जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोरोनाच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. श्यामकुमार सिरसाम, डॉ. रमेश पवार, सीपीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता बी. सुनील कुमार, संजय शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे कामे त्वरित पूर्ण करावीत यावर नियंत्रण अधिकारी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गजभिये व उपअधिष्ठाता डॉ. घोरपडे हे काम पाहतील. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला लागणारे यंत्रसामुग्री तसेच राहिलेले इतर कामे व कोविड हेल्थ सेंटर म्हणून लागणाऱ्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
 
 
आयुर्वेदिक महाविद्यालय व अनुसंधान केंद्रामध्ये कोविड हेल्थ केअर युनिट सुरू करण्याबाबत प्राथमिक तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आयुर्वेदिक महाविद्यालयाची पाहणी केली. आयुर्वेदिक महाविद्यालयात पन्नास खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. कोवीड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यासाठी खाटांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.