डॉ. रवीभूषण नव्हे अमरावती भूषण

    दिनांक :17-Sep-2020
|
- कोरोना योद्धांप्रती कृतज्ञता
- भाजपाने केला ह्रदयस्पर्शी सत्कार
तभा वृत्तसेवा
अमरावती,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपाने सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी भाजपा नेते व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी मंत्री आ. डॉ. रणजित पाटील आणि भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कोविड कक्षात अहोरात्र सेवा देणार्‍या डॉ. रवीभूषण यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला आणि कोरोना योद्धांनप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
 
bhushan_1  H x  
 
याप्रसंगी मनपाचे भाजपा पक्ष नेता सुनील काळे, कौशिक अग्रवाल, गोपाल गुप्ता, श्याम जोशी, जितेंद्र कुरवाणे, देवानंद देशमुख, योगेश निमकर, प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोना महामारीच्या भयावह वादळात एक सरकारी दीपस्तंभ अमरावतीत भक्कमपणे उभा आहे. क्षणभरही आळसाला शरण न जाता अव्याहतपणे ही वन मॅन आर्मी कोरोना विरुद्ध झुंज देत आहे. नुसतं डॉ. रवीभूषण आपल्यावर उपचार करणार म्हटलं की रुग्ण अर्धा बरा होतो. तळमळ, जिद्द, तडफड पाहिल्यावर अनुभूतीच्या आधारे लोकांच्या मनात कोरोना काळात डॉ. रवीभूषण यांची प्रतिमा ‘अमरावती भूषण’ झाली आहे, असे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. सर्वत्र मृत्यूचे थैमान आहे. कोविडग्रस्तांची सेवा करता करता अनेकांना प्राण गमवावे लागले. यात आरोग्यकर्मी आहेत. स्वच्छताकर्मी आहेत. या पार्श्वभूमीवर माईल्ड कोरोना बरा झाल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून स्वतः चा गवगवा करून घेणार्‍यांची कीव केलेलीच बरी ! अशा संकटकाळात लोकांना दिशादर्शकांची आवश्यकता असते. डॉ. रवीभूषण म्हणजे मास्टर ऑफ कोविड, अशी त्यांची ख्याती झाली. हा माणूस थकत नाही. सतत धावतो. रुग्णांना जीव लावतो. बेधडक कोविड वार्डात वावरतो. कोरोनावर औषध नाही. ठिकठिकाणी यशस्वी झालेले प्रयोग आणि स्थानिक पातळीवर आलेले अनुभव, केंद्र - राज्याकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना याची सांगड घालत उपचार करायचे असतात. प्रथम डॉक्टरची हिंमत आणि तो रुग्णांना किती हिंमत देण्यात यशस्वी ठरतो यावर बरेचसे रुग्णाचे दुरुस्त होणे अवलंबून असते. अर्थात डॉ. रवीभूषण यांच्यासोबत त्यांच्या टीमला श्रेय दिलेच पाहीजे. मूळचे दाक्षिणात्य म्हणजे कर्नाटकातील म्हैसूरचे असलेले डॉ. रवीभूषण डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी अमरावतीत आले आणि शिक्षण पूर्ण झाल्यापासून इर्विन व नंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सेवारत आहेत.