जिल्ह्यात जनता कर्फ्यु होणार

    दिनांक :17-Sep-2020
|
बुलढाणा,
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी केले आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला आज जिल्हा नियोजन भवनामधील पालकमंत्री यांच्या दालनात आयोजित बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी षन्मुखराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अति जिल्हाधिकारी दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडित, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
janta curfew_1   
बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या5 हजाराच्यावर गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात जनता कर्फ्यु घोषित करण्यात यावा अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी केली होती. त्यानुसार जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दूध डेअरी, मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, बँक व शासकीय कार्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, आस्थापना बंद ठेवण्यात याव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
जे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यांवर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व जनतेने जनता कर्फ्यु कडकडीत पाळणे गरजेचे आहे.
 
 
शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले आपले कुटुंब आपली जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शासनाच्या वतीने आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने सर्वेक्षणाच्या वेळी घरी हजर राहणे आवश्यक आहे. त्यावेळी देखील हा जनता कर्फ्यु महत्वाचा ठरणार आहे.