मेळघाटातील टेलिमेडिसीन सेवा ‘आजारी’

    दिनांक :17-Sep-2020
|
- मोजतेय अखेरच्या घटका
- उपचार करण्यास डॉक्टरांना अडचण
नितीन दुर्बुडे
पथ्रोट,
टेलिमेडिसीन सेवेच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून गंभीर आजार किंवा तातडीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत याबाबतचा सल्ला घेऊन रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यास मदत होते. मात्र मेळघाटात टेलिमेडिसीन सेवा सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच बंद पडली आहे. त्यामुळे सरकारी योजना चांगली पण वेशीला टांगली.ही म्हण या टेलिमेडिसीनच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे. सध्या मेळघाटातील टेलिमेडिसीन सेवा नावालाच उरली आहे.
 
 
doc_1  H x W: 0
 
राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री यांनी मोठा गाजावाजा करून मेळघाटातील सेमाडोह आणि हरीसाल येथे टेलिमेडिसीन सेवेचा शुभारंभ केला. मात्र अल्पावधीतच ही सेवा कुचकामी ठरली आहे. या टेलिमेडिसीनच्या माध्यमातून गंभीर आजार किंवा तातडीची तथा गुंतागुंतीची शस्त्रक्रियेवेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत या संदर्भात थेट मुंबई, पुणे, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णांवर उपचार करणे सोयीस्कर होत होते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली टेलिमेडिसीन सेवा मेळघाटात सध्या बंद पडल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे येथील डॉक्टर टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सल्ला घेऊन उपचार न करता केवळ रुग्णांना रेफर करण्यातच धन्यता मानत आहे.
 
 
 
एखाद्यावेळी आजारावरील उपचारासंबंधित किचकट प्रश्न निर्माण होतो, अशावेळी रुग्णांना नागपूर, मुंबई वा पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात येते. या पार्श्वभूमिवर नव्या संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे ही सुविधा विकसित केली आहे. त्यात टेलिमेडिसीन सुविधेद्वारे जगभरातील तज्ज्ञांशी संपर्क करून संबंधित रुग्णांवर काय औषधोपचार करावेत याबाबत सल्ला घेणे शक्य आहे. संबंधित रुग्णांच्या आजारांची इत्यंभूत माहिती टेलिमेडिसीन यंत्रणेद्वारे तज्ज्ञांना दिल्यास ते तत्काळ संबंधित रुग्णांच्या औषधोपचाराविषयी मार्गदर्शन करतात परिणामी रुग्णांना इतर ठिकाणी रेफर न करता जागेवरच औषधोपचार करण्यास मदत होते.
 
 
 
यंत्रात झाला बिघाड
टेलिमेडिसीन केंद्रावरील यंत्रात बिघाड झाल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे मेळघाटातील टेलिमेडिसीन सेवा बंद आहे.
-डॉ. दिलीप पांडे
अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, मेळघाट