‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवा

    दिनांक :18-Sep-2020
|
- पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना
वाशीम,
कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
 
shambhuraj desai_1 & 
 
यावेळी जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, सभापती चक्रधर गोटे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाकधने यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. यासोबतच घरोघरी जावून प्रत्येक व्यक्तीची थर्मल गन व पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने तपासणी होणार आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसून येतील, अशा व्यक्तींची कोरोना विषयक चाचणी केली जाईल. त्यामुळे कोरोना संसर्गाचे लवकर निदान व उपचार होणे शक्य होणार आहे. तसेच सदर बाधिताकडून इतरांना होणार्‍या संसर्गावरही नियंत्रण येईल.
 
 
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 1 हजार पथके तयार केली आहेत. आरोग्य विभागाचे हे पथक आपल्या गावात आल्यानंतर संबंधित गावाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांनी सुद्धा त्यांच्या सोबत राहून त्यांना सहकार्य करावे, असे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले.
 
 
जिल्ह्यात सद्यस्थितीत ऑक्सिजन बेडची संख्या पुरेशी असली तरी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून या सुविधेतही वाढ करण्याबाबत सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन बेड तसेच त्यापैकी वापरत असलेले आणि रिक्त असलेले बेड याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन स्वरुपात उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने ‘डॅशबोर्ड’ची निर्मिती करावी, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.