आमदार पाटणी करणार आंदोलन

    दिनांक :18-Sep-2020
|
- मतदारसंघात शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्याला उत
कारंजा लाड,
कारंजा मानोरा मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार, मटका व अवैध दारूविक्री असे अवैध धंदे गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. परंतु, कोणाच्या तरी आशिर्वादाने त्या अवैध धंद्यांकडे लोकप्रतिनिधींसह पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. परिणामी, अवैध धंदे व्यावसायिकांचे मनोबल उंचावले व दिवसेंदिवस धंद्यात वाढ झाली.
 
patni_1  H x W: 
 
गेल्या काही दिवसात कारंजा शहरातील एका जणांने अवैध धंदे बंद करण्यासाठी आ. पाटणी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांकडून तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. तर कारंजा शहरातील प्रहार संघटनाही अवैध धंदे बंद करण्यासाठी आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन कारंजा शहरासह ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपरोक्त घटनांवरून कारंजा व मानेारा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात अवैध धंदे सुरू असल्याचे अधोरेखित हेाते. त्यानंतर लोकप्रतिनिधींचे या अवैध धंद्यांकडे लक्ष गेले आणि मतदारसंघातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आ. पाटणींनी तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
 
 
येत्या तीन दिवसात कारंजा व मानोरा या दोन्ही तालुक्यातील शहरीसह व ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद न झाल्यास आ. पाटणी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला आहे. यासाठी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांना सुध्दा अवगत करण्यात आले आहे. कारंजा व मानेारा तालुक्यात पोलीस प्रशासन कार्यरत असतांना व त्यांच्यावर अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी असतांना एका लोकप्रतिनिधीला अवैध धंदे बंद करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ का आली, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तर आतापर्यंत लोकप्रतिनिधींचे या प्रकाराकडे लक्ष का गेले नाही असाही प्रश्न या निमित्ताने मतदारसंघातील जनतेतून उपस्थित केल्या जात आहे. शिवाय येत्या तीन दिवसात खरोखर मतदारसंघातील अवैध धंदे बंद केल्या जातात का, याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.