नमस्कार पुरुषोत्तम वासुदेवा!

    दिनांक :18-Sep-2020
|
शालिवाहन शके १९४२ शार्वरीनाम संवत्सरातील अधिक अश्विन मास यंदा प्रारंभ होत असून तो १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२० पर्यंत चालेल. पंचागात दरवर्षी चैत्र ते फाल्गुन अशी बारा मासांची रचना असते. मग हा अधिक मास आला कुठून? पंचांगात दर तीन वर्षांनी येणाèया या महिन्यास मलमास, पुरुषोत्तम मास qकवा धोंड्याचा मास असेही म्हणतात.
 
narayan _1  H x
 
 
वसिष्ठ सिद्धांतानुसार भारतीय qहदू दिनदर्शिका अथवा पंचाग हे सूर्य मास आणि चांद्र मास गणनेनुसार प्रचलित आहे. अधिक मास हा चांद्र गणनेचा अतिरिक्त भाग आहे. हा अतिरिक्त काळ बरोबर ३२ महिने, १६ दिवस आणि ८ घटी एवढ्या अंतराने येतो. मुळात सौर आणि चांद्र वर्षातील अंतराचे संतुलन साध्य करण्यासाठी अधिक मासाची रचना आहे. भारतीय कालगणनेनुसार प्रत्येक सूर्य वर्ष ३६५ दिवस आणि ६ तासांचे, तर चंद्र वर्ष ३५४ दिवसांचे असते. चांद्र आणि सूर्य वर्षात अकरा दिवसांचे अंतर असल्याने दर तीन वर्षांनी हे अंतर एक महिना तीन दिवसांचे (तेहत्तीस) भरते.
 
यालाच अधिक मास म्हणतात. सामान्यतः प्रत्येक चांद्रमासात एक सौर संक्रांती होत असते. ज्या मासात एकही सौर संक्रांती घडत नाही त्यास अधिक मास म्हणतात. उदाहरण- ज्या सूर्याची मेषसंक्रांती चैत्र अमावास्येला घडली व त्याची वृषभसंक्रांती वैशाखात न होता ती त्यापुढील महिन्याच्या प्रतिपदेस घडली, तर हा संक्रांतिविहीन मास अधिक वैशाख ठरेल व त्यापुढील मास निज वैशाख होईल. चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे बारा वर्षांनी, आषाढ अठरा वर्षांनी, भाद्रपद चोवीस वर्षांनी, अश्विन १९ वर्षांनी व कार्तिक ७०० वर्षांनी अधिक मास म्हणून येतात. कार्तिकापुढील चार महिने कधीही अधिक मास होत नाहीत. चैत्रापासून अश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसèया राशीत जायला जास्त वेळ लागतो.
 
क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. ज्या वर्षी चैत्र हा अधिक मास असतो, त्या वर्षी अधिक मासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढीपाडवा मात्र लगेचच नंतर येणाèया निज चैत्र महिन्यात येतो.
 
म्हणजे त्या वर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो. काही वेळा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशा वेळी क्षयमास येतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाहीत, क्षयमास येतात. क्षयमासाच्या आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हातरी थोड्या अंतराने दोन अधिक मास येतात. पद्मपुराणात पुरुषोत्तम मास माहात्म्य या प्रकरणात अधिक मासाचे महत्त्व वर्णिले आहे.
 
त्यात अधिक मासात करायची व्रते, दानधर्म व उद्यापन असा विधी सांगितला असून फलश्रुतीही निवेदिली आहे. एका रंजक कथेनुसार अधिक मासाची देवता होण्यास कोणीही तयार नव्हते, अशा वेळी ऋषी-मुनींनी  भगवान श्रीहरी नारायणास साकडे घालून या अतिरिक्त महिन्याचा भार घेण्याची विनंती केली. साधू चालतेबोलते ब्रह्म असल्याने श्रीविष्णूने अधिक मासाचा अधिपती होण्यास स्वीकृती प्रदान केली आणि तेव्हापासून अधिक मास पुरुषोत्तम मास या नावाने प्रसिद्ध झाला. ब्रह्मलीन समर्थ सद्गुरू श्री मनोहरनाथ महाराज म्हणतात.
 
ओंकार श्रीअच्युत अद्वितीया
अनाद्यत अव्यक्त आनंद अभया
त्रिकालज्ञ यज्ञेश्वर ज्ञानदेवा
नमस्कार पुरुषोत्तम वासुदेवा।
 
सामान्य पुरुषाचा (मनुष्याचा) उत्तम पुरुष (पुरुषोत्तम) होण्यासाठी तन आणि मन पवित्र असले पाहिजे आणि म्हणून या मासात पुरुषोत्तमाची विशेष उपासना सांगितली आहे/ 
कपींद्रा कलानाथ कैवल्यदाता
कालीयमर्दन कलीनाशकर्ता
केशवकृपाळू कुशलस्वभावा
नमस्कार पुरुषोत्तम वासुदेवा।
 
पापक्षालनासाठी अधिक मासात अपूपाचे(अनारसे) दान कांस्यपात्रात भरून त्याचे दान सांगितले आहे. अपूप न मिळाल्यास
बत्तासेदेखील चालतात. महाराष्ट्रात अधिक मासातील वाण हे जावयाला देण्याची रीत आहे. कन्या व जावयाला लक्ष्मीनारायणस्वरूप मानले जाते, त्यावरून ही पद्धत आली असावी. अधिकस्य अधिकं फलम् या न्यायाने अधिक
मासात नामसाधना अधिक केली पाहिजे. गुरुमंत्रजप, अखंड नामसंकीर्तन, देवाचा एक्का (जागर), विविध धार्मिक ग्रंथपारायण याशिवाय आधुनिक काळानुसार वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, रक्तदान, सामाजिक कार्यात समयदान इत्यादीदेखील अधिक मासात करता येईल. कोरोनाच्या जागतिक महामारीचा जीवघेणा अखेरचा टप्पा मानवजातीला अधिकाधिक सावध होण्याचा संकेत देत आहे. मुकुंद, माधव, मदनमनोहर, राधा प्रियकर असलेल्या गिरिधारी श्रीहरी नारायणाला प्रेमभावे आळविताना सद्गुरू मनोहरनाथ महाराजांनी सर्वाभूती प्रेमभावाची मागणी केली आहे.
 
गिरिधारी राधाप्रिय हे गोविंदा महापुरुष
मनोहरनाथ हे मुकुंदा
प्रेमप्रवीणा दे प्रेमभावा नमस्कार पुरुषोत्तम वासुदेवा।

अधिक अश्विन महिन्याचा उपयोग देवदेश-धर्मकार्यार्थ कृतसंकल्पित होण्यासाठी व कोरोनाच्या संकटातून समस्त विश्वाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पुरुषोत्तम नारायणाला मनोभावे प्रार्थना करू या... नमस्कार पुरुषोत्तम वासुदेवा!
 
-डॉ. भालचंद्र माधव हरदास
९६५७७२०२४२