सर्वेऽत्र सुखिनः सन्तु।

    दिनांक :19-Sep-2020
|
मोक्षार्थ
 
अखिल विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ही वेदप्रणित प्रार्थना आहे. प्रार्थना ही बहुधा परमात्म्याचीच केलेली असते आणि असावी, कारण त्या प्रार्थनेतील भक्तिभाव, कारुण्य, सत्कार्यासाठी सहाय्यार्थ याचना या सगळ्या गोष्टी फलद्रुप करण्यासाठी एकमेव तो परमात्माच समर्थ असतो. वैदिक मंत्रांमध्ये आणि संतवचनांमध्ये सुद्धा ज्या प्रार्थना असतात त्यात जगत्कल्याणाच्याच प्रार्थना आणि याचना असतात. संत स्वतःसाठी, ‘तुझे भक्तिसुख देई मज प्रेम’ एवढीच याचनामिश्रित प्रार्थना करतात. पूर्ण जगाच्या सुख-शांतीसाठी ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ ही प्रार्थना म्हटली जाते; ती आपली संस्कृती आहे.
 
सर्वेऽत्र सुखिनः सन्तु।
सर्वे सन्तु निरामयाः॥
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःखमाप्नुयात्॥
 
‘‘अत्र म्हणजे येथे, या जगात सर्व लोक सुखी असावेत, ‘सर्वे सन्तु निरामयाः’, निरामय म्हणजे आरोग्यसंपन्न, (आमय = रोग, पीडा। निः+आमय = रोगमुक्त, पीडारहित) सर्व लोक निरोगी असावेत, ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु’ म्हणजे सर्वांना शुभ घटना, मंगळ (भद्र) कर्मे दिसावीत, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्- अर्थात कोणालाही दुःखानुभव येऊ नये,’’ अशी मंगल कामना सर्व जगासाठी केली आहे. तरी मनात किन्तु येतो तो असा की, वेदकाळापासून आजच्या काळापर्यंत एवढा प्रदीर्घ काळ असंख्य लोक ही प्रार्थना म्हणत आहेत तरी त्या प्रार्थनेतील गोष्टींचा अनुभव कधीतरी कोणाला आला आहे का? सर्व जगाचा जेवढा इतिहास आज उपलब्ध आहे त्यावरून जगात कोणत्याही काळी सर्व लोक सुखी-स्वस्थ होते, अशी माहिती मिळत नाही. माणसामाणसांतील द्वेष-मत्सर, स्पर्धाभाव, हुकूमत गाजविण्याची महत्त्वाकांक्षा इत्यादींमुळे माणसांच्या समाजात दीर्घकाळ असे स्वास्थ्य राहू शकत नाही. जेथे स्वास्थ्य नाही तेथे शांती आणि सुख राहू शकत नाही. याशिवाय सर्व सृष्टीच्या अस्तित्वाला सुद्धा अशाश्वतीचा आणि परिवर्तनशीलाचा गुणधर्म त्रिकालासाठी अढळ असा चिकटलेला असताना दीर्घ काळाची स्वस्थता राहील तरी कशी? मग ‘सर्वेऽत्र सुखिना सन्तु’या मंत्राचा अनुवाद कसा करावा? काही तत्त्वचिंतक असे म्हणतात की परमेश्वराने या सार्‍या विश्वात सुखःदुःख हे समतोल, तुल्यबल ठेवले आहेत. त्यामुळे पूर्णपणे सुखी जग ही कल्पनाच अतार्किक, अशास्त्रीय आहे. फक्त पूर्ण सुखाचा अनुभव ईश्वरी अवतारांच्या सुद्धा जीवनात नाही.
 
 
dnyaneshwar_1  
 
श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ‘पसायदान’ या लोकप्रिय प्रार्थनेबद्दल एका विद्वान व्यक्तीने केलेल्या मतप्रदर्शनाची या ठिकाणी आठवण होते. ती व्यक्ती म्हणाली होती, ‘पसायदानातील भाव हे एका महात्म्याचे महास्वप्न आहे.’ या विधानाचा अर्थ असा की महात्मा अशा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेले पसायदानातील विचार आणि भावना या सुद्धा महान असणारच, तरी सुद्धा त्या या जगात संभवनीय आहेत का? असा प्रश्न पडल्यामुळे ते एक स्वप्न आणि महात्म्याचे असल्यामुळे महास्वप्न, असे त्या विद्वान व्यक्तीचे म्हणणे असावे. एका दृष्टीने ते खरेही आहे. आपण जो जगाचा इतिहास वाचतो, आपल्या आधीच्या दहा पिढ्यांच्या कथा ऐकतो, वर्तमान सामाजिक घडामोडींबद्दल ऐकतो त्यात कुठे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेले ‘जीवांचे परस्पर मैत्र’ दिसत नाही. दुरितांचे (पातकांचे) तिमिर (अंध:कार) नष्ट होण्यापेक्षा अधिकाधिक वाढत आहे, स्वधर्मसूर्याचा प्रकाश दिसण्यापेक्षा मनुष्यधर्मरहित आचारच अधिक प्रबळ झालेला दिसत आहे. जो जे वांछिल ते प्राप्त करण्यास त्याला सगळे आयुष्य खर्ची घालावे लागते. या उलट दुसर्‍याचे सुख लुबाडून स्वतःचा स्वार्थ साधणार्‍यांची संख्या वाढतानाच दिसते आहे. सज्जन सोयरे होण्यापेक्षा सोयरे म्हणूच नयेत, असे द्वेष करणारेच संगतीत जास्त येतात. अशी वस्तुस्थिती असली तरी ‘पसायदान’ हा ज्ञानेश्वर माउलींचा आशीर्वाद आहे. विश्वात्मक देवाची त्यांनी केलेली ती प्रार्थना आहे.
 
 
अखिल विश्वाच्या कल्याणासाठी त्यांच्या त्या शुभेच्छा आहेत. ‘स्वप्न’ असा नकारात्मक शब्द त्यासाठी वापरू नये. त्या महात्म्याच्या शुभेच्छांमुळेच सत्कर्म करणारे लोक अल्प संख्येत असले तरी आजही सत्कर्मासाठीच धडपडताना दिसतात. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ ही प्रार्थना असेच लोक करीत असतात. या प्रार्थना-श्लोकाचा पुढचा चरण असा आहे- ‘सर्वे सन्तु निरामयाः॥’ याचा अर्थ असा- या जगातील सर्व लोक निरामय म्हणजे पीडारहित, रोगमुक्त, आरोग्यसंपन्न असावेत. आजच्या काळात ही प्रार्थना अत्यंत समयोचित आणि उपकारक अशी आहे. नवीन नवीन रोगांचे उद्भव आणि प्रसार वर्तमान काळात झपाट्याने होत आहे. संशोधक त्यावरही उपाय शोधण्यात व्यग्र आहेत, धन्वंतरी मंडळी रुग्णसेवा करण्यात दक्ष आहेत. अशा वेळी ही प्रार्थना आठवते. आपल्या अध्यात्मात परमात्मचिंतनाचे महत्त्व असले तरी त्यात देहतत्त्वाला दुर्लक्षित केलेले नाही. ‘शरीरमाघं खलु धर्मसाधनम्’ हा बोध सुद्धा अध्यात्मानेच दिला आहे. धर्मसाधन असे शरीर पीडामुक्त असावे, त्याला कोणत्याही रोगाची बाधा होऊ नये, सर्व लोक आरोग्यसंपन्न असावेत अशी प्रार्थना ही उदात्त विचारांचीच द्योतक आहे. निरोगी देहातच उत्साही, निरोगी आणि उच्च आकांक्षांचे विचार येतात, तशी कृति घडते आणि सर्वांगीण प्रगती होते.
 
 
सगळा समाजच सशक्त होतो. पुढे ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु’ असे म्हणताना आधी भद्र घडावे हे गृहित आहे. भद्र म्हणजे शुभ, कल्याणकारी असे मंगल कर्म. सर्व जगात शुभ घटनाच घडलेल्या पाहण्यास मिळाव्यात. त्यामुळे शांति-सुख-स्वस्थता- समाधान अशी दैवी संपत्ती सर्वत्र नांदेल. त्यासाठी आधी भद्र कर्म करावे, असा सूचक बोध यातून केलेला आहे. माणसाची वाणी-वर्तन-कृती ही जेव्हा विवेकपूर्ण, संयमशील राहील तेव्हाच त्याच्याकडून भद्र कर्म घडेल. असा सर्वंकष विचार या प्रार्थनेत आहे. यात सर्व जगाच्या कल्याणाचेच चिंतन आहे. या मंत्ररुप प्रार्थनेत शेवटच्या ओळीत संत हृदयाचीच प्रार्थना आहे. ‘कोणालाही दुःख होऊ नये’ हा विचार संतच करीत असतात. सामान्य माणसे फक्त स्वतःच्या सुखाचाच विचार करीत असतात. या जगात सगळेच लोक सुखी असावेत, त्यासाठी माझेही काही योगदान, काही सहभाग असावा अशी सदिच्छा बाळगणारे आणि त्यासाठी प्रयत्न-प्रयास करणारे थोर महात्मे म्हटले जातात. तेच म्हणतात- ‘मा कश्चित दुःखमाप्नुयात्।’ सारांश, ही प्रार्थना केवळ जगाच्या सुख-शांतीसाठीच सत्शील, सुविचारी लोकांनी केलेली आहे असे म्हणता येईल. अशा या मंत्ररुप प्रार्थनेमुळे ‘वैश्विक प्रार्थना’ या शब्दप्रयोगाचा सुंदर आशय आपल्या लक्षात येतो. नित्य पाठांतरात ही प्रार्थना अवश्य असावी. परमात्म्याजवळ अखिल विश्वाच्या शांतीसाठी ही प्रार्थना पुण्यप्रदच आहे.
 
 
उषा परांजपे
9420138557