आत्मविकासाची बिकट वाट...

    दिनांक :20-Sep-2020
|
फुलायचे दिवस
 
- सुरेखा दीक्षित
‘सा विद्या या विमुक्तये’ ही उक्ती आजही भारतातील काही शैक्षणिक संस्थांचे बोधवाक्य आहे. मुक्त करते ती विद्या. कशापासून मुक्त करते विद्या? अज्ञानापासून, बंधनापासून, दोषांपासून, अपूर्णतेपासून विद्या मुक्त करते. ‘शिक्षण’ हा शब्द विद्येच्या तुलनेत तोकडा वाटतो. एकविसाव्या शतकात तर त्याला फारच मर्यादित स्वरूप प्राप्त झाले आहे. चांगली उच्च पदस्थ नोकरी मिळावी, समाजात स्थान, पत, प्रतिष्ठा लाभावी यासाठी शिक्षण घ्यायचे. जीवनातील संघर्षाला यशस्वीपणे तोंड देत, नीतिमत्ता जपत, सर्वांना सहकार्य करीत, आयुष्याला सार्थक बनविणारे, चौफेर व्यक्तिमत्त्व फुलविणारे शिक्षण मुलांना मिळावे हे व्यापक उद्दिष्ट किती पालक, शिक्षक वा शिक्षणसंस्था डोळ्यांसमोर ठेवतात, प्रश्नच आहे.
 
 

book_1  H x W:
 
काही संस्था पंचकोष विकसनाद्वारे व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर भर देतात. श्रीअरविंदप्रणीत समग्र शिक्षणात शरीर, प्राणशक्ती, मन, अंतरात्मा व आत्मा यांचा समतोल विकास साधण्याला प्राधान्य आहे. समग्र शिक्षणात आध्यात्मिक विकासालाही महत्त्व दिले आहे. कारण, श्रीअरविंद व श्रीमाताजींनी प्रतिपादन केलेल्या संपूर्ण योगात त्याचे अनन्यसाधारण स्थान आहे. पूर्णयोगाबद्दल जाणून घेणे इथे आवश्यक आहे. कारण, समग्र शिक्षणात त्याचा समावेश झाला आहे. प्रभाकर नुलकर या प्रख्यात पत्रकारांनी ‘श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी’ चरित्र लिहिले. त्यात ते म्हणतात, ‘‘श्रीअरविंद हे हाडाचे क्रांतिकारक होते. भारताच्या आध्यात्मिक व योगशास्त्राच्या प्रक्रियेत त्यांनी जी भर घातली, ती क्रांतिकारक स्वरूपाचीच आहे. सर्व जग हे चैतन्यातून निर्माण झाले आहे व ते चैतन्याप्रत परत जात आहे. ही उपनिषदकालीन ऋषींची महान अनुभूती होती. हेच सत्य त्यांनी आधुनिक काळात पुढे आणले.’’
 
 
श्रीअरविंदांना जग हे मिथ्या आहे, हा मायावाद मान्य नाही. या विचारसरणीचा पगडा भारतीय मानसिकतेवर जवळजवळ एक हजार वर्षे पडला होता. एकूण उत्कांतिक्रमात देहाला व ऐहिकाला जे रास्त स्थान होते, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विकासाचा सारा तोल व ताल बिघडला होता. जीवनविषयक दृष्टीतील समग्रता व पूर्णता त्यामुळे नाहीशी झाली होती. श्रीअरविंदांचे धाकटे बंधू, बारींद्रला लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘‘जुन्या योगपद्धतींनी आध्यात्मिकता व जीवन यांची सांगड घातली गेली नाही. जग हे माया आहे, निदान ईश्वराची क्षणिक लीला आहे, असे त्यांनी ठरविले. परिणाम असा झाला की, जीवनशक्तीचा र्‍हास होऊन देशाची हीन अवस्था झाली.’’ प्रभाकार नुलकर असे लिहितात की, जड भौतिकात आणि ऐहिकात दिव्य चेतनेचे प्रकट होणे केवळ अशक्य आहे असे नव्हे, तर तीच त्याची ईश्वरदत्त नियती आहे, असे साक्षात्कारी सत्य श्रीअरविंदांनी प्रस्थापित केले. जडापासून मानवापर्यंत सृष्टीमध्ये जी उत्क्रांती झाली ती अजूनही सुरूच आहे, असे आणखी एक सत्य श्रीअरविंदांनी विदित केले.
 
 
श्रीमाताजी या सत्यावर अधिक प्रकाश टाकतात. त्या म्हणतात, ‘‘सृष्टीमध्ये उत्क्रांतीची प्रक्रिया सतत चालू आहे. जी दगडापासून वनस्पती, वनस्पतीपासून प्राणी, प्राण्यापासून मानव अशी उन्नत होत आहे. आजच्या घडीला माणसाला असे वाटते की, या उन्नत होणार्‍या उत्क्रांतीमधील ती शेवटची अवस्था आहे आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ या पृथ्वीतलावर दुसरे काही नाही. परंतु, इथे मनुष्य चुकतोय्. भौतिक स्वरूपात तर तो प्राणीच आहे. फारतर बोलू शकणारा प्राणी, पण त्याच्या सवयी व अंतर्गत क्रियांमध्ये (Instincts) तो पशूच आहे. प्रकृती मात्र या अपुर्‍या कार्याबद्दल संतुष्ट नाही आणि नि:संशयपणे तिचे उत्क्रांतीचे कार्य चालूच ठेवत आहे. चेतनास्तरावर उन्नत होऊन मानवाचे महामानवात त्याचे रूपांतर व्हावे म्हणून आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यासाठी श्रीअरविंदांनी एखाद्या ऋषीप्रमाणे तपस्या केली.’’
 
 
श्रीअरविंदांच्या पूर्णयोगातील तत्त्वज्ञानाचे पडसाद त्यांच्या समग्र शिक्षणप्रणालीत उमटणे साहजिकच आहे. म्हणूनच अंतरात्मा विकासानंतर आध्यात्मिक विकासाचा टप्पा गाठणे कसे शक्य होईल, या विषयीचे मार्गदर्शन त्यांनी व श्रीमाताजींनी साधकांचे शंकानिरसन करताना केले आहे. आत्म्याला (Soul) काही जण परमसत्य, निर्वाण, अंतिम सत्य आदी विविध नावांनी संबोधतात. कोणत्याही नावे संबोधले तरी त्याच्याशी एकात्मता घडवून आणणारा आंतरिक विकास प्रत्येकाने करून घेतला पाहिजे. हे उद्दिष्ट गाठणे तर दूरच, समजणेसुद्धा कित्येकांना अवघड जाते. पण, मग आध्यात्मिक विकासाला शिक्षण पद्धतीतून वगळायचे काय? आध्यात्मिक विकासाला शिक्षणात स्थान नक्कीच असावे, पण ते अनिवार्य न होता ऐच्छिक असावे. हॉर्वर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्तांच्या सिद्धान्तानुसार आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. त्यातील एक ‘व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता’ आहे. प्रा. रमेश पानसेंच्या ‘कर्ता करविता’ पुस्तकात या बुद्धिमत्तेची व्याख्या अशी दिली आहे- ‘स्वत:च्या मनात डोकावता येणे, स्वत:च्या भावना ओळखता येणे, त्यावर नियंत्रण ठेवता येणे किंवा आध्यात्मिक अनुभव घेता येणे, या प्रकारच्या बुद्धिमत्तेला व्यक्तिअंतर्गत (Intrapersonal) बुद्धिमत्ता असे म्हणतात. संयमित, ध्यानधारणा करणारे, भावनांचे उद्दीपन होऊ न देणारे असे लोक ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेले असतात. स्थितप्रज्ञ, संत, आध्यात्मिक गुरू यांचा यात समावेश करता येतो.’ जे विद्यार्थी वरील गोष्टींबद्दल आस्था बाळगत असतील, त्यांचा आध्यात्मिक पैलूंचा विकास करण्याची संधी शिक्षणात मिळायला हवी.
 
 
प्राचीन काळापासून आत्मज्ञान घेण्यासाठी गुरूंचा अनुग्रह, साधना, तपस्या आदी मार्गांचा अवलंब केला जाई. आधुनिक काळात आध्यात्मिक शिक्षणाची दिशा व मार्ग कोणते असावेत, हा प्रश्न सामान्यजनांना पडू शकतो. पुद्दुचेरीतील श्रीअरविंद आश्रमाच्या समग्र्र शिक्षणविषयक प्रयोगांतून प्रेरणा घेऊन काही देशी-विदेशी साधकांनी स्वत:चे प्रयोगशील तंत्र विकसित केले आहे आणि केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात त्याचा प्रसार केला आहे. या प्रयोगशील शिक्षणप्रेमींपैकी एक नाव आहे फॅब्रिक दिनी (Fabric Dini) या स्विस व्यक्तीचे. भारतात सतरा वर्षे वास्तव्य करून त्यांनी समग्र शिक्षण, योग, सचेतना (Mindfulness) विषयांवर अभ्यास अन् प्रयोग करून "Growth And Blossoming' नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे दलाई लामांचे प्रवक्ते मॅथ्यू रिकार्ड यांनी.
 
 
शिक्षक किंवा पालकांनी स्वत:च्या मानसिकतेत बदल घडवून आणून मुलांसमोर आदर्श ठेवावा, यावर पुस्तकात भर दिला आहे. परहितवृत्ती, विनम्रता, सत्यता, समवेदना, नीतिमत्ता इत्यादी मानवतावादी मूल्यांचे संवर्धन करून स्वत:चे अधिक परिपक्व व जागृत व्यक्तीत रूपांतर करून घ्यावे, हा मुद्दा "Growth And Blossoming' पुस्तकात अधोरेखित केला आहे. फॅब्रिक दिनीच्या मते, श्रीअरविंदप्रणीत समग्र शिक्षण, जागतिक स्तरावर सगळ्या संस्कृतीच्या लोकांमध्ये उपयोगी ठरू शकते. दिनी म्हणतात की, उच्चतम नैतिकता आणि संपूर्ण आत्मसमर्पण साध्य करण्यासाठी आमच्या गहन अंतरात प्रदीप्त जी सत्याची ज्योत आहे, ती अखंडपणे तेवत ठेवली पाहिजे. त्याचबरोबर मूलभूत नीतिमत्ता आणि परम सत्याचा शोध घेण्याची तीव्र अभीप्सा अंतर्यामी उदित झाली पाहिजे.
 
 
असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमृतत्वाकडे नेणारी दिव्य आत्मज्योत प्रत्येकात असते, पण जाणवत नाही. दिसत तर नाहीच नाही. परंतु, म्हणून तिचे अस्तित्व नाकारता येत नाही. भारतात आत्मसाक्षात्कार झालेले इतके संत-महात्मे होऊन गेले की, भारतीयांचा त्यावर दृढ विश्वास आहे. वस्त्र विणता-विणता कबीराला ब्रह्मज्ञान झाले होते. चोखामेळ्याला भाजीच्या मळ्यात कांदा-मुळ्यात विठाईचे दर्शन झाले. गोरा कुंभार मातीची मडकी बनवता बनवता ईश्वराशी एकरूप होऊन जात. मीराबाईने तर गिरिधर गोपालासाठी सर्वसंग परित्याग केला होता. संसारात राहून, सर्व जबाबदार्‍या सांभाळून कर्म करीत, साधना करीत परमात्म्याशी तादात्म्य पावणे शक्य आहे, याची साक्ष देणारी असंख्य उदाहरणे आहेत.
शेतकरी पावसापूर्वी जमिनीची मशागत करतो आणि पेरणीसाठी पावसाची वाट बघतो. पाऊस कधी येईल हे त्याच्या हातात नसतं. तसंच काहीसं आत्मसाक्षात्काराबाबत म्हणता येईल. आत्मबोध होण्यासाठी पूर्वतयारी करणे माणसाच्या हातात आहे. त्यासाठी योगमार्गाचा अवलंब करता येईल. पाश्चात्त्य देशांमध्ये योगासने, प्राणायामासोबतच ध्यानधारणेला खूप उचलून धरले जाते. डॉक्टरसुद्धा रुग्णांना ध्यान, सकारात्मक विचार करण्याचा सल्ला देतात. पतंजलीच्या अष्टांगयोगाचे अंतिम लक्ष्य समाधी आहे, याचा मात्र बरेचदा विसर पडतो.
 
 
मुलांच्या बाबतीत थोर पुरुषांचे चरित्रवाचन, उत्तम, अभिजात साहित्यपठण, लेखन, चर्चा, संवाद, नाट्यकला, मनन, चिंतन इत्यादी उपक्रमांद्वारे आध्यात्मिक विकासाचे उद्दिष्ट गाठायला मदत होईल. सद्विचार, सत्वृत्ती, सद्गुण वाढीस लागावे यासाठी मीराम्बिकेत कृतिपुस्तिका तयार केली आहे. अंतर्मुख होऊन विचार करण्यावर कृतिपत्र आणि त्याचबरोबर एकाग्रतेसाठी मदत होईल असे उपक्रम प्रत्येक सद्गुणाच्या विकासासाठी दिले आहेत. पुस्तक शिक्षकांसाठी तयार केल्याने त्यांना वर्गात मुलांसोबत काम करताना उपयोगी पडतील असे बारकावे, सूचना, टिप्स जागोजागी आढळतात, जेणेकरून प्रगतीचे टप्पे गाठता येतील. श्रीमाताजी साधक, शिक्षक व विद्यार्थ्यांना सांगतात, ‘‘सदैव उच्च स्तरावर राहा. अधिकाधिक उच्च स्तरावर जाण्यासाठी झटा. नैतिक आदर्शाची जी परमोच्चता दृष्टिपथात आहे, तीही ओलांडून पुढे आरोहण करण्याची आकांक्षा धरा. जे जे उच्चतम आणि सुंदरतम असेल, स्वार्थातीत नि अधिकात अधिक व्यापक असेल, जे जे सर्वथा निर्दोष असेल तदनुरूप जीवन घडवा, म्हणजे मग अध्यात्माच्या अनंत आकाशात भरारी मारण्यास तुमचे पंख समर्थ होतील.’’
 
 
आध्यात्मिक विकासाची वाटचाल बिकट असली तरी असाध्य नाही. एक एक पायरी चढूनच माणसाला प्रगती साधता येते. शिक्षणात जशी उच्चतम पदवी प्राप्त करणे सर्वांना शक्य होत नाही, तसेच या क्षेत्रातही अंतिम ध्येयाप्रत पोहोचणे सगळ्यांना जमेलच असे नाही. परंतु, प्रश्नांची सुरवात तर करायला हवी. नुलकर त्यांच्या श्रीअरविंदांवरील चरित्रात लिहितात- ‘‘1944च्या काँग्रेस अधिवेशनानंतर ‘हिंदू’च्या वार्ताहराला दिलेल्या मुलाखतीत श्रीअरविंद म्हणाले होते-आध्यात्मिक जागरण हाच आपल्या राष्ट्रीय महानतेचा निकष आहे. ईश्वरात मानवाचे एकत्व पाहणे आणि अंतर्बाह्य स्वरूपात, सामाजिक संबंधात आणि समाजव्यवस्थेतही त्याची अनुभूती घेणे, ही सर्वोच्च भारतीय कल्पना इत:पर मानवी समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली ठरणार आहे. भारताने मनात आणले, तर तो सार्‍या जगाचा मार्गदर्शक ठरू शकेल.