परशुरामांची भूमी- कोकण!

    दिनांक :22-Sep-2020
|
भगवान परशुरामांनी निर्माण केलेली भूमी म्हणजे कोकण. भारताचा पश्चिम किनारा आणि किनार्‍याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्यामध्ये असलेला 720 किलोमीटर लांबीचा आणि 30 ते 50 किलोमीटर रुंदीचा भूमीचा पट्टा कोकण भूमी म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो.
 

kokan_1  H x W:
 
कोकणची भूमी अपार निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या रांगा, आंबे, सुपारी, केळी, फणस, काजू, कोकम यांचे बगिचे आणि डोंगरउतारावर केलेली भातशेती, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई या कोकण भागातच आहे.
 
 
पौराणिक कथेनुसार, श्रीविष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यावर जिंकलेली सर्व भूमी कश्यप ऋषींना दान केली. स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्याप्रमाणे सिंधू सागराला मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशुराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे.
 
 
कोकण भूमीत गणपतीपुळे, लोटे परशुराम, वेळणेश्वर, मारलेश्वर, करणेश्वर, कड्याचा गणपती, दिवेआगार सुवर्ण गणेश, महड व पाली येथील अष्टविनायक गणपती इत्यादी मंदिरे; तसेच विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, मुरुडचा जंजिरा, अलिबाग इत्यादी जलदुर्ग; रायगडचा गिरिदुर्ग, माथेरान, आंबोली ही थंड हवेची ठिकाणे आणि अलिबाग, वेंगुरला, काशीद, गुहागर, गणपतीपुळे, हरिहरेश्वर, रत्नागिरी, श्रीवर्धन यांसारखे सुंदर समुद्रकिनारे आहेत.
 
 
आम्ही गोव्याहून गणपतीपुळे येथे जाण्यास निघालो. रस्त्यात सावंतवाडी येथे सकाळी न्याहारीकरिता गावातील प्रसिद्ध मोती तलावाच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेलच्या सभोवताल हिरवे डोंगर होते. हा डोंगर नरेंद्र डोंगर नावाने प्रसिद्ध आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले सावंतवाडी गाव रंगीत लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तेथून चहा, न्याहारी आटोपून आम्ही गणपतीपुळेकडे रवाना झालो.
 
 
गणपतीपुळे हे भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील गणेशाचे स्वयंभू स्थान. मंदिरामागची संपूर्ण टेकडी गणेशरूप समजून तिच्याभोवती भाविक प्रदक्षिणा घालतात. मंदिराच्या समोर अथांग निळाशार अरबी समुद्र पसरलेला आहे. समुद्रकाठावरील रेती अतिशय मऊ आहे. भरतीच्या वेळी मंदिराच्या पायथ्याला समुद्राचे पाणी स्पर्शून जाते. आम्ही मंदिरात श्रींचे दर्शन घेतले व थोडा वेळ समुद्राच्या लाटांची मजा घेतली. गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. वाळूचा किनारा व नारळी-पोफळीच्या बागांमुळे आणि हापूस आंब्यामुळे हा प्रदेश समृद्ध आहे. येथून जवळच मालगुंड या गावात कवी केशवसुतांचे स्मारक आहे. रत्नागिरीला जाताना आरे वारे हा सुंदर समुद्रकिनारा आहे. आम्ही या ठिकाणीसुद्धा बराच वेळ समुद्रात खेळलो व सूर्यास्त बघितला. गणपतीपुळे बघून आम्ही डेरवणकडे निघालो.
 
 
चिपळूणपासून 12 किलोमीटर अंतरावर श्री सीताराम बुवा वालावलकर या संत पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या आश्रमात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील निवडक प्रसंग शिल्परूपात साकार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवजन्म, स्वराज्याची शपथ, तोरणा किल्ला जिंकला, प्रतापगडावरील शिवाजी महाराज व अफजलखान भेट, लाल महालातील शाहिस्तेखानाची बोटे कापली हा प्रसंग, पुरंदरचा तह, गड आला पण सिंह गेला, आग्राभेट, राज्याभिषेक इत्यादी प्रसंग आहेत. शिवसृष्टीत प्रवेश करताच दरवाजाच्या दोन बाजूला उभे असलेले मावळे जिवंत असल्याचाच भास होतो. आम्ही शिवसृष्टी बघून आणि सीताराम बुवा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व तेथील गोशाळा बघून श्रीक्षेत्र परशुराम येथे जाण्यासाठी निघालो.
 
 
श्रीक्षेत्र परशुरामकडे जात असताना आमची बस सह्याद्रीच्या डोंगरांमधून मार्गक्रमण करीत असताना आम्ही सर्व निसर्गसौंदर्य न्याहाळत होतो. बस संध्याकाळी सहाच्या सुमारास श्रीक्षेत्र परशुराम येथे पोहोचली. आम्ही सर्व जण साधारणपणे शंभर दगडी पायर्‍या उतरून मंदिरात पोहोचलो. मंदिर हेमाडपंथी आहे. मंदिरात भगवान परशुरामांची काळ्या दगडाची मूर्ती आहे. तसेच मागच्या बाजूला परशुरामाची माता रेणुका देवीचेसुद्धा स्वतंत्र मंदिर आहे. या ठिकाणी रेणुकामातेची पूर्ण रूपातील मूर्ती पाहायला मिळते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले. त्यानंतर श्री ब्रह्मैद्र स्वामींच्या सांगण्यावरून जंजिर्‍याच्या सिद्धीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही कारागीर ख्रिस्तीसुद्धा होते. त्यामुळे या मंदिरावर हिंदू मुस्लिम व ख्रिस्ती स्थापत्य कलेचा प्रभाव दिसतो. अशाप्रकारे परशुराम क्षेत्र कोकण भूमी महाराष्ट्रात देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.
 
डॉ. श्रीकांत मधुकर पारखी
९८२२२३३४६३