स्पर्धा परीक्षा- इंग्रजी विषयाची तयारी

    दिनांक :24-Sep-2020
|
विद्यार्थ्यांनो, आपली मातृभाषा कोणतीही असेल तरी जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. हे आपल्याला मान्य करावेच लागेल. शालेय शिक्षणातून आपण या भाषेशी परिचित होत जातो. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षणाला सुरुवात करतात त्यांना या भाषेचा फारसा त्रास होत नाही, परंतु अन्य विद्यार्थी विशेषत: ग्रामीण भागात इंग्रजी भाषेची भीती विद्यार्थ्यांच्या मनात कायम असते. कसेबसे 10 वी व 12 वीपर्यंत हा इंग्रजीचा गाडा ते कसाबसा हाकतात. पण पुढे पदवी शिक्षणात त्यांना याचा फार त्रास होतो. मग स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटली तर विचारायलाच नको.
 

competitive exam _1  
 
 
मित्रांनो, बहुतेक सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी भाषेचा पेपर असतो. त्यासाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमात जे आपण इयत्ता 10 वी अथवा 12 वी पर्यंत शिकलो तेच असते, परंतु या वर्गात शिकताना आपला पाया कच्चा राहिला असेल तर मग अभ्यासाला ते कठीण जाते.
 
 
इंग्रजी विषयात मुख्यत्वे व्याकरण, उतारे व त्यावरील प्रश्न, निबंधलेखन, भाषांतर, सारांशलेखन, पत्रलेखन, बातमीलेखन, अहवाल लेखन (थोडक्यात लेखन कौशल्य), मुलाखत यासारखे घटक अंतर्भूत होतात. परंतु यात मूलत: इंग्रजीचे व्याकरण आपले पक्के असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाचे जर आपण अवलोकन केले तर बहुतेक वरील सर्व घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. इंग्रजी विषयासाठी स्पर्धा परीक्षेच्या द़ृष्टीने विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमातील घटकानुरूप मुद्दे लक्षात घेतले तर व्यवस्थितपणे तयारी होण्यास मदत होईल व विषयाची भीती मनातून निघून जाईल.
 
 
इंग्रजी व्याकरण : मुळातच या परकीय भाषेबाबत व त्यातील व्याकरणामुळे आपण घाबरून जातो. शालेय शिक्षणापासून साधारणपणे इयत्ता 5 वी पासून आपण हळूहळू इंग्रजीतील व्याकरणाशी परिचित होत जातो. सुरुवातीला इंग्रजीतील कविता, कथा, उतारे, निबंध यातून हळूहळू वाक्यरचना व नंतर मूळ व्याकरण यांचा आपण अभ्यास करत जातो. परंतु, साधारणपणे हा अभ्यास आपण परीक्षेपुरता मर्यादित स्वरूपात केल्यामुळे त्यातील सखोल ज्ञान आपल्याला अवगत होत नाही, असे बहुदा घडते. स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजीचे व्याकरण आपल्याला अभ्यासायचे असेल तर खोलवर जाऊन पुनश्च हरिओम करावा लागेल. यासाठी आपण खालीलप्रमाणे अभ्यासपद्धती अवलंबिली तर इंग्रजीची तयारी व्यवस्थित होण्यास मदत होईल. इंग्रजीचा एक शब्दकोष (इंग्रजी-इंग्रजी तसेच इंग्रजी-मराठी किंवा मराठीइंग्रजी) आपल्या ग्रंथसंग्रही ठेवावा. इंग्रजी शब्दकोषाचे (डिक्शनरी) वाचन करावे. अर्थात रोज नवीन पाच शब्द त्यात पहावे. शब्दकोषात शब्द कसा शोधावा, हे आपण शाळेत शिकलो आहे त्याचा अवलंब करावा. जमल्यास स्पेलिंग पाठ करावे (अर्थासह) यामुळे शब्दभांडार वाढेल व शब्दाचे स्पेलिंग अचूकपणे लिहता येईल. रोज एक इंग्रजी वर्तमानपत्र जरूर वाचावे. त्यातील आढळणारे इंग्रजी शब्द व त्यांचे अर्थ शब्दकोषात पहावे व आपल्या नोट्सच्या वहीत लिहून ठेवावे. यामुळे हळूहळू तेच शब्द पुन्हा पुन्हा वाचनात आले तर त्यांचा अर्थ पटकन लक्षात येईल व नंतर इंग्रजीतील कोणताही उतारा किंवा माहिती लवकर वाचता येईल. इंग्रजी व्याकरणावरचे एखादे चांगले पुस्तक (उदा. रेन अ‍ॅण्ड मार्टिन किंवा पॉल अ‍ॅण्ड सुरी लिखित) संग्रही ठेवावे. त्यातून इंग्रजी व्याकरणाची उजळणी करीत जावी. रोज किमान 10 वाक्ये इंग्रजीतून लिहून काढावीत. त्यासाठी एखादी स्वतंत्र वही करावी. आपले लिखाण एखाद्या इंग्रजीच्या शिक्षकाला दाखवून त्यातून व्याकरण समजून घ्यावे. यातूनच इंग्रजी व्याकरणातील खाचखळगे समजायला लागतात व आपल्या चुकांची दुरुस्ती होत जाते.हे सर्व करत असताना सराव करणे म्हणजेच इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका (व्याकरणासंबंधी प्रश्न असलेली) सोडवून पहावी. जितका जास्त सराव कराल तितकाच आपला अभ्यास पक्का होत जाईल व चुकांचे प्रमाण कमी कमी होत जाईल.
 
 
इंग्रजीतील निबंधलेखन : निबंधलेखन म्हणजे एखाद्या विषयावर केवळ गप्पा मारणे नव्हे; तर ज्या विषयावर निबंध लिहायचा आहे, त्यावर सांगोपांग चर्चा करून आपल्या लिखाणात त्याला जमेल तेवढा न्याय देणे होय. निबंध म्हणजे काय? असा प्रश्न जर विचारला तर निबंध म्हणजे ‘लूज सॅली ऑफ माईंड’ असे म्हटले जाते. म्हणजे एखाद्या विषयावर आपल्या मनात आलेले विचार मुक्तपणे मांडणे. पण यात सुसूत्रता असणे आवश्यक आहे. सामान्यपणे कोणत्याही निबंधाला प्रामुख्याने तीन अंग असतात. सुरुवातीचा अंग म्हणजे विषय, प्रस्तावना वा विषय ओळख. मधला भाग म्हणजे निबंधाचा गाभा, त्यातील विषयाचा मुख्य अंग व शेवटचा भाग म्हणजे विषय सार किंवा समारोप. मित्रांनो, निबंध लेखनाचे भाषा माध्यम कोणतेही असेल तरी त्याची संरचना अशीच असते. मग इंग्रजी भाषेत दिलेल्या विषयावर निबंध लेखन करताना काही मुद्दे आपण लक्षात घेतले तर निबंध लेखन सोपे जाईल.
 
 
आधीच सांगितल्याप्रमाणे शब्दभांडार व शब्दसामर्थ्य वाढविण्यासाठी इंग्रजी वाचन, शब्दकोषातील शब्द शोध, लेखन यावर लक्ष दिले पाहिजे. इंग्रजी शब्दकोडे सोडविणे, हेही शब्दसामर्थ्य वाढविण्यासाठी उपयोगी पडेल. रोज किमान एक परिच्छेद वा इंग्रजीतील 10 वाक्ये लिहून काढली तर लेखन कौशल्य वाढण्यास मदत होईल.
 
 
वर्तमानपत्रातील संपादकीय लेख वाचणे, त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अर्थकारण, राजकारण या विषयावरील विचारवंतांचे लेख अवश्य वाचावेत. टीव्हीवरील तज्ज्ञांच्या मुलाखती आवजून पहाव्यात. महिन्यातून किमान एक तरी निबंध लिहून काढावा. केलेले लिखाण वाचून काढावे. यामुळे आपल्या लेखनातील चुका लक्षात येतात. लिहिलेला निबंध तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावा. दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे अवलोकन करून पुनश्च लिहावे. असे सातत्याने केल्याने आपल्या लेखनाचा वेग वाढेल. त्याला सुयोग्य दिशा प्राप्त होत जाते. स्पर्धा परीक्षेत विचारलेल्या निबंध लेखनाच्या प्रश्नात शब्दमर्यादेला फार महत्त्व असते. त्याचे पालन व्हावे यासाठी लेखन सराव करणे फारच आवश्यक आहे. इंग्रजी व्याकरणाचा नीट अभ्यास असला तर निबंध लेखनात व्याकरणाच्या नियमांचे पालन व्यवस्थित होत जाते. निबंध लिहताना वाक्यरचना, परिच्छेद रचना, शब्दशुद्धता, म्हणी व वाक्प्रचार यांचा योग्य ठिकाणी वापर, आवश्यक त्याठिकाणी विचारवंतांचे विधान याबाबी लक्षात घ्याव्यात.
 
 
सारांशलेखन : सारांशलेखन म्हणजे वेगळे काही नसून दिलेल्या परिच्छेद व उतार्‍याचे एक तृतीयांश वा दोन तृतीयांश रूपात लेखन करणे होय. परीक्षेत दिलेल्या एखाद्या परिच्छेदाचे संक्षिप्त स्वरूपात लेखन करताना खालील मुद्यांचे भान ठेवणे आवश्यक आहे.
 
 
सारांशलेखन करताना मूळ परिच्छेदातील मजकुराचा अर्थ बदलता कामा नये. त्यात आपले मत मांडायला वाव नसतो, पण आपल्या शब्दात मांडता येते. दिलेल्या शब्दमर्यादेत सारांशलेखन करणे आवश्यक असते. परंतु, त्यातील मजकूर वर वाक्ये तोडून, खोडून लिहू नये. त्यामुळे मूळ परिच्छेदाचा अर्थ बदलण्याची शक्यता असते. सारांश लेखनात दिलेल्या उतार्‍याला शीर्षक विचारले असेल तरच द्यावे. सारांश लेखन करताना त्याच्या गुणवत्ता, स्पष्टता, संपूर्णता व अचूकता या बाबी दुर्लक्षित करून चालत नाही. ज्या उतार्‍याचे सारांश लेखन करायचे असेल त्याचे आधी एक, दोनदा काळजीपूर्वक वाचन करावे. त्यामुळे दिलेल्या उतार्‍याची मूळ मांडणी व मध्यवर्ती कल्पना लक्षात येते. त्यामुळे सारांश लेखन सोपे जाते. सारांश लेखन अधिक चांगले होण्यासाठी आपले वाचन वाढविणे आवश्यक आहे. इंग्रजीतील लेख, उतारे याचे वाचन केल्याने त्यातील मुख्य विचार आपल्याला अवगत होतात व ते नंतर आपल्या शब्दात व्यक्त करणे सोपे जाते, अर्थातच वाचनकौशल्य या ठिकाणी उपयोगी पडते.
 
 
उतारा व त्यावरील प्रश्न : यामध्ये दिलेल्या उतार्‍यावरून त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. परीक्षेतील उतारा या आधी आपण कधी वाचलेला नसतो, त्यामुळे त्याचे वाचन करून नंतरच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात. बहुतांश विद्यार्थी आधी प्रश्न बघतात व नंतर वरील उतार्‍यात त्याची उत्तरे शोधतात. ही पद्धती वरवर सोपी वाटत असली तरी ती वेळखाऊ व चूक ठरते, कारण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे उतार्‍यात सापडत नाही. किंबहुना तसे त्यात सरळपणे उल्लेखीतही नसते. त्यासाठी आधी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यावा. प्रथम वाचनात लक्षात आला नाही तर पुन्हा वाचून घ्यावा व नंतर प्रश्नांकडे वळावे. साधारणपणे उतार्‍याखाली 5 ते 6 प्रश्न दिलेले असतात. उतार्‍यात दिलेल्या मजकुराच्या आधारे त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. उत्तरे लिहितांना प्रश्नात काय विचारले आहे याचे भान ठेवणे आवश्यक असते.
 
 
मित्रांनो, वरील सर्व मुद्यांवर व्यवस्थितपणे नियोजन केले तर सहजपणे इंग्रजी विषयाची तयारी आपण करू शकाल, अशी आशा बाळगतो.
 
प्रा. डॉ. धनंजय गभने
9423640251