राजभाषा हिंदी आणि ळ

    दिनांक :24-Sep-2020
|
या देशात हिंदी भाषी आणि अहिंदीभाषी दोन्ही क्षेत्रांमध्ये एक मोठा वर्ग आहे, जो व्यक्तिगत चर्चेत, सार्वजनिक मंचावर, नेटवर एका विषयावर कायम आश्चर्य व्यक्त करत असतो की देशाची ही राजभाषा देवनागरी लिपीत लिहिली जात असूनही देवनागरी लिपीचा पूर्ण वापर ती का करीत नाही?
 

language hindi_1 &nb 
 
 
ही राजभाषा ळ ला निषिद्ध का मानते, हा प्रश्न मी जेव्हा अनेक विद्वानांना विचारला तेव्हा मला सांगण्यात आले की लखनवी हिंदी किंवा खडी बोली जी ऐकताना उर्दूसारखी वाटते तिलाच अखिल भारतीय स्तरावरील प्रमाण हिंदी किंवा स्टॅण्डर्ड हिंदीचा दर्जा प्राप्त आहे. या भाषेचे मूळ नाव हिंदुस्तानी आहे, ज्याचे देवनागरी आणि संस्कृतनिष्ठ संस्करण हिंदी या नावाने आणि फारसी लिपीतील संस्करण उर्दू या नावाने ओळखले जाते. या भाषेच्या प्रमाण भाषेचे मूल स्थान असलेले उत्तर प्रदेशातील विशिष्ट भूभाग व समूह ण च्या उच्चाराला न चा आणि, ळ च्या उच्चाराला ल चा अशुद्ध, गावठी किंवा पहाडी उच्चार मानतात. (मराठीत याच्या अगदी उलट आहे, असो...) पण त्यामुळे उर्दूत ळ नाही आणि ण ही नाही. तत्कालीन पहाडी किंवा ग्रामीण लोकांना आणि त्यांच्या उच्चारांना हलकट समजण्याच्या वृत्तीतून उर्दू भाषेने या दोन्ही उच्चाराना हद्दपार केले. त्या पाठोपाठ खडी बोलीने ही केले पण भारती हिंदी संस्कृतनिष्ठ झाल्यामुळे, ण तेवढा तिच्या तडाख्यातून वाचला. अर्थात, तोही हिंदीत तेवढा प्रचलित नाही. परंतु हिंदीचा हा ळ द्वेष, अतिशय आक्षेपार्ह, अशास्त्रीय, हिंदीच्या उच्चार प्रधान असण्याच्या दाव्याला विसंगत, अखिल भारतीय स्वरूपास बाधा आणणारा आणि प्रादेशिक भाषांवर अन्याय करणारा आहे, असे मला वाटते. अखिल भारतीय स्तरावर हिंदीला कार्यालयीन भाषा म्हणून घोषित करण्याची वेळ आली आणि हिंदीचे प्रमाणीकरण झाले त्यावेळी संबंधित विद्वानांनी थोडा प्रादेशिक आवाज ऐकला असता तर हिंदीला संकुचित भाषा म्हणण्याची वेळ आली नसती. उल्लेखनीय म्हणजे ही प्रमाण हिंदी (खडी बोली) केवळ उत्तरप्रदेश नव्हे तर उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश अशा अनेक राज्यांची राजभाषा आहे. तथापि यापैकी कुठल्याही राज्याची प्रादेशिक भाषा ही खडी बोली नाही. राजस्थानात राजस्थानी आणि त्यांच्या बोली, उत्तराखंडमध्ये गढवळी आणि कुमायुनी, हरियाणामध्ये हरियाणवी आणि बाकीही राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. परंतु, या सर्व प्रादेशिक भाषा या हिंदी भाषाच मानल्या जातात. त्यामुळे सर्व राज्यांनी प्रमाण हिंदीला आपली राजभाषा म्हणून स्वीकृत केले आहे. या राज्यांपैकी राजस्थानी, उत्तराखंडी, हरियाणवी आणि काही मर्यादेपर्यंत मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ळ चा वापर होतो.
 
 
मी राजस्थानमधील जयपूर येथे माझ्या कार्यालयीन प्रशिक्षणसाठी गेलो होतो, तेव्हा काही प्रशिक्षक मंडळी करनेवाळा, देणेवाळा असे उच्चार करताना दिसली तेव्हा मी चकित झालो. मी त्यांना म्हटले तुम्ही गुजराथ, महाराष्ट्रातील का? तर ते म्हणाले नाही. आम्ही राजस्थानचे स्थानिक लोक आहोत. नंतर कळले की ओडिया भाषेतही ळ आहे. पुढे या बाबत अधिक संशोधन करीत असताना माझ्या एका मित्राने मला व्हॉट्सअ‍ॅप वर एक व्हिडीओ पाठवला. त्या विनोदी व्हिडीओत दोन मुली त्या काळू जाखड नावाच्या मुलाची मुलाखत घेत असतात आणि तो त्याच्या हरयाणवी शैलीत उत्तरे देऊन सांगत असतो की मी कालू नसून काळू आहे! तेव्हा लक्षात आले की राजस्थानीमध्ये जसे थाळी, सगळा, साळा, चाळीस वगैरे भरपूर ळ युक्त शब्द आहेत, तसेच हरयाणवी हिंदीमध्ये सुद्धा बळणा, घोथळणा, रिफळणा असे अनेक शब्द आहेत आणि त्याचा उच्चार मराठी ळ सारखाच आहे. इतकेच काय, काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश या राज्याचा भाग असलेल्या उत्तराखंडमध्ये सुद्धा काही बोलीभाषा आहेत ज्यात थोडा उच्चार फरक असलेला ळ आहे! तिथं गावाला भोळ आणि शेणाला मौळ म्हणतात! गढवाली भाषेचे स्थानिक नामच गढवळी आहे! युट्यूबवर एका चॅनेलमध्ये तर एक मध्य प्रदेशातील श्रोत्याने महाराष्ट्रालगत असलेल्या नेमाड प्रांतात सुद्धा ळ चा उच्चार असल्याची माहिती दिली. हे सगळे वाचून मला आश्चर्य वाटलं की ज्या समूहाच्या लोकभाषेत प्रचुर प्रमाणात एक वर्ण आढळतो, त्याच समूहाच्या राजभाषेमधून तो हद्दपार होतो, तरीही कुणी आक्षेप घेत नाही आणि घेतला तरी आजवर राज्यकर्त्यांना तो दखलपात्र वाटला नाही! हिंदी साहित्यामध्ये लोक भाषेतील संवाद राज भाषेमध्ये लिहायचे असतील तर त्यांना ळ या अक्षराची आवश्यकता पडली नसेल का? राजस्थानी साहित्य, त्याचे न्यूज चॅनेल आणि इतरही ळ युक्त हिंदी बोलणार्‍या राज्यांच्या साहित्य आणि संस्कृतीबाबत शोध घेतला तेव्हा दिसले की महाराष्ट्रात जसा ळ लिहितात, तसाच तो या हिंदी च्या लोकभाषांतही लिहितात. तिथल्या कथा, कविता, लोकसाहित्य यात भरपूर प्रमाणात हा ळ लिहिला आणि उच्चारला जातो! हे झाले लोक भाषेचे. पण भारतातील भाषांची जननी समजल्या जाणार्‍या संस्कृतमध्येही ळ नाही म्हणून भारती हिंदीत ळ नाही, असे काही लोक म्हणतात. पण तेही चुकीचे आहे. वैदिक संस्कृतमध्ये सुद्धा ळ आहे. आपण आपल्या इष्ट देवतेची आरती केल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणतो. ओम यज्ञे न यज्ञमयजन्त देवस्तानी धर्माणि प्रथमान्यास: यात एक श्लोक असा आहे, पृथिवे समुद्रपर्यंतायाम एकराळीती, ऋग्वेदाच्या अग्नीसूक्तांमध्ये ओम अग्निमीळे पुरोहितं, यज्ञस्य देवमृत्विजम या श्लोकाने सुरुवात आहे. या दोन्हीत ळ आहे.
 
 
आता आपण म्हणाल की, हे सगळे ठीक आहे. झाले ते झाले, तुम्हाला काय त्रास आहे? अहो, लोकमान्य टिळकांचे नामांतर तिलक झाले तरी मला त्रास होणार नाही? देशात केंद्र सरकारच्या कार्यालयात, रेल्वे, बँका इत्यादी ठिकाणी, सीबीएसई आणि इतरही शाळांमध्ये भारती हिंदीला 100 टक्के खडी बोली समजून स्थानिक नावांचं असंच विकृतीकरण सुरू आहे. गेली 70 वर्षे त्यावर कुणी आक्षेप न घेतल्याने ते अव्याहत सुरू आहे. टिळकांप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे यांचे बालासाहेब असे नामकरण करण्यात आले आहे. बाला शब्द याचा अर्थ मुलगी असा होतो, हे यांना माहीत नाही का? आश्चर्य म्हणजे बाळासाहेब यांच्यावर प्रेम करणारे लोक सुद्धा मुलाखतीत हिंदी चॅनेल वाल्यांसोबत तसेच विकृत उच्चार करू लागतात, हे बघून हसावे की रडावे हेच कळत नाही. सीबीएससीच्या शाळांमध्ये मल्याळम्ला मल्यालम, तामीळला तमिल, श्रवणबेळगोळला श्रवणबेलगोला असे लिहिले जाते. रेल्वेने तर अनेक गावांचे असे नामकरण करून टाकले आहे की आता भुसावळचा स्थानिक माणूसही भुसावल म्हणू लागला आहे, विक्रोळीला विक्रोली, लोणावळाला लोनावला, परळीला पर्ली म्हणू लागला आहे. हिंदी वृत्तपत्र तळेगाव चे नाव तलेगाव लिहितात. प्रादेशिक ओळख असलेला ळ जणू भाषेतूनच हद्दपार होऊ लागला आहे. असं करण्याची खरोखर गरज आहे का? यावर काही लोक म्हणतात की हिंदीत ळ नाही म्हणून असे होते. खरे तर हिंदीत ळ नसण्याचा आणि या नामांतराचा अर्थाअर्थी संबंध नाही. हिंदीत ळ नसला तरी ती जी लिपी वापरते, त्या देवनागरीत ळ आहे, आणि विशेष नामाच्या व्याकरण नियमाप्रमाणे आणि ती उच्चार प्रधान लिपी वापरत असल्याने हिंदीत अनिवार्यपणे तो तसाच लिहिणे अभिप्रेत आहे. कोणतेही विशेष नाम भाषा बदलली तरी बदलत नसते. हाच न्याय लावायचा झाला तर इंग्रजीने छ चा उच्चार ही सीएच लिहायला हवा, कारण हिंदीत ळ नाही तसा, इंग्रजीतही छ नाही.
 
 
या निमित्ताने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे तो म्हणजे, प्रादेशिक नावांचं अशाप्रकारे नामांतरण केल्याने त्या नावांशी संबंधित भावनांना धक्का बसतो. लोकांमध्ये त्या भाषेबाबत रोष निर्माण होतो. आज हिंदीबाबतच्या रोषाचे एक कारण हेही आहेच. शिवाय, या नामांतरामुळे अर्थांतरण सुद्धा होते. झोळ आडनाव असलेला व्यक्ती झोल (घोटाळा) होऊन जातो महाराष्ट्रातील साळी जमात साली ( बायकोची बहीण) होऊन जाते, हे नामांतरण अपमानास्पद वाटते. यावर आपण म्हणाल की असे तर इंग्रजीमध्ये नेहमी होते. त्यावर तुमचा आक्षेप नाही का? तर यावरही माझा आक्षेप आहे. इंडियन इंग्लिशमध्ये सुद्धा त, द, ण आणि ळ यासाठी काही स्पेशल कॅरेक्टर्स किंवा नवीन वर्ण समाविष्ट व्हावी, अशी माझी सूचना आहे, पण तो वेगळा विषय आहे. ओडिसा, सर्व दक्षिणी राज्ये, पश्चिमी राज्ये, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड असे अनेक राज्य आहेत जिथे स्थानिक भाषांमध्ये ळ चा उच्चार आहे. प्रदेशाच्या प्रकृतीनुसार त्यात थोडाफार फरक आहे. पण तो ल आणि ड यांच्या मधला वर्ण आहे यात दुमत नाही, आणि देवनागरीत तो कसा लिहावा याबाबतही मतभेद नाहीत. त्यामुळे हिंदीत ळ आणि जमल्यास, त्यासोबतच अँ आणि ऑ हेही वर्ण समाविष्ट करून तिला अधिक उच्चार प्रधान आणि सर्वसमावेशक बनवली पाहिजे. जर हिंदी साहित्यिकांना किंवा भारती हिंदीच्या प्रमाणीकरणासाठी काम करणार्‍या विद्वानांना वाटत असेल की, त्यामुळे हिंदीच्या लहजामध्ये फरक होईल, तर माझी विनंती आहे की, केंद्र सरकारने अखिल भारतीय स्तरावरील हिंदीचे नामकरण भारती असे करून तिला उर्दू किंवा खडी बोलीच्या परिघाबाहेर काढावे, तिला अधिक परिवर्तनशील बनवावे. तिला सामान्य भारतीय नागरिकांची भाषा बनवावी. या नव्या राजभाषेत वणक्कम या शब्दासारखे अनेक प्रादेशिक शब्द सुद्धा समाविष्ट करता येतील आणि कदाचित ती देशाची सर्वमान्य राजभाषा म्हणून विकसित होईल.
 
प्रकाश निर्मळ
9922426299