रुग्णवाहिका 108 चे काम 108 जपासारखेच

    दिनांक :25-Sep-2020
|
त्या दिवशी एक विचित्र घटना घडली. आमच्या कार्यालयात जाताना, एका परिसरात रस्त्यावर गर्दी उसळली होती व पूर्ण परिसरातले लोक कोणी दारातून, तर कोणी गच्चीवरून काय सुरू आहे, ते पाहत होते. तिथे विचारणा करताच उत्तर आले, बाबारे गाडी साफसूफ करून घे, सॅनिटाईझही करशील. आताच या रस्त्यावर एक 108 ची गाडी येऊन गेली. मग काय झालं, मी कुतूहलाने विचारले. तेव्हा मला सांगण्यात आले, दोन माणसे उतरली गाडीतून आणि अर्ध्या तासात कोरोनाबाधित आणि संशयितांना घेऊन गेली.
mandar_1  H x W 
 
पण मी मात्र वेगळ्याच विचारात पडलो. 108 वेळा देवाचे नाव घेतले तर देव येतो, असे आजी सांगायची. इथे तर 108 वर फोन केला आणि देवदूतरूपी कोरोनायोद्धे आले. असो... अखेर 108 या रुग्णवाहिकांची व्यवस्था कशी चालते हे पहायचे मी ठरवले.
 
 
यात माझी भेट झाली ती मंगेश केदारे आणि गौरव इंगोले यांच्याशी. केंद्र सरकार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ‘भारत विकास ग्रुप महाराष्ट्र इमरजन्सी मेडिकल सर्व्हिसेस 108’ ही सेवा महाराष्ट्रात पुरवते. या सेवासंस्थेचे हे दोघे अधिकारी. केदारे उपजिल्हा व्यवस्थापक तर इंगोले वरिष्ठ जिल्हा पर्यवेक्षक. दोघेही कोरोनाच्या कामांमध्ये प्रचंड गुंतलेले. त्यातून त्यांनी वेळ काढून या रुग्णवाहिकांच्या कार्यपद्धतीबद्दल सांगितले.
 
 
कोरोनाचे युद्ध हे जगन्नाथाचा रथ ओढण्यापेक्षा कमी नाही. त्यातील पडद्यामागच्या शिलेदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि प्रश्नोत्तर रूपाने तो ‘तरुण भारत’च्या वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला.
 

प्रश्न : मला 108 या रुग्णवाहिकांची कार्यपद्धती समजावून सांगू शकता का?
उत्तर : 108 हा एक इमरजन्सी टोल फ्री क्रमांक आहे. यावर रुग्ण अथवा रुग्णासंबंधी कोणी फोन करतो तेव्हा तो फोन सरळ पुणे येथील सेंटरला जातो. तिथे रुग्णाची जागा (लोकेशन) व त्याच्यासंबंधी प्राथमिक माहिती विचारली जाते. या माहितीप्रमाणे, त्या स्थानापासून जवळ असलेल्या रुग्णवाहिकेला रुग्णाचा क्रमांक दिला जातो. तिला रुग्णाची माहिती पुरवली जाते व ती रुग्णवाहिका योग्य ठिकाणी पोहोचते. संबंधित रुग्णाला पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र, मग उपविभागीय रुग्णालय आणि गरज असल्यास जिल्हा रुग्णालयात पोहोचवले जाते.
 
प्रश्न : यामागे स्थानिक व्यवस्था काय असते?
उत्तर : यवतमाळ जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा म्हणजे 16 तालुक्यांचा जिल्हा आहे. यात एकूण 23 रुग्णवाहिका आहेत, ज्या 16 ठिकाणी आहेत. या रुग्णवाहिका 30 किमीच्या अंतराने जिल्हाभर पसरल्या आहेत. 3 रुग्णवाहिका या आदिवासी विभागासाठी राखीव आहेत. या फक्त मर्यादित भागात सेवा देतात.
 
प्रश्न : काही वेळा अनोळखी क्रमांकावरून अथवा अपघाताचे फोन येतात, त्यावेळी ती परिस्थिती आपण कशी सांभाळता?
उत्तर : पहिले तर मी तरुण भारतमार्फत लोकांना आवाहन करू इच्छितो की, पोलिस केसच्या भीतीने लोकांना मदत करणे सोडू नका, त्यामुळे कोणाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. आम्हाला गाडी निघण्यापूर्वी रुग्णाचा क्रमांक मिळाला असतो. त्या क्रमांकावर निघताना एकदा संपर्क केला जातो आणि रस्त्यात परत त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी. एकदा संपर्क होतो की रुग्ण घाबरू नये आणि त्याला कळावे की वैद्यकीय सेवा किती वेळात पोहोचेल. जर रुग्णाची दुसरी व्यवस्था झाली आणि ज्या क्रमांकावरून 108 वर फोन केला होता त्याच क्रमांकावरून या गोष्टीची खातरजमा झाली तरच ही रुग्णवाहिका रुग्ण न घेता परत येते अथवा रुग्णवाहिका अपघातस्थळावर जाऊनच येते. फोन करणारा अपघातस्थळावरून निघून गेला असल्यास अनोळखी रुग्ण म्हणून रुग्णाला दवाखान्यात दाखल केले जाते.
 
प्रश्न : कोविडमुळे आपल्या कार्यपद्धतीत काय फरक पडला?
उत्तर : आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या रुग्णवाहिका जिल्ह्यात 16 ठिकाणी होत्या. पण टाळेबंदीच्या काळात जे हॉटस्पॉट तयार केले गेले, त्यानुसार रुग्णवाहिकांची जागा बदलली गेली. गरजेनुसार रुग्णवाहिकांची जागा ठरवण्यात आली. एका केंद्राच्या दुसर्‍या केंद्रात गाड्या वापरल्या गेल्या. उदा. मुकुटबनची रुग्णवाहिका काही काळासाठी यवतमाळला आणली गेली. एका दिवशी पुसदमध्ये पन्नासहून अधिक कोरोनाबाधित निघाले. तेव्हा आजूबाजूच्या तीन गावांतीत रुग्णवाहिका पुसदला पाठवण्यात आल्या. या पद्धतीने कोरोनाकाळात 108 या सुविधेद्वारे जास्तीतजास्त कोरोनाबाधित, संशयित रुग्ण यांना विलगीकरण केंद्रामध्ये नेण्याचे आणि दुरुस्त झालेल्या रुग्णांना घरी पोचवण्याचे काम या रुग्णवाहिकांनी केले.
 
 
प्रश्न : कोरोनाबाधित असल्यास तो ने-आण करण्याची कार्यपद्धती काय असते?
उत्तर : सध्या कोविड केअर सेंटरकडून एक कोरोनाबाधित व संशयित रुग्णांची यादी येते. ही यादी समाजमाध्यमांद्वारे रुग्णवाहिका चालकांकडे पाठवण्यात येते. जेणेकरून त्वरित सेवा मिळावी. नंतर रुग्णवाहिका स्वस्थानावरून निघते. तिथे जाताना चालक आणि डॉक्टर पीपीई कीट घालतात. रुग्णाला प्राणवायूची आवश्यकता असल्यास तो लावून बाधिताला कोरोना केंद्रात सोडले जाते. नंतर चालक गाडीत सोडियम हायपोक्लोराईडचा धूर सोडतात व गाडी अर्धा ते एक तास बंद ठेवतात. तेवढ्या वेळात चालक व डॉक्टर आपली पीपीई कीट जाळून टाकतात आणि आंंघोळ करून पुढच्या फोनसाठी तयार राहतात.
 
प्रश्न : कोरोना योद्ध्यांंची काळजी कशी घेतली जाते?
उत्तर : हे खूप मोठे आणि थकवणारे युद्ध आहे. रात्रंदिवस हे काम चालते. या दरम्यान मुखाच्छादन, पीपीई किट, हातमोजे हे सर्व असूनही एखाद्या चालकास असे वाटले की त्याचा कोरोनाबाधिताच्या मृत शरीरास स्पर्श झालाय्, तर त्याची कोरोना चाचणी करण्यात येते. ती नकारात्मक आली तरीसुद्धा त्याला 14 दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात येते. हीच प्रक्रिया सर्व योद्ध्यांसाठी वापरली जाते. संबंधित कोरोनायोद्ध्यास या 14 दिवसांचा पगारसुद्धा देण्यात येतो.
 

प्रश्न : ही सेवा देताना आपल्याला आलेले काही अनुभव?
उत्तर : वाईट अनुभव असे काही नाही, फक्त कधी कधी एकाच गावातून पाठोपाठ दोन किंवा तीन फोन येतात. आमच्याकडे संसाधने मर्यादित आहेत त्यामुळे जर एका रुग्णाला रुग्णवाहिका दिली तर सुदूर गावात लवकर दुसरी रुग्णवाहिका देणे कठीण जाते. अशावेळी त्यांची मन:स्थिती आमची अडचण समजून घेण्याची नसते. अनेकदा अशा स्थितीत रुग्णाचे नातेवाईक शिव्याशाप देतात. आम्ही जाणूनबुजून कोणालाही सेवेपासून वंचित ठेवत नाही.
 
 
सध्या कोरोनाकाळात आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून जी यादी मिळते त्यानुसार आम्ही कारवाई करतो. पण बरेचदा रुग्ण स्वतःला कोरोनाबाधित मान्य करीतच नाही. घोळका करतात. त्यावेळी तिथे गाडीतले फक्त दोन कोरोनायोद्धे असतात. मग शेवटी नाईलाजाने पोलिसांची मदत घ्यावी लागते. पण अशा गर्दीमुळे संसर्ग पसरण्याची शक्यता खूप जास्त असते.
 
 
प्रश्न : समाजाकडून असलेल्या अपेक्षा आणि प्रतिसाद?
उत्तर : समाजाकडून आम्हाला फक्त सुरक्षा नियम पाळावेत एवढीच अपेक्षा आहे. टीव्ही, रेडिओवर आरोग्य मंत्रालायाद्वारे दिली जाणारी माहिती मिळवून त्याप्रमाणे स्वतःला सुरक्षित ठेवावे. सुरक्षित राहावे, सतर्क राहावे आणि संसर्ग टाळावा. समाजाचा प्रतिसाद म्हणाल तर, आम्हाला या काळात प्रकर्षाने लक्षात आले की लोकांच्या मनात आरोग्यसेवा देणार्‍या लोकांबद्दल खूप आदर आहे.
 
 
प्रवास करणार्‍या कर्मचारी वर्गाला समाजाची खूप मदत झाली. बाहेरगावी गेलेले डॉक्टर्स आणि चालक यांच्या भोजन आणि फराळ आदींचा भार समाजाने हसतहसत उचलला. समाजाचे हे रूप पाहून या अडचणीच्या काळातसुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळते. या दोन्ही कोरोना योद्ध्यांनी आपल्या कामात जिल्हा प्रशासनाचे आभार मानताना त्यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळते, हेसुद्धा आवर्जून सांगितले.
मंदार मोहन देव
9096456321