गोहत्याबंदी आणि गाईचे महत्त्व...

    दिनांक :10-Jan-2021
|
- विलास पंढरी
शाकाहार चांगला की मांसाहार, हा फार जुना वाद आहे. अमेरिकेतील हफिंग्टन पोस्टमधे आठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात या प्रश्नाचे उत्तर संशोधकांनी दिले आहे. त्यांच्या मते, शाकाहारी व्यक्ती या मांसाहारी व्यक्तींपेक्षा जास्त काळ जगतात. कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, शाकाहारी पुरुष हे सरासरी 83.3 वर्षे जगले, तर महिला 85.7 वर्षे जगल्या. मूळ कॅलिफोर्नियन व्यक्तींपेक्षा त्यांचे आयुर्मान अनुक्रमे 9.5 वर्षे तर 6.1 वर्षे अधिक होते.
 
 
cow_1  H x W: 0
 
अर्थात शाकाहारी आणि मांसाहारी यातील फरक करणे सोपे नाही. काहींच्या मते भाज्या, वनस्पतींनाही जीव असतो व सर्व जणच हे खात असतात. भारतवगळता इतर देशांत बहुसंख्य लोक रोजच मांस खातात. त्या तुलनेने क्वचित वर्ष-सहा महिन्यांनी काही निमित्ताने मटण, चिकन खाणार्‍यांना मांसाहारी म्हणणे योग्य होणार नाही. हे मान्य केल्यास बहुसंख्य भारतीय शाकाहारी ठरतील.
विविध अंदाजानुसार, भारतात कधीच मांस न खाणारे म्हणजे साधारण एकतृतीयांश लोक शाकाहारी असून, सात टक्के लोक बीफ खात असावेत. यात ईशान्येकडील काही ख्रिश्चनबहुल राज्ये, केरळ व गोवा या प्रदेशांचा समावेश होतो. लोकशाहीत लोकांनी काय खावे-प्यावे यावर आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेले निर्बंध वगळता इतर निर्बंध अपेक्षित नाहीत. आपल्या संस्कृतीत प्राण्यांचे, पक्ष्यांंचे, वनस्पतींचे संवर्धन व्हावे म्हणून अनेक बाबतीत त्यांना धार्मिक महत्त्व दिले गेले आहे. आपली शेतीप्रधान अर्थव्यवस्था व देशात हिंदू बहुसंख्य असल्याने गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विशाल दृष्टिकोनातून विविध राज्यांनी केलेल्या गोहत्याबंदी कायद्यांकडे पाहिल्यास, सामाजिक वातावरण गढूळ करणार्‍यांना फारसा वाव मिळणार नाही. या कायद्यांची माहिती घेण्यापूर्वी गाईंच्या जाती, त्यांचे आर्थिक, धार्मिक व औषधविषयक महत्त्व जाणून घेऊ या.
 
गायींच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये
साहिवाल, गीर, सिंधी, गौळाऊ, देवणी, खिल्लारी, कांगायम, डांगी, थारपारकर, ओंगोल, हरयाणा हे देशी गायींचे प्रकार असून; जर्सी, होलस्टीन फ्रिजीयन, ब्राऊन स्विस या विदेशी गायी आहेत.
भारतातील गायींचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगितेप्रमाणे करण्यात आले आहे :
1. दूध उत्पादनासाठी साहिवाल, सिंधी, गीर, हरयाणा.
2. शेतीकामासाठी खिल्लारी, गौळाऊ, कांगायम, डांगी.
3. शेती व दुग्धोत्पादन अशा दुहेरी उपयोगासाठी- थारपारकर, देवणी, ओंगोल.
यांपैकी काही महत्त्वाच्या जातींची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :
साहिवाल, गीर, सिंधी या वाणांच्या गायींचा दूध देण्याचा कालावधी 300 दिवस असून सरासरी उत्पन्न 2100 ते 2300 लिटर व सरासरी आयुष्य 15 वर्षे असते. विदेशी गायींचा दूध देण्याचा कालावधी 300 दिवस, सरासरी उत्पन्न 4000 ते 6000लिटर, तर सरासरी आयुष्य 12 वर्षे असते.
 
 
गाईचे शेण व गोमूत्राला आयुर्वेदीय दृष्टिकोनातून फार महत्त्व आहे. तसेच नैसर्गिक शेतीतज्ज्ञ डॉ. सुभाष पाळेकर यांनी देशी गाईच्या शेण व गोमूत्राच्या साहाय्याने तयार केलेल्या जिवामृताच्या साहाय्याने झीरो बजेट शेतीची अभिनव कल्पना साकार केली असून, देशभरात 40 ते 50 लाख शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. डॉ. सुभाष पाळेकर यांच्या मते बीजामृत, जिवामृत, आच्छादन आणि वाफसा ही झीरो बजेट नैसर्गिक शेतीची चतु:सूत्री आहे. यात देशी गायीचे शेण आणि गोमूत्राला फार महत्त्व आहे. शेतीत शेणाचा वापर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात करायचा, यावर सुभाष पाळेकर यांनी आठ वर्षेे संशोधन केले. शाश्वत पीक संरचनेसाठी त्यांनी काही सूत्रे मांडली.
 
 
आपण जेव्हा एक ग्रॅम शेण शेतात टाकतो, तेव्हा तब्बल 300 कोटी जिवाणू जमिनीत टाकतो. एक देशी गाय दिवसाला सरासरी 11 किलो शेण देते. एका गायीचे एका दिवसाचे शेण एका एकराला महिन्यातून एकदा द्यायचे आहे. म्हणजे 30 दिवसांचे शेण 30 एकराला पुरेसे आहे, तेही विरजण म्हणून, अन्न म्हणून नव्हे. कोणत्याही पिकाला हे चालते. शेण तर गाय मरेपर्यंत देतच असते. गाईच्या शेणाचा असा उपयोग केल्यास शेतकर्‍याला भाकड गाईला सांभाळणे कठीण जाते असे म्हणता येणार नाही. हिंदू, जैन, पारशी इ. धर्मांत गाईला पवित्र मानतात. तसेच प्राचीन इजिप्त, रोम, ग्रीस, पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गाईला विशेष स्थान होते. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्रालादेखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गाईचे शेण, गोमूत्र, गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. याला औषधिमूल्य आहे. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’ आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे, असे सांगणारा पुढीलप्रमाणे एक मंत्र आहे-
 
 
‘माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट।’
याचा अर्थ असा आहे-
विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना कधीही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे. हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो.
अथर्ववेदातील एक मंत्र म्हणतो की, ‘धेनुः संदनं रयीणाम्।’ म्हणजे गाय सार्‍या संपत्तीचे भांडार आहे.
गाय शेतकर्‍यांच्या
खूप उपयोगी आहे
ज्या जातीचा बैल जबरदस्त कष्ट करू शकतो त्या जातीची गाय फार दूध देत नाही. कारण दूध देणे आणि काबाडकष्ट यासाठी लागणारी शरीरव्यवस्था वेगवेगळी असते. त्याचमुळे ज्या गाई भरपूर दूध देतात त्यांचे बैल फार कामाचे नसतात. सर्व देशी गाईचे दूध गुणकारी आहे. गाईचे दूध, गोमूत्र, शेण, तूप, दही व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधिगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. त्याला पंचगव्य असे म्हणतात. स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दूध उत्तम आहे. गाईच्या शेणाने सारवलेल्या घरात कीटक कमी आढळतात. गाईच्या दुधात 21 प्रकारची अ‍ॅमिनो आम्ले, 11 प्रकारचे फॅटी आम्ले, 6 प्रकारची जीवनसत्त्वे, 25 प्रकारची धातुजन्य तत्त्वे, 2 प्रकारची साखर, 4 प्रकारचे फॉस्फरस व 11 प्रकारची नायट्रोजन तत्त्वे आढळून येतात. हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे. कारण गाय हा फक्त पाळीव पशू नसून तो एक उपयुक्त पशू आहे.
 
 
गाय, बैल, म्हैस, शेळी, बकरी हे प्राणी ग्रामीण कुटुंबव्यवस्थेला आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे पाळीव प्राणी आहेत. बैल एके काळी व आजही काही प्रमाणात शेतीसाठी उपयुक्त व महत्त्वाचा प्राणी मानला जातो. दारात गाय, म्हैस किंवा एखादी शेळी तरी खेडेगावात अजूनही पाहायला मिळते. शेतकरी, पोटच्या मुलाइतकेच गोठ्यातल्या जनावरांना जपतो. ही भारतीय समाजाची प्राण्यांवर प्रेम करण्याची मानसिकता आहे. गोवंश हत्याबंदीने त्याला कायदेशीर स्वरूप दिले तर एवढा गहजब का व्हावा?
 
गोहत्याबंदीचा इतिहास
सुलतानी राजवटीत मोहम्मद तुघलकापासून ते मोगल बादशहा शहाजहानपर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन शहा, हैदरअली, टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्याबंदी होती. परंतु, इंग्रज राजवटीपासून गोहत्या होत गेली. 1966 साली हा विषय राष्ट्रीय पातळीवर पुढे आला. शंकराचार्यांनी दिल्लीत या कायद्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण केले. हे उपोषण 58 दिवस सुरू होते. हिंदूंच्या भावना, या उपोषणाने आणि उपोषण करूनही सरकार कायदा करीत नसल्याने प्रक्षुब्ध झाल्या होत्या. त्यावरून देशात काही ठिकाणी दंगलीही झाल्या. शेवटी तेव्हाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी कायदा करण्याचे आश्वासन दिले आणि उपोषण संपले. पण, तेव्हापासून देशात हिंदुत्ववादी राजकारणाला गती मिळाली, असे मानले जाते.
 
 
गाय, बैल, म्हैस यांसारख्या दुभत्या व शेतीच्या कामासाठी उपयुक्त असणार्‍या प्राण्यांचे रक्षण केले पाहिजे, इतकेच नव्हे, तर पर्यावरण, जंगल व वन्यजीवांचेही संरक्षण केले पाहिजे, अशी तरतूद संविधानाच्या कलम 48 व 48 (अ) मध्ये करण्यात आली आहे. कलम 48 कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन करण्याची तरतूद करते; तर कलम 48 (अ) चे उद्दिष्ट पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, वने व वन्यजीवांचे रक्षण करणे हे आहे.
 
 
त्यामुळे महाराष्ट्रात अस्तित्वात आलेला कायदा काहीतरी वेगळा आहे, असा गहजब केला गेला होता, हे बरोबर नव्हते. 1954 मध्ये द्विभाषक राज्यांपैकी एक राज्य गुजरातमध्ये हा कायदा लागू करण्यात आला होता, तेव्हा त्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता. त्याचाच आधार घेऊन महाराष्ट्रात 1976 मध्ये प्राणिरक्षण कायदा करण्यात आला. त्यात गोहत्येला प्रतिबंध करण्यात आला होता. गुन्हेगाराला केवळ सहा महिन्यांच्या शिक्षेची व एक हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. त्याचीही अंमलबजावणी झाल्याचे ऐकिवात नाही. भाजपा-शिवसेनेने जेव्हा पहिल्यांदा सत्ता मिळवली, त्या वेळी 1995 मध्ये युती सरकारने विधिमंडळात प्राणिरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. पण, राष्ट्रपतींच्या मान्यतेपूर्वीच राज्यात व केंद्रातही सत्तापरिवर्तन झाले आणि हा कायदा काहीसा विस्मृतीत गेला. 2014 मध्ये पुन्हा भाजपा-शिवसेनेचे सरकार आले आणि तब्बल 19 वर्षांनी राष्ट्रपतींनी या कायद्याला संमती दिली.
 
 
1976 च्या व आता अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. आधीच्या कायद्यात फक्त गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता व कायदा मोडणार्‍याला मामुली शिक्षा ठरविण्यात आली होती. सध्याच्या कायद्यात गाईबरोबर बैलाचा व वळूचा समावेश करण्यात आल्याने गोवंशहत्याबंदी करण्यात आली असून कायदा आणखी कठोर करण्यात आला आहे. गाय, बैल, वळू यांची कत्तल करता येणार नाही, त्या हेतूने त्यांची खरेदी, विक्री करता येणार नाही, विल्हेवाट लावता येणार नाही. गाय, बैल, वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही. अगदी बाहेरील राज्यात कत्तल करून आणलेले असले तरीही गाय, बैल, वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही. यांपैकी कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली असून, गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरविण्यात आला आहे. या कायद्यानुसार बीफ विकणे, बाळगणे आणि खाणे यांवरही बंदी घालण्यात आली आहे. यापुढे कोणी बीफ खाताना आढळल्यास त्याला पाच वर्षे तुरुंगाची हवा खावी लागेल. दहा हजार रुपये दंड भरावा लागेल. उत्तरप्रदेश सरकारनेही अशाच तरतुदी असलेला गोहत्याबंदी कायदा केलेला आहे. नुकतीच कर्नाटक विधानसभेने डिसेंबरमध्ये गोवंशहत्याबंदी कायद्याला मंजुरी दिली आहे.
 
 
काय आहे हा कायदा?
या कायद्यान्वये गोमांसाची विक्री, वाहतूक हाही दंडनीय अपराध असणार असला, तरी जेव्हा गाय आजारी असेल आणि त्याचा संसर्ग अन्य गायींना होणार असेल, तर अशा गायीची हत्या करण्यास अनुमती देण्यात आली आहे. 13 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या म्हशींची हत्या करण्याची अनुमती यात देण्यात आली आहे. गोहत्येचा आरोप असणार्‍यांचे खटले जलद गती न्यायालयात चालवण्यात येतील, तर गायींच्या सुरक्षेसाठी गोशाळा उघडण्याची यात तरतूद आहे. काँग्रेसने या विधेयकाला विरोध करीत सभात्याग केला होता. कायदा मोडल्यास गुन्हेगारांना 50 हजार ते 5 लाख, 3 ते 7 वर्षे तुरुंगवास आणि पुन्हा गुन्हा केल्यास 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड व 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास, अशी शिक्षा असेल. याच विधेयकावर चर्चा करण्यापूर्वीच कर्नाटक विधान परिषदेत उपाध्यक्षांना विरोधकांनी चक्क उचलीत धक्काबुक्की केल्याने प्रचंड राडा झाला.
 
 
खरेतर कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये, हा भूतदयावाद झाला. एखाद्या प्राण्याची उपयुक्तता असेल तर त्याचे रक्षण केले पाहिजे. हा वीर सावरकर म्हणतात त्याप्रमाणे वैज्ञानिक व्यवहारवाद झाला. परंतु, असे कायदे करीत असताना धर्मनिरपेक्ष लोकशाही देशात तरी कायद्याचा अतिरेक होऊ नये, याचीही राज्यकर्त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. प्राचीन वाङ्मय बघता, आर्य संस्कृतीत मांस वर्ज्य नसल्याचं दिसतं. ते निषिद्ध कधी झालं, हे मात्र सप्रमाण कुणी दाखवून दिलेलं नाही. निषिद्ध असूनही हिंदूंमधील निरनिराळ्या जमाती गोमांस भक्षण करीत, असे उल्लेख संशोधकांना आढळले आहेत व आजही काही जमातीत ही पद्धत सुरू असल्याचे दिसते. पण, इतर काही धर्मांप्रमाणे गोमांस भक्षण हा हिंदू धर्माचा गाभा असल्याचा पुरावा नाही, असं मात्र संशोधक सांगतात. गाईला हिंदू धर्मात पवित्र व मातेची जागा दिलेली असल्याने आणि आता जवळपास पंधरा राज्यांनी गोहत्याबंदीचे कठोर कायदे केले असल्याने सर्वच भारतीयांनी गोहत्या हळूहळू बंद करणे सामाजिक सलोखा आणि नैसर्गिक शेतीच्या दृष्टीने देशहिताचे ठरणार आहे. तसेही मांस आणि तेही गोमांस न खाल्ल्याने कुणी अर्धपोटी नक्कीच राहणार नाही. भारतात सुमारे 30 कोटी पशुधन आहे. भारत जगातील, ब्राझील व ऑस्ट्रेलियानंतर तिसरा मोठा बीफ निर्यातदार आहे. देशात 24 मोठे कत्तलखाने असून त्यातील 12 केवळ बीफ निर्यात करणारे आहेत. विशेष म्हणजे यातील मोठे निर्यातदार हिंदू असून व्यवसाय करताना धर्माचा सबंध नसल्याचे त्यांचे स्पष्ट मत आहे. गोहत्याबंदी कायद्यामुळे निर्यात होणारे मांस हल्ली म्हैस आणि रेड्याचे असते.
 
- 9860613872