बेनामी विदेशी संपत्तीसाठी विशेष विभागाची स्थापना

    दिनांक :10-Jan-2021
|
- देशभरात तपासाचे अधिकार
 
नवी दिल्ली,
विदेशात राहणार्‍या भारतीयांच्या बेनामी संपत्तीचा आणि विदेशी बँकांमध्ये जमा केलेल्या काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने आयकर खात्याच्या अखत्यारीत विशेष चौकशी विभागाची स्थापना केली असून, या विभागाला राज्य सरकारची परवानगी न घेता देशात कुठेही तपास करण्याचा अधिकार राहणार आहे.
 
 
benami_1  H x W
 
विदेशी संपत्ती तपास खाते, असे या नव्या विभागाचे नाव असून, देशभरात विस्तारलेल्या आयकर खात्याच्या एकूण 14 तपास संचालनालयांमध्ये हा विभाग स्थापन करण्यात आला आहे. छापे मारणे, संपत्ती जप्त करणे आणि वेगवेगळ्या मार्गांनी बुडविलेल्या कराचा शोध घेण्यासाठी गुप्तचर यंत्रणा तयार करणे ही या नवीन विभागाची जबाबदारी राहणार असल्याची माहिती आयकर खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
 
 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी असा विभाग स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आयकर खात्यातील 69 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात विशेष तपास अधिकारी म्हणून खास या विभागासाठी नियुक्त्या केल्या होत्या, असे या अधिकार्‍याने आज रविवारी वृत्तसंस्थेला सांगितले. भारत सरकारने अलिकडील काळात काळ्या पैशाचा शोध घेऊन, तो भारतात आणण्यासाठी काही देशांसोबत करार केला आहे. या अंतर्गत मिळणार्‍या काळ्या पैशाची माहिती या नव्या विभागाकडे सोपविण्यात येणार आहे, असे हा अधिकारी म्हणाला.