निष्पक्ष, सुस्पष्ट आणि प्रांजळ...

    दिनांक :10-Jan-2021
|
बहुतेक लोक सामान्यत: रा. स्व. संघाला एक राजकीय संघटना समजतात. त्यामुळे रा. स्व. संघ एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे कार्य करीत असेल, अशी त्यांची भावना असते आणि म्हणून त्यांच्या संघाविषयीच्या ज्ञानात अनेक चुकीच्या गोष्टी असतात. हे पूर्णपणे मिथ्या आहे. एक संघटना म्हणून संघ अद्वितीय आहे. राष्ट्रासाठी स्वेच्छेने सतत सेवारत राहण्याची इतकी प्रचंड शक्ती कुठल्याच संस्थेने किंवा संघटनेने दाखविली नाही. दशकानुदशके, एका पिढीनंतर दुसर्‍या पिढीने तपस्येचा मार्ग स्वीकारून, स्वत:ला संघाच्या माध्यमातून राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले आहे. जे केवळ राजकीय बोधानेच सर्वत्र बघत असतात, त्यांना संघासारख्या संस्थेला पूर्ण रूपाने समजणे कठीण असते. ज्या स्पष्टतापूर्वक हे पुस्तक लिहिले आहे त्यातून, वारंवार जे प्रश्न विचारले जातात, त्यांचे समाधान व्हावे म्हणून काही तथ्ये प्रांजळपणे मांडणे आवश्यक होते. यातील बरेच प्रश्न तर अजूनही आरोपासारखे फेकून मारले जातात. म्हणून, खोटारडेपणा आणि गैरसमजुतीच्या या जाळ्याला साफ करणे आवश्यक झाले आहे.
 
 
rss 11_1  H x W
 
राजकारण नाही
पहिली गोष्ट म्हणजे, रा. स्व. संघ पक्षीय राजकारणात गुंतलेला नाही. असे काही स्वयंसेवक आहेत, जे एखाद्या राजकीय पक्षात- भाजपात आहेत आणि राजकीय क्षेत्रात कार्य करतात. निस्संदेह, याचा अर्थ हा नाही की संघ अराजकीय आहे. तो तसा नाहीदेखील. संघाचा राजकारणाबाबत अतिशय सुस्पष्ट दृष्टिकोन आहे- म्हणजे राजकारण हे राष्ट्रीय असले पाहिजे, तसेच राजकीय कार्य, भारतीय संस्कृतिबरहुकूम आणि समाजाच्या भल्याचे असले पाहिजे. म्हणून, देशातील राजकीय घडामोडींकडे संघ बारीक नजर ठेवत असतो आणि जे स्वयंसेवक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांनी भारताचे कल्याण व सुरक्षितता याबाबत परिरक्षक म्हणून भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा ठेवतो. परंतु त्याच वेळी, तो भाजपाच्या कार्यप्रणालीत ना ढवळाढवळ करतो, ना तसे करण्याची त्याची कुठली इच्छा आहे. कुणाला कुठले पद मिळेल? कुठल्या भागात सभा घ्यायच्या? या अशा बाबतीत संघ कधीच काही विचार करीत नाही.
 
 
उमेदवारी देण्याच्या संदर्भात, जर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संघाचे मत विचारले तर- कारण स्वयंसेवक जमिनी स्तरावर कार्य करीत असतात म्हणून, त्या संदर्भातील अचूक माहिती त्यांना उपलब्ध करून देतो. यापलीकडे तो निवडणूकसंबंधी निर्णयप्रक्रियेला प्रभावित करीत नाही. तो निवडणुकीची व्यूहरचना ठरवीत नाही; तो त्या राजकीय पक्षाचा अधिकार असतो. एखाद्या भाजपा सरकारमध्ये बरेच स्वयंसेवक असतात म्हणून केवळ, संघ त्या सरकारच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करतो असा अर्थ होत नाही. ते त्यांचे स्वतंत्र कार्य असते. ‘संघाचा रिमोट कंट्रोल’ ही नेहमी वापरण्यात येणारी बोलीभाषा साफ चुकीची आहे. नियंत्रण ठेवण्याची कुठलीच यंत्रणा संघाकडे नाही. तो स्वयंसेवकांशी संवाद साधतो आणि चांगले कार्य करण्यास त्यांना प्रेरित करतो. सरकारच्या संबंधात, ते संविधानात्मक चौकटीत कार्य करीत असते. ते त्याच्या विधिनियमांनी, आचार-व्यवहाराच्या नियमांनुसार चालत असते. ते भारतीय संसदेच्या मार्फत जनतेला जबाबदार असते.
 
 
दिल्लीतील रा. स्व. संघावरील व्याख्यानमालेत, राजकारणाशी संघाचा संबंध आणि केवळ एकाच राजकीय पक्षात स्वयंसेवक का आढळतात, यासंबंधीचा एक सारगर्भित थेट प्रश्न मोहनजींना विचारण्यात आला होता. त्याला मोहनजींनी उत्तर दिले- ही आमची समस्या नाही. स्वयंसेवक इतर राजकीय पक्षांत का जात नाहीत, यावर त्या राजकीय पक्षांनी विचार करायचा आहे. आमच्याकडून, स्वयंसेवकांनी एका विशिष्ट पक्षाचे कार्य करावे असे सांगितले जात नाही. आम्ही आमच्या स्वयंसेवकांना एवढेच सांगत असतो की, जे राष्ट्रहितास्तव कार्य करीत असतात आणि तदनुसार जे धोरणे तयार करीत असतात, अशांच्या मागे एकजुटतेने उभे राहिले पाहिजे.
 
 
आम्ही बघितले आहे की, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली, बरेच राजकीय पक्ष अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणात गुंतले आहेत आणि आमच्या देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत तडजोड करणार्‍या तसेच देशाच्या एकता व अखंडतेला धोका पोहोचविण्याच्या बाबतीत ते अतिशय क्षीण भूमिका घेत असतात. या सर्व गोष्टी भारतातील जनता जशी बारकाईने बघत असते, तसे स्वयंसेवकही बघत असतात आणि याचा त्यांच्या राजकीय पक्षनिवडीवर प्रभाव पडत असतो.
 
 
धोरणे आणि जनजागरण अभियान
संघ कुठल्याच राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. तो केवळ धोरणांचे समर्थन करतो आणि ज्याचा राष्ट्रहित हाच निकष असतो. म्हणून, जेव्हा संघाची शक्ती वाढते, तेव्हा राष्ट्रहिताची धोरणे असलेल्या राजकीय पक्षांना फायदा होतो. निवडणुकीच्या काळात संघ आणि परिवारातील संघटना, मतदारांची नोंदणी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जनजागरणाची अभियाने राबवीत असतात. 2019 साली, अभाविपने ‘राष्ट्र प्रथम, मतदान आवश्यक (नेशन फर्स्ट, व्होटिंग मस्ट)’ हे अभियान राबविले. 2014 च्या निवडणुकीसाठी ‘युथ अगेन्स्ट करप्शन (वायएसी)’ हे अभियान 2011 मध्ये सुरू झाले. कारण, संयुक्त पुरोगामी आघाडी-2चे सरकार, टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाणीतील प्रचंड भ्रष्टाचाराने घेरले होते. मार्च 1977 मध्ये आणिबाणी उठविल्यानंतर झालेल्या निवडणुकीत, संघ आणि परिवारातील संघटनांनी उघडपणे जनता पार्टीच्या आघाडीसाठी प्रचार केला. ही एक अभूतपूर्व परिस्थिती होती. सामान्यत:, स्वयंसेवक कुठल्या एखाद्या राजकीय पक्षासाठी प्रचार करीत नाही, परंतु शाखेत जाणारे सर्व स्वयंसेवक घरोघरी जातात आणि लोकांना मताधिकार बजावण्याचे आवाहन करतात, ही मात्र वस्तुस्थिती आहे.
 
 
संघाची लोकशाहीशी गहन वचनबद्धता आहे आणि ती तळागाळापर्यंत झिरपत असते. अनेक जण रा. स्व. संघ आणि भारताचे संविधान यांच्यासंदर्भात विनाकारण वाद उभे करीत असतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एका संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या समितीने, डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वातील प्रारूप समितीने तयार केलेल्या भारताच्या संविधानाला एकमताने स्वीकारले. घटनात्मक कर्तव्यांचे पालन करणे, संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आमच्या संविधानात ‘सेक्युलर’ आणि ‘सोशॅलिस्ट (समाजवादी)’ हे दोन शब्द नंतर टाकण्यात आले, हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संविधान सभेने केवळ ‘सार्वभौम (सॉव्हरिन)’ आणि ‘लोकतांत्रिक (डेमोक्रेटिक)’ हेच शब्द स्वीकारले होते.
 
 
अशाच प्रकारे, स्वातंत्र्यानंतर सघन चर्चेनंतर भारताला त्याचा राष्ट्रध्वज मिळाला. आमचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा आम्हां सर्वांना अतिशय प्रिय आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या 15 ऑगस्ट 1947 रोजी, तसेच भारत प्रजातंत्र बनला त्या 26 जानेवारी 1950 रोजी नागपुरातील रा. स्व. संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकविण्यात आला होता. 1963 सालच्या प्रजासत्ताक दिन कवायतीत सहभागी होऊन, रा. स्व. संघाने भारताच्या सर्व भागांमध्ये तिरंग्याप्रती आदर रुजविला. अनेक संघटना आणि अगदी सरकारी विभागांप्रमाणे, रा. स्व. संघाचाही स्वत:चा झेंडा- भगवा ध्वज आहे. या भगव्या ध्वजाने भारताच्या सांस्कृतिक गुणसूत्राचे (डीएनएचे) शतकानुशतके प्रतिनिधित्व केले आहे. 2004 साली, ध्वजसंहितेच्या नियमांमध्ये मोकळीक मिळाल्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्यदिनी व गणतंत्रदिनी, नागपुरातील संघ मुख्यालयावर तसेच देशातील इतर कार्यालयांवर नियमितपणे राष्ट्रध्वज अत्यंत सन्मानाने फडकविला जात असतो.
 
 
सतत वाढते सामर्थ्य
संघ ही लोकांची चळवळ आहे आणि मोठ्या संख्येत लोक त्याच्याशी जुळत आहेत. हे देखील खरे आहे की, निहित स्वार्थ असलेल्या काही टोळ्यांकडून विशेषत:, नफेखोरी करणारे एनजीओज, विद्वानांची विशिष्ट कडबोळी आणि क्षुद्र राजकारणात गुंतलेल्यांकडून संघाला विरोध होत असतो. यांचा सर्वांचा दृष्टिकोन, जे काही हिंदू म्हणून आहे त्याला नाकारणे, यावर आधारित आहे. विकृत इतिहास शिकवून आणि अशाच प्रकारची उथळ संस्कृती डोक्यात भरवून, भारताला योजनापूर्वक अ-हिंदू बनविण्यात येत आहे. हिंदू-ओळख म्हणून जे काही आहे, त्याचा त्याग करण्यात आला. संघाने या कारवायांना आव्हान दिले. कारण, आमच्या हिंदुपणाचा असाच संकोच होत गेला, तर आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या उजाड होऊ. मग आमच्याजवळ काही खंडित सिद्धान्त सोडून दुसरे काय उरणार? या कारस्थानाच्या विरुद्ध, सर्वसामान्य लोक आणि कोट्यवधी स्वयंसेवक एका विशाल खडकाप्रमाणे उभे झाले आहेत.
 
 
म्हणून, कुणी जर जातीचे राजकारण करीत असेल, तर संघ जातींच्या राजकारणाला संपविण्यासाठी हिंदुत्वाची गोष्ट करतो. कुणी प्रांतीय राजकारण करीत असेल, तर संघ राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार-प्रसार करतो. कुणी भाषेवरून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर संघ एकतेचा आणि सर्व भारतीय भाषांच्या श्रेष्ठत्वाचा गौरव करतो. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली काही जण दहशतवादाचे समर्थक म्हणूनही कार्य करीत आहेत. संघ त्यांचा अतिशय उच्च स्वरात विरोध करतो. सेक्युलॅरिझमच्याच नावाखाली जेव्हा काही ख्रिश्चन मिशिनरीज, प्रलोभने दाखवून रिलिजिअस कन्व्हर्शन्स करतात तसेच कपटी अभियानांना लपून फूस देतात, तेव्हा संघ यांच्या विरोधात कारवाई करतो. संविधानानेही याला प्रतिबंध घातला आहे. जे वामपंथीय आणि त्यांचे साथीदार, बंदुकीच्या जोरावर सत्तेचे राजकारण करतात, त्यांना संघ कायमचा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी जाणून असावे. राष्ट्रीय शक्ती बनण्यासाठी आर्थिक धोरणांमध्ये राष्ट्रीय वृत्तीचे प्रतिबिंब प्राधान्याने पडायला हवे. काही देशांतील उत्पादक कंपन्या भारतात आपला माल प्रचंड प्रमाणात ठांबून ठेवू इच्छितात, त्याला थांबविले जात असून भविष्यातही विरोध केला जाईल.
 
 
अशा रीतीने, प्रामाणिक स्वयंसेवकांनी ज्यांच्या अधम कृत्यांना जरब बसविली आहेे अशा सर्व प्रवृत्ती शक्य त्या प्रत्येक ठिकाणी एकत्र येत आहेत आणि तिथे ते संघाविरुद्ध पथनाट्य, गाणी इत्यादी कार्यक्रम करू लागतात. अशा कार्यक्रमांना ते ‘संघाचा सामाजिक निषेध’ म्हणून रंगवितात. हा खोटारडेपणा आहे. वास्तव हे आहे की, संघाला संपूर्ण समाजाचा पाठिंबा आहे आणि या लोकांचे हे असले तुरळक गट जितक्या जास्त अफवा पसरवतील आणि उन्माद वाढवतील, तितका संघ अधिक सामर्थ्यशाली होत जाणार.
 
सुनील आंबेकर यांनी लिहिलेल्या
‘द आरएसएस रोडमॅप्स फॉर द ट्वेन्टीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाचा क्रमश: भावानुवाद