एनडीआरएफला मिळणार संयुक्त राष्ट्राच्या मदत दलाचा दर्जा

    दिनांक :10-Jan-2021
|
- याच वर्षी घोषणेची शक्यता
 
नवी दिल्ली, 
भारताच्या राष्ट्रीय आपात्कालिन मदत व बचाव दलाला (एनडीआरएफ) लवकरच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय आपात् मदत व बचाव दलाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. याच वर्षअखेर याबाबतची औपचारिक घोषणा होणार असल्याची माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली.
 

u netion_1  H x
 
इंटरनॅशनल सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू अ‍ॅडव्हायझरी गु्रप या संस्थेच्या अखत्यारीत सुमारे 90 देशांचे दल जगभरात मदत व बचाव कार्य करीत असतात. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथे असून, ती संयुक्त राष्ट्राच्या नियंत्रणात काम करते. या संस्थेने एनडीआरएफने आतापर्यंत भारतात आलेल्या विविध संकटांमध्ये केलेल्या कार्याची दखल घेतली असून, एनडीआरएफलाही जागतिक दलात सामावून घेण्याच्या प्रस्तावावर ही संस्था विचार करीत आहे, असे एस. एन. प्रधान यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
 
 
आपल्या देशात ज्याप्रमाणे कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी भारतीय मानक विभाग आहे, त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडची ही संस्था मदत व बचाव दलांच्या कार्याचे मूल्यांकन करीत असते. आपल्या एनडीआरएफने मागील अनेक वर्षांच्या काळात भूकंप, महापूर, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक संकटांच्या काळात नागरिकांना वाचविण्यात व संपत्तीचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सर्व कार्याची दखल या जागतिक संस्थेने घेतली असल्याचे एस. एन. प्रधान म्हणाले. एनडीआरएफला आंतरराष्ट्रीय दलात सामावून घेण्याचा प्रस्ताव या संस्थेकडे आहे आणि त्यावर यावर्षीच्या अखेरपर्यंत औपचारिक निर्णय होऊ शकतो, असेही प्रधान यांनी सांगितले.