सरना हिंदूच आहेत...!

    दिनांक :10-Jan-2021
|
-  डॉ. मनमोहन वैद्य
झारखंडच्या राज्य सरकारने बहुमताने विधेयक पारित करून घोषित केले की, सरना धर्म मानणारे हिंदू नाहीत. सरना, हिंदू धर्माहून वेगळा धर्म आहे. तसेच दुसरीकडे आंध्रप्रदेश सरकारनेही, अनुसूचित जनजातीचे लोक हिंदू नाहीत, असा निर्णय घेतला आहे. आणि म्हणून 2021 साली होणार्‍या जनगणनेत त्यांना हिंदूच्या ऐवजी ‘अनुसूचित जनजाती’ श्रेणी अंतर्गत सूचिबद्ध केले जाईल. या दोन्ही बातम्या वाचल्यावर, हे दोन्ही निर्णय घेणार्‍यांमध्ये ‘भारतबोध’ व ‘हिंदुत्वा’च्या जाणिवेचा अभाव तसेच राजकीय सत्तेचा अहंकार दिसून आला.
 
 
Sarna_1  H x W:
 
हिंदू काही एखादा रिलिजन नाही. ती एक जीवनदृष्टी आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. अध्यात्मावर आधारित असणे, या जीवनदृष्टीचे वैशिष्ट्य आहे आणि भारतीय उपखंडात शतकानुशतके राहून विविध पद्धतींनी उपासना करणारे, विविध भाषा बोलणारे सर्व लोक स्वत:ला याच्याशी जोडतात. यामुळे याला मानणार्‍यांची, या भूखंडात राहणार्‍यांची एक विशिष्ट ओळख, एक व्यक्तित्व तयार झाले आहे.
 
 
‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति।’ हे या व्यक्तित्वाचे वैशिष्ट्य आहे. सत्य किंवा ईश्वर एक आहे आणि त्याला अनेक नावांनी लोक ओळखतात. त्याला जाणण्याचे विविध मार्ग असू शकतात. ते सर्व समान आहेत. म्हणून ज्यू, पारसी, सिरीयन ख्रिश्चन शेकडो वर्षांपूर्वी, त्यांच्या त्यांच्या देशात प्रताडित होऊन आश्रयासाठी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आले. भारतातील राजे, लोकांची भाषा, लोकांची उपासना पद्धत वेगवेगळी असतानाही वेगळा वंश, भाषा आणि उपासना असणार्‍या व आश्रयार्थ आलेल्या या लोकांसोबत स्थानिक लोकांचा व्यवहार समानतेचा, सन्मानाचा आणि उदारतेचा होता. याच्या मुळाशी हेच कारण आहे. या व्यक्तित्वाचे दुसरे वैशिष्ट्य आहे- ‘विविधतेत एकतेचे दर्शन करणे.’ एकच चैतन्य विविध रूपांनी अभिव्यक्त झाले आहे. म्हणून या विविध रूपांमधील अंतर्निहित एकतेला बघण्याची दृष्टी भारताची राहिली आहे. म्हणून भारत विविधतेला भेद मानत नाही. विविध रूपांमधील एकतेला ओळखून, त्या सर्वांची वैशिष्ट्ये सुरक्षित ठेवीत, सर्वांना सोबत घेण्याची विलक्षण क्षमता भारतात आहे. तिसरे वैशिष्ट्य आहे- प्रत्येक मनुष्यात (स्त्री अथवा पुरुष) दिव्यत्व विद्यमान आहे. मानवी जीवनाचे लक्ष्यच, या दिव्यत्वाला प्रकट करीत, त्या परम-दिव्यत्वात विलीन होण्याचा प्रयत्न करणे हे आहे. हे दिव्यत्व प्रकट करण्याचा मार्ग प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. तो त्याचा रिलिजन अथवा ती त्याची उपासना असेल. तर, या वैशिष्ट्यांनी युक्त अशा या व्यक्तित्वाला सारे जग अनेक वर्षांपासून ‘हिंदुत्व’ या नात्याने ओळखत आले आहे. त्याला कुणी भारतीय, सनातन, इंडिक असे इतर नावदेखील देऊ शकतो. मात्र, सर्वांचा आशय एकच आहे.
 
 
यातील कुठली बाब सरना अथवा जनजातीय समाजाला मान्य नाही आहे? डॉ. राधाकृष्णन् यांनी हिंदुत्वाला 'Common Wealth of all Religions' म्हटले आहे. स्वामी विवेकानंदांनी 1893 सालच्या आपल्या शिकागो येथील व्याख्यानात हिंदुत्वाला "Mother of all Religions' म्हणून सांगितले. सर्वसमावेशकता, सर्व स्वीकार्हता, विविध मार्ग आणि विविध रूपांचा स्वीकार करण्याची दृष्टी म्हणजेच हिंदुत्व आहे. दहा हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या या समाजात, वेळोवेळी लोकांच्या उपास्यदेवता बदलत गेल्या आहेत. अशा परिवर्तनाला स्वीकार करणे, हेच हिंदुत्व आहे. स्वामी विवेकानंदांनी 1893 सालच्या आपल्या सुप्रसिद्ध शिकागो व्याख्यानात पुढील श्लोक उद्धृत केला होता-
 
त्रयी सांख्यं योग: पशुपतिमतं वैष्णवमिति
प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमद: पथ्यमिति च।
रुचीनां वैचित्र्याद्दृजुकुटिलनानापथजुषां
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव॥
 
अर्थ- हे परमपिता! तुम्हाला प्राप्त करण्याचे अगणित मार्ग आहेत- सांख्य मार्ग, वैष्णव मार्ग, शैव मार्ग, वेद मार्ग इत्यादी. लोक आपल्या रुचीनुसार एखादा मार्ग निवडतात. परंतु शेवटी, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी वाहात जाऊन समुद्राला मिळते, त्याचप्रमाणे हे सर्व मार्ग तुमच्यापर्यंत पोहोचतात. खरंच, कुठल्याही मार्गाचे अनुसरण करून तुम्हाला प्राप्त करता येते. या भारताच्या विचारांची सुंदरता आणि सार हे आहे की, नवनव्या देवतांचा उद्भव होत राहतो. प्राचीन देवतांना सोबत ठेवूनही नव्याला समाविष्ट करण्याची प्रवृत्ती म्हणजेच ‘हिंदुत्व’ आहे.
 
 
गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी स्पष्ट म्हटले आहे- ‘‘अनेकतेत एकता बघणे आणि विविधतेत ऐक्य प्रस्थापित करणे, हाच भारताचा अंतर्निहित धर्म आहे. भारत विविधतेला भेद मानीत नाही आणि परक्याला शत्रू मानीत नाही. म्हणून नव्या मानवसमूहांच्या संपर्काने आम्ही भयभीत होणार नाही. त्यांची (नव्या लोकांची) वैशिष्ट्ये ओळखून त्यांना आपल्या सोबत घेण्याची विलक्षण क्षमता भारताची आहे. म्हणून भारतात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन परस्परांशी लढताना दिसतील, परंतु ते लढून मरणार नाहीत. ते एक सामंजस्य स्थापित करतीलच. हे सामंजस्य अहिंदू असणार नाही. ते असेल विशेष भावनेने हिंदू.’’  ही सामंजस्याची, एकतेची दृष्टी ‘हिंदुत्वा’ची आहे. आता कुणी सरना अथवा अनुसूचित जनजातीच्या बंधूंनी सांगावे की, ते हिंदुुत्वाहून कसे अलग आहेत ते! कारण ‘हिंदुत्व’ कुठल्याही एका रूपाची (Form) गोष्ट करीत नाही; उलट ज्या एकाच चैतन्याची ही सर्व रूपे आहेत, त्या एकतेची किंवा एकत्वाची दृष्टी म्हणजे ‘हिंदुत्व’ आहे.
 
 
काही वर्षांपूर्वी पूर्वोत्तरातील (आसाम) जनजातिबहुल क्षेत्रात एक प्रयोग झाला. तेथील विविध राज्यांमधील 18 जनजातींच्या संमेलनात पुढील प्रश्न विचारण्यात आले- (1) ईश्वराच्या संदर्भात आमची संकल्पना काय? (2) धरतीच्या संदर्भात आमची काय अवधारणा आहे? (3) प्रार्थनेत आम्ही काय मागतो? (4) पाप आणि पुण्याची संकल्पना काय आहे? (5) दुसर्‍यांच्या पूजा पद्धतीच्या संदर्भात आमचे अभिमत काय आहे? (6) दुसरी पूजा परंपरा असणार्‍यांना, त्यांच्या पूजा परंपरेचा त्याग करवून, आपल्या पूजावाल्यांमध्ये आणण्याची तुमची इच्छा आहे का?
 
 
हे प्रश्न विचारल्यानंतर सर्वांची उत्तरे, या देशाच्या कुठल्याही भागात राहणारा हिंदू जे उत्तर देईल, तीच होती. या सादरीकरणानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले की, वेगवेगळी भाषा बोलणार्‍या या सर्व जनजातींच्या विचारांमध्ये, सर्व मुद्यांवर साम्य आहे आणि या सर्वांचा भारताच्या आध्यात्मिक परंपरेवरून परस्परांशी मेळ आहे. या भू-सांस्कृतिक एककात, पूजा अथवा उपासनेच्या विविध रूपांमध्ये अंतर्निहित एकतेचा आधार, ‘हिंदुत्व’ आणि भारताची अध्यात्म आधारित एकात्म, सर्वांगीण, सर्वसमावेशक हिंदू जीवनदृष्टी आहे. ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय दृष्टीने जनजाती समाज हिंदूच आहे. राजकीय, सांस्कृतिक आणि उपासनेच्या दृष्टीने ते अनादी काळापासून हिंदू समाजाचे अभिन्न अंग राहिले आहेत.
 
 
सेमेटिक मूळ असल्यामुळे ख्रिश्चन आणि मुस्लिम रिलिजन्समध्ये ही सामंजस्याची दृष्टी नाही. ते मानवतेला दोन भागांमध्ये विभाजित करतात आणि दोघे सोबत राहू शकत नाहीत. म्हणून यांचा कन्व्हर्शनचा इतिहास रक्तरंजित व हिंसा, प्रलोभन आणि फसवेगिरीचा राहिला आहे. ईशान्य भारताच्या जनजातींमध्येही ख्रिश्चन चर्चद्वारा तेथील जनजातीय लोक हिंदू नाहीत, असा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न आधी ब्रिटिश शासक आणि नंतर भारतीय शासकांच्या मदतीने वर्षांपासून सुरू राहिला आहे. यामुळेच तिथे फुटीरतावादी तत्त्वेदेखील अधिक सक्रिय झालीत. इथेही नवी व वेगळी ओळख देण्याच्या मिषाने त्यांच्या सांस्कृतिक मुळांना खोलातून हळूहळू उपटणे आणि नंतर आत्म्यांची शेती (Soul harvesting) करण्याची योजना सुरू होती. परंतु, आता तेथील जनजातींच्या लक्षात आले आहे की, ख्रिश्चनांसोबत राहिलो तर आमची सांस्कृतिक आणि पूजा पद्धतीची ओळख हरवून बसण्याचे संकट ओढवेल. उलट, हिंदू समाजात, त्यांच्यासोबत राहिलो तर आपली वेगळी सांस्कृतिक आणि पूजेची ओळख कायम राहील, सुरक्षित राहील, असा त्यांना अनुभवही येऊ लागला आहे. हा त्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणून तिथे ‘डोनी पोलो’, ‘सेंग खासी’सारखे भारतीय श्रद्धा अभियान सुरू झाले आहे आणि सतत वाढत आहे. सरनासारख्या इतर जनजातीच्या नेत्यांनीही एकदा या भारतीय श्रद्धा अभियानातील (Indigenous faith movements) लोकांच्या अनुभवांपासून काही शिकले पाहिजे.
 
 
ज्या वेळी देवतांची कुठली रूपे (Forms) किंवा नावे नव्हती, तेव्हा सर्व जण निर्गुण, निराकार ईशत्वाची चर्चा, आराधना आणि उपासना करीत होते. ‘ईशावास्यं इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्।’ हाच त्याचा आधार होता. नंतर विविध देवतांच्या रूपांच्या माध्यमातून त्याच परमतत्त्वाची उपासना आणि आराधना सुरू झाली. परंतु, हे सर्व सोबतच निसर्गाची पूजा, पंचमहाभूतांची पूजा करीतच होते. नंतरही अनेक अवतारी पुरुषांच्या माध्यमातून नवनवे उपासना मार्ग जोडले गेलेत. तरीही हे सर्व भूमी, अग्नी, वृक्ष, पहाड, सागर यांच्या माध्यमातून निसर्गाची पूजा करीतच होते. म्हणून निसर्गाची पूजा तर प्रारंभापासूनच आहे. त्यानंतर कालक्रमानुसार सतत नव्या गोष्टी जोडल्या गेल्यात. परंतु, वेगवेगळ्या माध्यमांतून निसर्गाची पूजा तर हिंदू समाजाच्या सर्व वर्गांमध्ये आजदेखील सुरू आहे. म्हणून केवळ निसर्गाची पूजा करणार्‍यांसोबत संपूर्ण हिंदू समाजाचे तादात्म्य तसेच कायम आहे. केवळ काही तत्त्व विविधतेला भेद सांगून बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहायला हवे.
 
 
केवळ सरना किंवा अनुसूचित बंधूच नाही, तर भारतातील विविध समाजसमूहांमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘आम्ही हिंदू नाही’ हे प्रचलित करण्याचा योजनापूर्वक प्रयत्न सुरू आहे. हिंदुत्वाची जी विविधतेत एकता बघण्याची विशेष दृष्टी आहे, तिला विस्मरणात टाकून या विविधतेला भेद म्हणून सांगून, त्याचा प्रचार करीत हिंदू समाजात भिंती निर्माण करण्याची आंतरराष्ट्रीय षडयंत्रे सुरू आहेत. हिंदू एक राहील, तर समाज एक राहील; देश एक राहील. देश एक राहील तरच देश पुढे जाईल. असे घडू नये म्हणून, ज्यांचे निहित स्वार्थ आहेत ती सर्व तत्त्वे भारताला विभाजित करण्याच्या या कारस्थानात सक्रिय आहेत.
 
 
भारतात विभाजन घडवून आणण्याचे प्रयत्न कसे सुरू आहेत, यावर अनेक शोधाधारित पुस्तके उपलब्ध आहेत. या विभाजनकारी तत्त्वांमध्ये एक शक्ती ख्रिश्चन चर्चदेखील आहे. त्यांना भारतात कन्व्हर्जन घडवून ख्रिश्चनांची संख्या वाढवायची आहे. त्यांच्या कन्व्हर्जन करणार्‍या सर्व संस्थांच्या वेबसाईटवर याचा स्पष्ट उल्लेख आहे. काही ख्रिश्चन संस्था छुप्या रूपात विविध नावांनी समाजात आधी भ्रम, नंतर विरोध, नंतर विभाजन आणि अंतत: फुटीरतावाद निर्माण करण्याच्या कामात लागल्या आहेत. कन्व्हर्जनच्या प्रयत्नांना ते पीक कापणे (Harvesting) असे म्हणतात. असा पीक कापण्याचा प्रयत्न ब्रिटिश शासनकाळापासूनच सुरू आहे. परंतु, भारताची सांस्कृतिक मुळे खूप खोलवर आहेत आणि अनेक साधुसंतांद्वारा वेळोवेळी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक चेतना जागविण्याचे प्रयत्न इथे पिढ्यान्पिढ्यांपासून सुरू राहिले आहेत. असे साधुसंत उत्पन्न झाले नाहीत, अशी कुठलीही जाती अथवा जनजाती भारतात नाही. म्हणून ख्रिश्चन कन्व्हर्जनचे सर्व प्रयत्न इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी सफल होत असलेले दिसतात. त्यामुळे नवनव्या क्लृप्त्या वापरण्यात येत आहेत. भारताच्या विभाजनाचे प्रयत्न करणारी सर्व तत्त्वे, आपसात चांगला ताळमेळ बनवून आपापला उद्देश पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत आहेत.
 
 
प्रत्येक जात आणि जनजातींमध्ये आध्यात्मिक-सांस्कृतिक जागरणाचे काम पिढीदरपिढी सुरू असल्यामुळे, या सर्व समाजसमूहांमध्ये सांस्कृतिक मुळे सखोल रुजली आहेत. कन्व्हर्जन सुलभ व्हावे म्हणून, ज्यांचे कन्व्हर्जन करायचे आहे त्यांची सांस्कृतिक मुळे जितक्या खोलवर गेली आहेत, तिथून ती उथळ करायची, उपटायची! मुळे जितकी कमकुवत आणि उथळ होतील, तितके त्यांचे पीक कापणे (Harvesting) सोपे होणार. म्हणून वेगवेगळे तर्क देत आणि क्लृप्त्या योजून भ्रम पसरविण्याचे षडयंत्र चालूच आहे. या सर्वांचे खरे रूप ओळखले पाहिजे, त्याविरुद्ध लोकांना जागृत करावे लागेल, समाजाला जागे राहावे लागेल. प्रसिद्ध कवी श्री. प्रसून जोशी यांची एक कविता आहे-
 
उखडे उखडे क्यों हो
वृक्ष सूख जाओगे।
जितनी गहरी जड़े तुम्हारी
उतने ही तुम हरियाओगे।
 
ज्या दोन राज्यांमध्ये हे निर्णय घेतले गेले आहेत, ती राज्ये अनेक वर्षांपासून ख्रिश्चन कारवाया आणि कन्व्हर्जनचे केंद्र राहिले आहेत, हा केवळ एक योगायोग मानू नये. पीक कापणीसाठी मुळांची खोली कमी करणे, उपयोगी असते. विविध प्रकारचे भ्रम पसरवून, त्यासाठी प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर करण्याच्या व्यापक षडयंत्राचाच हा एक भाग आहे. देशभरात मुळांना उपटण्याचे जितके प्रयत्न सुरू आहेत, त्यामागची तत्त्वे आणि त्यांचे आर्थिक स्रोत बघितले तर हे लक्षात येईल.
 
- सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ